Tuesday, 29 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष सत्र बोलावण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी या पत्रात केली आहे. 

****

परशुराम जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शस्त्रास्त्रे आणि पवित्र ग्रंथांमध्ये प्रगल्भ ज्ञानासाठी ओळखले जाणारे भगवान परशुराम यांचे आशीर्वाद प्रत्येकाचं जीवन धैर्य आणि शक्तीने भरतील अशी अपेक्षा, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केली. 

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित युग्म परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि नवोन्मेषप्रणित भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरुन या परिषदेदरम्यान नवोन्मेषाशी संबंधित प्रमुख उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. युग्म अर्थात - Youth, University, Government, and Market, हा एक धोरणात्मक आणि समन्वयात्मक मंच आहे. 

****

वेव्ह्ज २०२५ परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी म्हटलं आहे. वेव्ह्जच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्यविकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी यासंदर्भातल्या लेखात व्यक्त केला. देशातला माध्यम आणि मनोरंजन उद्योग आज अडीच ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त असून सर्जनशीलता, नवोन्मेष आणि स्वयंउद्योजकता क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायचं भारताचं ध्येय वेव्ह्ज २०२५ मधून अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

****

देशभरात पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात टपालाने पाठवता यावं याकरता ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या १ मे पासून ही सेवा सुरु होणार असून, त्यात टपालाने पाठवलेल्या साहित्याचा माग काढण्याची सुविधा आहे. सर्व स्तरातल्या व्यक्ती आणि समूहांच्या सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासाचं साहित्य सहज आणि वाजवी दरात पोहचवण्याची सेवा सरकार देत आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. 

****

भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत असून, जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल भारत-जपान पार्लियामेंट्री फ्रेंडशिप लीगचे अध्यक्ष आणि जपानचे अर्थ,  उद्योग,  व्यापार मंत्री निशिमुरा यासुतोशी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे, थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, क्रीडा संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साठ एकर जागेचा मागणी प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसंच परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही त्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिल्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या श्रीमहानुभाव दत्त मंदिराच्या आलेल्या २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास उचाधिकार समितीने काल मान्यता दिली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चाधिकारी समितीसमोर दूरदृष्य प्रणालीद्वारे हे सादरीकरण करण्यात आलं. या निधीतून भक्तनिवास, सभागृह, ग्रंथालय, स्वच्छता गृह, वाहनतळ आणि परिसर सुशोभिकरण आदी कामं करण्यात येणार आहेत 

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत औषध जनजागृती कार्यशाळा पार पडली. औषधे सौंदर्य प्रसाधन कायदा, औषधे आक्षेपार्ह कायदा, मेडीकल डिवायसेस कायदा, आक्षेपार्ह जाहिराती कायदा अशा विविध विषयावर सविस्तर माहिती देऊन यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

****

पुण्यात, शिवाजीनगर पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणारी टोळी उघडकीस आणून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून २८ लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त करण्यात आलं. कोटक महिंद्रा बँकेनं यासंदर्भात तक्रार दिल्यावर ही कारवाई करण्यात आली. 

****

थायलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या बेसबॉल स्पर्धेत भारतीय संघाने थायलंडचा सहा - पाच असा पराभव करत आशियाई चषक स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. सुवर्ण पदकासाठी भारताचा सामना आज इंडोनेशिया सोबत होणार आहे. 

****


No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...