Friday, 23 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०१ दुपारी .००वा.

****

भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आलेले रामनाथ कोविंद यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती पद हे लोकशाहीचं सर्वात मोठं पद असून, या पदाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कोविंद यांनी अर्ज सादर केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 

दरम्यान, या निवडणुकीसाठी संयुक्त पुरोगामी आघाडी आणि अन्य विरोधी पक्षाच्या वतीनं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या १७ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. 

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं देशाच्या कार्टोसॅट दोन या उपग्रहासह अन्य ३० उपग्रहांचं आज केलेलं प्रक्षेपण यशस्वी झालं असल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून आज सकाळी नऊ वाजून २९ मिनीटांनी पीएसएलव्ही सी ३८ या यानातून हे उपग्रह अवकाशात झेपावले. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे.

****

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीटचा निकाल आज जाहीर झाला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश १२ जून रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.

****

केंद्रीय नागरी विकास मंत्रालयानं आज स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातल्या ३० शहरांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. तिरुवनंतपुरम, नया रायपूर, राजकोट, पाटणा, पुदुच्चेरी, गांधीनगर, श्रीनगर, बंगळुरु, जम्मू, अलाहबाद, गंगटोक आदी शहरांचा यात समावेश आहे.

****

हेरगिरीच्या कथित आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा पाकिस्तानकडून प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ खोटा असल्याचं भारतानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यावरचा खटला कायम ठेवणार असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे आपला कबुलीजबाब देताना दिसत आहेत. पाकिस्तान सतत आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप बागले यांनी केला आहे.

****

देशविरोधी प्रचार प्रसार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सोशल मिडियाच्या गैरवापरावर आळा घालण्यासाठी सरकारनं एक धोरण निश्चित केलं आहे. गृह मंत्रालय आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या दिल्ली इथं झालेल्या बेठकीत या धोरणावर चर्चा करण्यात आली. सोशल मिडियाचा गैरवापर न होणं हे सर्वात मोठं आव्हान असून, जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेली परिस्थिती ही याचाच एक भाग असल्याचं गृह मंत्रालयाच्या एका अधिकार्यानं म्हटलं आहे.  

****

कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट नियोजन करणारं देशातलं अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण, शहरी दारिद्र्य निर्मूलन आणि नगरविकास विभागातर्फे आज हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

आषाढी वारीसाठी निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीहून वाल्हेकडे मार्गस्थ झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी होणार आहेत.

संतश्री तुकाराम महाराजांची पालखी आज गवळ्याची उंडवडीकडे मार्गस्थ झाली.

तर पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज पाटोदाहून मार्गस्थ झाली. दिपोळ इथं आज पालखीचा मुक्काम होणार आहे. एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा आज पारगाव घुमरे इथं पार पडला.

****

एचआयव्ही-टीबी, कावीळ या रोगाविषयी तसंच एचआयव्ही एड्स, एड्सवरील उपचार आणि एड्सविषयी नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्याच्या सूचना बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी दिल्या आहेत. जिल्हा एड्स तसंच नियंत्रण समितीच्या बैठेकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

****

ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटमपटू के श्रीकांत उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात श्रीकांतनं भारताच्याच बी साई प्रणितचा २५-२३, २१-१७ असा पराभव केला. 

****

No comments: