आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२६ जून २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
पवित्र रमजान
महिन्यातल्या उपवासानंतर मुस्लिम बांधव आज ईद उल फित्र - अर्थात रमजान ईद साजरी करत
आहेत. ईदनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर
राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद निमित्त ठिकठिकाणच्या
दर्ग्यात मुस्लिम बांधव नमाज अदा करत आहेत. औरंगाबाद शहरातही छावणीतल्या इदगाह मैदानावर
अनेक मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज अदा केली.
****
भारतानं पाकिस्तानमधले
दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईला जगभरातून कोणीही विरोध
केला नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत व्हर्जिनिया इथं
भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. लक्ष्यभेदी कारवाईमुळे भारताची
ताकद समोर आल्याचंही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या तीन वर्षाच्या काळात सरकारवर
भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचं त्यांनी नमू्द केलं. तसंच स्वयंपाकाच्या गॅस वरचं
अनुदान सोडल्यामुळे गरिबांना फायदा होत असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान
आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेणार आहेत.
****
माहितीच्या सत्यतेची
पडताळणी न करता देण्यात येणाऱ्या बातम्यांमुळे विश्वासार्हतेला तडा जात असल्याची खंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या मराठी पत्रकार परिषदेच्या
वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल नागपूर इथं बोलत होते. सोशल
मीडिया आणि ऑनलाईन मीडियावरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत मुखमंत्र्यांनी यावेळी
आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली.
****
शिवसेना पक्ष
प्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून समृद्धी महामार्गच्या भूसंपादनामध्ये
बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास शिवसेना
सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांबरोबर राहील अशी ग्वाही, ठाकरे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या
पुणतांबा इथल्या शेतकरी मेळाव्यात दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
शेवगाव इथल्या माजी सैनिकासह त्याच्या कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचा तपास लागला असून,
दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांनी हत्येची कबुली दिल्याचं पोलिसांनी
सांगितलं. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.
****
No comments:
Post a Comment