Monday, 28 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. डॉन न्यूज, एरी न्यूज, आणि जिओ न्यूज या वाहिन्यांचा समावेश आहे. भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रक्षोभक, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या चॅनल्सचे एकूण सहा कोटीहून अधिक सबस्क्रायबर आहेत.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बीबीसीच्या वृत्तांकनावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. या दहशतवाद्यांना मिलिटन्ट्स ऐवजी दहशतवादी असं संबोधलं जावं, अशा आशयाचं पत्र भारत सरकारने बीबीसीच्या प्रमुखांना पाठवलं आहे.

****

जम्मू - काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आज विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर सदनात चर्चा सुरु आहे.

****

चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहीब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड राज्य सरकारने रद्द केली आहे. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सतपाल महाराज यांनी ही घोषणा केली. दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. चारधाम यात्रेसाठी २२ लाख भाविकांनी नोंदणी केली असून यात इतर देशातल्या २५ हजार भाविकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पहलगामचा हल्ला हा देशाच्या आत्म्यावरचा हल्ला असून, त्यावर निर्णायक पावलं उचलण्याची वेळ झाली असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बुलढाणा इथं काल जाहीर सभेत ते बोलत होते.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कालही अनेक ठिकाणी निदर्शनं करत हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क इथं एक भारत हम भारत या स्वयंसेवी संघटनेच्या वतीनं काळे फलक घेऊन पदयात्रा काढण्यात आली, तर नाशिकमधे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला.

****

राज्य शासनाच्या वतीनं आज ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून समारंभपूर्वक मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील. सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी सेवानिष्ठा, सचोटी आणि सौजन्याची कटिबद्धता दर्शवणारी सेवा हक्क शपथ घेतील. या समारंभात अधिनियमानुसार १०० टक्के प्रकरणांमध्ये नियत कालमर्यादेत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सोहळा आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या औद्योगिक वसाहतीत बियर आणि दारूच्या फॅक्टरींना पाणी मिळतं, मात्र शहरातल्या नागरिकांना पिण्याला पाणी मिळत नसल्याची भावना "पाणी की अदालत" या कार्यक्रमात शहरातल्या जनतेनं व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल क्रांती चौक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक, व्यापार, उद्योग, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या विविध मान्यवरांनी शहरातल्या पाणी प्रश्नावर यावेळी भाष्य केलं.

****

बीड इथं विमानतळ उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं असून, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल नियोजित कामखेडा विमानतळाच्या जागेची पाहणी केली. तसंच त्यांनी बीड तालुक्यातल्या वासनावडी ग्राम पंचायत कार्यालय तर जिरेवाडी या ठिकाणच्या सी एस सी केंद्राला अचानक भेट दिली.

****

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या सुप्रसिद्ध परचंडा इथल्या रोकडोबा देवस्थानचा कारभार अखेर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातल्या प्रशासकाकडे गेला आहे. आता या मंदिरात नारायण लोंढे हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मंदिरात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत होते, याशिवाय मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० नुसार रोकडोबा देवस्थानची नोंदणीही झाली नव्हती, त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली.

****

दिल्लीमध्ये काल झालेल्या आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारतानं निर्विवाद वर्चस्व राखत ८३ सुवर्ण पदकांची कमाई केली. दुसरं स्थान मिळवणाऱ्या जपानच्या खात्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कास्यपदकं जमा झाली. २१ देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत, काल श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...