Wednesday, 28 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी, विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आपलं नामांकनपत्र दाखल केलं, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपल्या नामांकन पत्राची चौथी प्रत दाखल केली. राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या सतरा जुलैला होणार आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपी, या काश्मीरच्या सत्तेतल्या भाजपाच्या भागीदार पक्षानं कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याचं आज जाहीर केलं. आतापर्यंत अट्ठावीस पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

****

१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणातला आरोपी मोहम्मद डोसा याचा आज मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याचं त्यानं सांगितल्यामुळे त्याला कारागृह प्रशासनानं आज सकाळी दवाखान्यात दाखल केलं होतं. हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी दिली आहे.

****

केंद्र सरकारच्या पंचवीस विभागांचं येत्या काही दिवसात संपूर्ण संगणकीकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ई-फाइल्सच्या निर्मितीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा हजार टक्क्यांनी वाढल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

****

कोरडवाहू शेतीसाठी कर्जमाफीची पाच एकराची अट शिथील करावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याच्या महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असल्यानं यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री  अरुण जेटली यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

बाल हक्क कायद्याची संपूर्णपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी शासनानं चार नवीन कायदे आणले असल्याची माहिती राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भातल्या तक्रारींचा निपटारा वेळेत व्हावा आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी शासन, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर इथं तीन नवी न्यायालयं सुरू करणार असल्याचंही घुगे यांनी सांगितलं. मुलांवर अन्याय होत असेल तर त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाल हक्क आयोगाची असल्याचं नमूद करत, आयोग आता पूर्ण क्षमतेनं काम करणार असल्याचं घुगे यावेळी म्हणाले.

****

मतदार यादीत अद्यापपर्यंत  नावं समाविष्ट न झालेल्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये यावीत यासाठी निवडणूक आयोग येत्या एक जुलैपासून एक विशेष मोहीम राबवणार आहे. यामध्ये प्रथम मतदान करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे. या मोहिमेचं स्मरण जास्तीत जास्त युवकांना करून देता यावं, यासाठी निवडणूक आयोग फेसबुकची मदत घेणार आहे. फेसबुक वापरणाऱ्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदण्याचं स्मरण करून देण्यासाठी फेसबुकवर 'रजिस्टर नाऊ' या बटनाची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच तेरा भारतीय भाषांमधून फेसबुकद्वारे याबाबतचा स्मरण संदेश पाठवला जाणार आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अठरा ते एकवीस वर्षं वयोगटातल्या प्रथम मतदारांच्या नोंदणीसाठी येत्या एक ते एकतीस जुलै दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

आषाढी एकादशीच्यावेळी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून सात विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. यामध्ये दौंड-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, नवी अमरावती-पंढरपूर, पंढरपूर-कुर्डूवाडी या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय पंढरपूर रेल्वे स्थानकामध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, तिकिट खिडक्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी निघालेल्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीनं आज दुपारी साडेबारा वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. बार्शी- परंडा रस्त्यावरच्या वारदवाडी फाटा या गावात या पालखीनं आज दुपारी प्रवेश केला तर आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनंही आज धर्मपुरी या गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्हा प्रशासनानं या पालख्यांच्या स्वागताची तयारी केली होती तसंच आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वीज आणि वाहतूक व्यवस्था चोख ठेवली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...