Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि अमेरिकेनं मिळून केलेल्या
कामाचा फायदा जगाला नेहमीच झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांनी, भारत आणि अमेरिका दहशतवाद,
नक्षलवाद यासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात एकमेकांना सहकार्य
करत असल्याचं म्हटलं आहे. डेंग्यूची लस विकसित करणं, ग्रहांचा अभ्यास करणं, आपत्ती
निवारण यासारख्या अनेक क्षेत्रात भारत आणि अमेरिकेची भागीदारी असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान आज अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
****
ओडिशातल्या पुरी इथं काल सुरु
झालेल्या भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या जगप्रसिद्ध रथ यात्रेसाठी जगभरातून
पर्यटक आणि भाविक पुरी इथं दाखल झाले आहेत. तीन जुलैला होणाऱ्या बहुदा यात्रेपर्यंत
इथंच राहून देव पुन्हा परतीचा प्रवास करतील.
दरम्यान, बरिपाडा इथं यात्रेचं
धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. या यात्रेत विदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले
आहेत.
****
राज्यात आजही अनेक ठिकाणी पावसानं
हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर सातारा परिसरात आज पाऊस पडल्याचं वृत्त
आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदी पातळीत वाढ झाली असून, राजाराम बंधाऱ्यावर
धोकादायक स्थितीत वाहतूक सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या चोवीस
तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. पुढचे ४८ तास मध्य महाराष्ट्र आणि
विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं
वर्तवली आहे.
****
राजर्षी शाहू महाराज जयंतीनमित्त
आज ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. यानिमित्त आजचा दिवस सामाजिक न्याय दिन
म्हणूनही पाळण्यात आला. विधान भवनात आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शाहू महाराजांच्या
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी कसबा बावडा इथल्या लक्ष्मीविलास पॅलेस या शाहूंच्या जन्मस्थळाला भेट देऊन
त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी
जागतिक कीर्तीचं संग्रहालय व्हावं, यासाठी निधी घोषित केला असल्याची माहिती पाटील यांनी
यावेळी दिली.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी
गणेश निऱ्हाळी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
सामाजिक न्याय दिनानिमित्त औरंगाबाद,
नांदेड, बीड, लातूर, नाशिक, धुळे आदी शहरांमध्ये समता दिंडी काढण्यात आली होती.
****
दरम्यान, कोल्हापूर इथं आज ज्येष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार
आहे. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
सरकारनं सुकाणू समितीचा प्रस्ताव
नाकारुन कर्जमाफीचा निर्णय घेत राज्यातल्या शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप समितीचे सदस्य
सुभाष लोमटे यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सरकारच्या
या निर्णयाविरोधात सुकाणू समितीतर्फे येत्या नऊ जुलै ते २३ जुलै दरम्यान नाशिक इथून
राज्यभर जनजागरण दौरा सुरु करणार असल्याचं लोमटे यांनी सांगितलं.
****
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत
पहिल्या फेरीसाठी पर्याय अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
औरंगाबाद शहरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दिवसभर गर्दी केली होती. रमजान
ईदनिमित्त सुटी असली, तरी प्रवेश प्रक्रियेची सर्व यंत्रणा सुरु ठेवली असून, विद्यार्थ्यांना
कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतल्याचं तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक महेश
शिवणकर यांनी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या
मुख्य कार्यकारी समितीनं, निर्णय पुनरावलोकन प्रणाली - डी आर एसच्या नियमावलीत सुचवलेल्या
बदलांना संमती दर्शवली आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू बाद झाल्यावर रिव्ह्यू घेतला,
आणि तिसऱ्या पंचांनी त्याचा निर्णय तटस्थ दिला, तर घेतलेला ‘रिव्ह्यू’ मोजला जाणार
नसल्याचा निर्णय परिषदेनं दिला आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून हा नवीन नियम लागू होणार
आहे. तसंच, ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्येही ‘डीआरएस’ प्रणाली वापरण्यात येणार असून
कसोटी क्रिकेटमध्ये ८० षटकांनंतर वाढणारी ‘रिव्ह्यू’ची संख्या आता वाढवण्यात येणार
नसल्याचंही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment