Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
• दहशतवादाविरोधातल्या लढ्यात १४० कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं `मन की बात`मध्ये प्रतिपादन
• नागरिकांना पाच किलोमीटर परिसरात गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• कर्करोगावरील उपचारासाठी केंद्र सरकार लवकरच प्रत्येक जिल्ह्यात डे केअर सेंटर उभारणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
• राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांना उद्यापर्यंत देशातून बाहेर काढण्यात येणार
आणि
• कन्नड तालुक्यातल्या अंबाला इथं सामुदायिक विवाह सोहळ्यात २५५ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू
****
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशवासियांची एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या आपल्या `मन की बात` या कार्यक्रमात केलं आहे. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
हा या मालिकेतील एकशे एकविसावा भाग होता. पंतप्रधानांनी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं व्यथित झाल्याचं सांगितलं. या हल्ल्यातल्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन आणि दोषींना कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आव्हानाचा सामना करण्यासाठी एक राष्ट्र म्हणून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल, असं ते म्हणाले. जागतिक नेत्यांनी या कठीण काळात भारताला पाठिंबा दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. के. कस्तुरीरंगन यांचं नुकतंच निधन झाल्याचा उल्लेख करुन त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याला उजाळा दिला. भारतातर्फे इतर देशांमधे केल्या जात असलेल्या मानवतावादी मदतीची आणि मानवतेप्रती भारताची वचनबद्धताही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. अलिकडेच म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारतानं `ऑपरेशन ब्रह्मा` अंतर्गत म्यानमारमध्ये केलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. तसंच विविध देशांना भारताच्या वतीनं केल्या जात असलेल्या वैद्यकीय मदतीची माहिती पंतप्रधानांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेल्या `सचेत` या मोबाईल ॲपविषयी पंतप्रधानांनी नागरिकांना माहिती देऊन या ॲपचा वापर करण्याचं आवाहन केलं.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये, शासकीय कर्करोग रुग्णालयातील `ट्रू बीम युनिट` या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचं आणि कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरिकांना आपल्या घरापासून नजीकच आरोग्यसुविधा देण्याला सरकारचं प्राधान्यक्रम असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रेडिएशन ऑनकोलॅाजी विभागात कार्यान्वित करण्यात आलेलं `ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर` ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली असून, ही प्रणाली अचूक,नावीन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार प्रदान करते. रुग्णाच्या गरजेनुसार क्लिष्ट ठिकाणी असणाऱ्या कर्करोगाच्या गाठीवर उपचार करण्यास याद्वारे सुलभता येते. या द्वारे प्रामुख्यानं मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत होणार आहे. केंद्र सरकार कर्करोगाप्रती गंभीर असून सर्वसामान्यांच्या सुलभतेसाठी अनेक निर्णय घेत असल्याचं केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सांगितलं, ते म्हणाले...
बाईट – केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा
****
महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
****
राज्याची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरांत आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या 'पुणे अर्बन डायलॉग-आव्हानं आणि उपाय' कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अशा मंथनांचा यासाठी उपयोग होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यात वाढत्या नागरिककरणाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन तीन शहरंच नव्यानं वसवली आहेत. इतर अस्तित्वातल्या शहरांत नवीन सुविधा करणं आवश्यक असून ते आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण जो नागरी आराखडा करतो तो अंमलबजावणी योग्य असला पाहिजे. अंमलबजावणीची व्यूव्हरचना, त्यासाठी निधी उभारणीची व्यूव्हरचना पाहिजे. तसंच अंमलबजावणीची इच्छाशक्ती असली पाहिजे, असही फडणवीस यावेळी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या अंबाला इथं सामुदायिक विवाह सोहळ्यात २५५ जणांना विषबाधा झाली. परवा- शुक्रवारी या सोहळ्यात जेवणानंतर, काही लोकांना जुलाब, उलटी सारखे त्रास सुरु झाला. या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा, वडनेर, औराळा आणि ग्रामिण रुग्णालय कन्नड इथं उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील एका ८ वर्षीय बालकाचा रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर या संदर्भात माहिती देताना म्हणाले...
बाईट - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर
****
राज्य शासनानं उद्या २८ एप्रिल हा दिवस राज्यातल्या जनतेसाठी तसंच सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये जिल्हाधिकारी पालकमंत्री, खासदार, आमदार आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून समारंभपूर्वक मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील. सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी सेवानिष्ठा, सचोटी आणि सौजन्याची कटिबद्धता दर्शवणारी सेवा हक्क शपथ घेतील. या समारंभात अधिनियमानुसार १०० टक्के प्रकरणांमध्ये नियत कालमर्यादेत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात येणार आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं आज श्रीलंकेविरुद्ध कोलंबो इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात नऊ गडी राखून सहज विजय मिळवला. श्रीलंका संघानं ठेवलेलं १४८ धावांचं लक्ष्य भारतीय महिला संघानं केवळ एक गडी गमावत साध्य केलं. यात प्रतिका रावलनं नाबाद ५० तर हरलीन देवलनं नाबाद ४८ धावा केल्या. भारतातर्फे स्नेहा राणानं तीन तर दिप्ती शर्मा आणि नरलापुरेड्डीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. या मालिकेत भारत आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिकेचा संघ सहभागी झाला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इथल्या सामन्यात मुंबई इंडीयन्स संघानं लखनऊ सुपर जायंटस संघासमोर विजयासाठी २१६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. रयान रिकल्टनच्या ५८ आणि सुर्यकुमार यादवच्या ५४ धावांच्या बळावर मुंबई संघानं निर्धारित २० षटकांत सात बाद २१५ धावांचा पल्ला गाठला. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा लखनऊ सुपर जायंटस संघानं पाचव्या षटकांत एक बाद ४० धावा केल्या आहेत. आजचा दुसरा सामना संध्याकाळी दिल्लीत, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होईल.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य गौरव रथयात्रेचा कोकणातला प्रारंभ आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे इथं झाला. या वेळी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार शेखर निकम तसंच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
****
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर आज बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. के. कस्तुरीरंगन यांचं २५ एप्रिल रोजी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
****
No comments:
Post a Comment