Sunday, 27 April 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २७ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 April 2025

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.

****

शासनाच्या विविध अभियानातून युवकांसाठी नवनवीन संधी निर्माण होत असल्याचं पंतप्रधानांचं  प्रतिपादन-१५ व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रं प्रदान  

आरोग्य मंत्री जे पी नड्डा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच कर्करोग रुग्णालयात विविध कार्यक्रम  

पोप फ्रान्सिस यांच्यावर काल रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार 

सामाजिक विकासाच्या कामांना सरकारचं कायमच प्राधान्य-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

बीड इथं चंदन तस्करी प्रकरणी आठ आरोपींना सापळा रचून अटक  

आणि 

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, नांदेड जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

****


स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या अभियानातून युवकांसाठी नवनवीन संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल १५ व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्ती पत्रं प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. युवकांचा राष्ट्र उभारणीत असणारा सहभाग विकासाचा वेग वाढवतो, तसंच जगभरात वेगळी ओळख निर्माण करून देत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले... 

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात उत्पादन अभियानाची घोषणा केली आहे. देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी त्यातून मिळेल, यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि, लघु उद्योजकांना चालना मिळेल तसंच देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील, असं पंतप्रधान म्हणाले. 

देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंबईत येत्या एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्ह्ज २०२५ परिषदेबाबत ते म्हणाले... 

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१५ वा रोजगार मेळावा काल देशभरात ४७ ठिकाणी भरवण्यात आला होता. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२१ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 

****

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा - एन.आय.ए. कडे सुपुर्द केला आहे. एन.आय.ए.नं याआधीच घटनास्थळाची पाहणी केली असून आता, याप्रकरणाचा औपचारीक तपास या यंत्रणेमर्फत केला जाईल.

****

प्रसारमाध्यमांनी दहशतवाद विरोधी अभियान तसंच सुरक्षा दलांच्या कारवायांपासून अंतर राखण्याचा सल्ला, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिला आहे. सुरक्षेबाबतची संवेदनशील माहिती देशविरोधी कारवायांसाठी सहायक ठरू शकते, याकडे मंत्रालयानं सर्व माध्यमांचं लक्ष वेधलं. अनियंत्रित वार्तांकनाचा देशहितावर यापूर्वीच्या घटनांमध्ये प्रतिकूल परिणाम झाल्याचं निरीक्षण मंत्रालयानं नोंदवलं आहे. 

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून, केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करा, या माध्यमातून राज्याला देशातलं पहिलं बेघरमुक्त राज्य करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना यावेळी दिल्या. 

****

आरोग्य मंत्री जे पी नड्डा तसंच मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कर्करोग रुग्णालय तसंच हेडगेवार रुग्णालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर एमआयटी महाविद्यालयात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सीएमआयए उद्योग पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. 

****

राज्यात मृत पाळीव प्राण्यांवर अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागानं स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. 

****

पोप फ्रान्सिस यांच्यावर काल रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी, तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. भारताकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोप यांना पुष्पांजली अर्पण केली. पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिल रोजी निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. 

****

सामाजिक विकासाच्या कामांना सरकारचं कायमच प्राधान्य असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल परभणी जिल्ह्यात पोखर्णी इथं श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पवार यांनी आढावा बैठक घेतली. राज्यशासन पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामं वेगानं आणि गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य देत असल्याचं, ते यावेळी म्हणाले. 

परभणी इथं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यातही पवार यांनी संबोधित केलं. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता - एआयचा वापर करुन या क्षेत्राचा विकास साधायचा असल्याचं ते यावेळी म्हणाले.

हिंगोली इथंही अजित पवार यांनी काल भेट दिली. वसमत तालुक्यात गुंज इथल्या मयत सात महिला शेतमजुरांच्या वारसांची सांत्वनापर भेट घेऊन त्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश त्यांनी वितरीत‌ केला. 

****

बीड पोलिसांनी काल चंदन तस्करी प्रकरणी आठ आरोपींना अटक केली. सौताडा शिवारात जामखेड रोड, वंजारा फाटा इथं सापळा रचून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आरोपींकडून चंदनासह इतर साहित्य असा एकूण ४ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

बीड जिल्ह्यात परळी इथं मोकाट गायींच्या तस्करीचा प्रयत्न उघड झाला आहे. या गायींना गुंगीच्या गोळ्या चारण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्या जमिनीवरच निपचित पडून असल्याचं, नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब समोर आली. या गायींची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. संबंधित प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. 

****

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेनुसार अमृतधारा अभियानांतर्गत काल लातूर तालुक्यात मळवटी जलतारा प्रकल्पाला प्रारंभ झाला. उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी उपस्थितांना जलतारा प्रकल्पाचं महत्त्व आणि माहिती सांगितली. सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

****

धाराशिव  जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गालगत वन्यजीव रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तामलवडी पथकर नाका ते पारगाव पथकर नाक्यादरम्यान एकूण १०० पाणवठ्यांची उभारणी केली जात असून, प्रत्येक पाणवठा सुमारे ७०० लिटर क्षमतेचा आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाजवळच पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अभिनव उपक्रमासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

****

 

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथं पालखी दिंडी आणि अभंग आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलतांना पालखीतल्या विठ्ठलाप्रमाणे संभाजीनगरवासियांना पाण्याची आस निर्माण झाल्याचं सांगितलं. 

****

लातूर जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंब्यांचं मोठं नुकसान झालं तर उकाड्यामुळे हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वा-यासह पाऊस झाला. मुखेड तालुक्याच्या होंडाळा इथं अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नायगाव तालुक्यात एक बैल तर कंधार तालुक्यात तीन शेळ्याही वीज पडून दगावल्या. या वादळी वारे आणि पावसानं उन्हाळी पिकांसह आंबे, इतर फळबागांचं तर, काही कच्च्या घरांचंही नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या उष्माघात कक्षात रुग्णांसाठी कुलरसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक ४५ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक चार, धाराशिव ४२ पूर्णांक दोन, बीड ४३ तर परभणी इथं ४४ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments: