Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
****
·
वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून
देशभर लागू होणार
·
उपराष्ट्रपती पदासाठी पाच ऑगस्टला निवडणूक
·
शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष
सुरु राहील - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा
आणि
·
दुधाचे दर प्रतिलिटर चार रूपयांनी वाढवण्याचा औरंगाबाद
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय
****
देशातली सर्वात मोठी कर सुधारणा
ओळखली जाणारी वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार
आहे. 'एक कर एक देश' या धोरणानुसार या कर प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्त
केंद्र सरकारनं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात रात्री अकरा वाजता एका विशेष समारंभाचे
आयोजन केले आहे. मध्यरात्री बारा वाजता घंटानाद करून ही प्रणाली लागू झाल्याची घोषणा
केली जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र
मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा आणि डॉक्टर मनमोहन
सिंग यावेळी उपस्थित राहतील.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं
या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. समाजवादी पाटी, द्रवीड मुनेत्र कळघम आणि डाव्या आघाडीसह तृणमूल
काँग्रेसही या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं संबंधित पक्षांच्यावतीनं सांगण्यात
आलं.
****
उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद
अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार असून, त्यापूर्वी पाच ऑगस्टला उपराष्ट्रपती
पदासाठी निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी काल नवी दिल्ली इथं
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
१८ जुलै असून, पाच ऑगस्टला मतदानानंतर लगेचच मतमोजणीही होणार असल्याचं, झैदी यांनी
सांगितलं.
****
पाणीपुरवठ्याच्या मराठवाडा
वॉटर ग्रीडसाठी लवकरात लवकर सल्लागार नेमून प्राधान्यानं कामास सुरुवात करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत पाणीपुरवठा विभागाची आढावा
बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. लहान पाणीपुरवठा
योजनांना सौरऊर्जा संयंत्राच्या माध्यमातून वीज पुरवठा केल्यास खर्चात बचत होईल, सौरऊर्जा
संयंत्रांसाठी केंद्र शासनाच्या एनर्जी इफीसिएन्शी कॉर्पोरेशन कंपनीशी करार करुन कार्यवाही
करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
स्वाईन फ्ल्यूसह जलजन्य साथरोगांवर
उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणांनी जाणीव जागृतीवर भर
द्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. मुंबईसह राज्यात स्वाईन
फ्ल्युच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी काल साथरोग नियंत्रण समितीची
बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात जानेवारी ते जून या कालावधीत स्वाईन फ्ल्यू
सदृश सुमारे साडे सात हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ७२०
जणांना स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं यापैकी २६१ जणांचा मृत्यू
झाला. स्वाईन फ्ल्युचा प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून ऑसेलटॅमीवीर हे औषध
पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं.
****
राज्यातला शेतकरी पूर्णपणे
कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरु राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांचा
२०१७ पर्यंतचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे, शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळाली पाहिजे, असं ते
म्हणाले. शेतकऱ्यांचं संपूर्ण समाधान झाल्याशिवाय समृद्धी महामार्गाचं काम होऊ दिलं
जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. आपल्या या दौऱ्यात ठाकरे यांनी नांदेडसह,
परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना
कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आणलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने’चं राष्ट्रवादी
काँग्रेस स्वागत करत असल्याचं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
तटकरे यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. या योजनेच्या अंमलबजावणीत
पारदर्शकता असावी, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा असल्याचं, तटकरे म्हणाले.
संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करावी, कर्जमाफीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी
वेळोवेळी माहिती द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा झाल्यानंतर त्यासंदर्भातली
जिल्हानिहाय माहिती दररोज सादर करावी, शेतकऱ्यांना नुकत्याच दिलेल्या दहा हजार रुपये
पीककर्जाचा तपशील दोन दिवसांत द्यावा, आदी मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध
उत्पादक संघाने दूध विक्री दरात लीटरमागे चार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे उद्या
शनिवारपासून महानंद दूध ४४ रुपये प्रतिलीटर या दरानं मिळेल. दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू
काश्मीरमध्ये वीरमरण आलेले सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव इथले जवान संदीप जाधव यांच्या
कुटुंबाला दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद
तसंच महापालिकेच्या शाळा डिजीटल करण्यासाठी सौर उर्जा यंत्रणा बसवून दिली जाणार असल्याचं,
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. लातूर शहरातील विद्युत व्यवस्था सु़रळीत करण्यासाठी ४४ कोटी रुपये मंजूर
केले असून, जिल्ह्यातल्या निलंगा, अहमदपूर, उदगीर, औसा या शहरात वीजपुरवठा सुधारण्यासाठी
निधी मंजूर केल्याचं, ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची ८००
कोटी रुपये थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्ते पाडून दिले जाणार असल्याचं ऊर्जामंत्री म्हणाले.
बाबनकुळे यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील तीन वीज उपकेंद्राचं भुमिपूजन झालं.
दरम्यान, उस्मानाबाद इथं वार्ताहर
परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वीज चोरांवर गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या
सर्व पोलिस स्थानकांना अधिकार देण्यात आले असल्याचं सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
८२२ शाळांमध्ये सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपये अनुदान मंजुर केल्याची
माहिती त्यांनी दिली. राज्यातली मद्य विक्रीची दुकानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर नेण्यात आल्यामुळे महसुलात १५ हजार कोटी रुपये
तूट आली असल्याचं सांगतानाच, याबाबतच्या नियमात बदल करुन सात हजार दुकानं पुन्हा सुरु
करण्यार येतील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
****
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारतानं वेस्ट इंडिजवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. काल झालेल्या सामन्यात वेस्ट
इंडिजनं प्रथम फलंदाजी करत, भारतासमोर १८४ धावांचं आव्हान ठेवलं, भारतीय संघाने स्मृती
मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर ४३ व्या षटकांत सात गडी राखून हे लक्ष्य साध्य केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सक्षम करण्यासाठी मिशन दिलासा हे अभियान राबवणार असल्याचं
जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवणं तसंच त्यांना
आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले. लातूर
जिल्ह्यातही हे अभियान राबवलं जाणार असल्याचं, काल सांगण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं काल शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीच्या वतीनं
अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती
करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी
हा मोर्चा काढण्यात आला.
****
गुणवत्तेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी
मोहाला दूर सारून सद्सद्विवेकबुध्दीने आगेकूच करावी, असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते तथा
दिग्दर्शक माधव वझे यांनी केलं आहे. लातूर इथल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या
६६ व्या वर्धापनदिनानिमित्त काल आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत
होते.
दरम्यान, संस्थेच्या अंबाजोगाई
इथल्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध अभिनेते संदीप
पाठक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
****
जालना तालुक्यातला बदनापूर
तालुका उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. जिल्ह्यात परतूर, मंठा तसंच जाफ्राबाद तालुके
यापूर्वीच उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असून, वैयत्तिक शौचालय बांधकामात २०१७-१८
या वर्षात जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****
No comments:
Post a Comment