Wednesday, 30 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता.

****

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या एका उपाहारगृहात काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. १४ जणांचे मृतदेह सापडले असून, अनेकांना सुरक्षित बाहेर काढल्याचं पोलिसांनी सांगितलं. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम इथं सिंहाचल मंदिरात चंदनोत्सवादरम्यान आज पहाटे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले. जोरदार पावसामुळे मंदिरात उभारलेल्या मंडप भिंतीवर कोसळला आणि ही भिंत मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर पडली. राष्ट्रीय आणि राज्य राखीव दलाची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहिर करण्यात आली आहे.

****

साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी  करणं  शुभ मानलं जातं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धि आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे. समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टीकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शन करत असल्याचं सांगत, पंतप्रधान मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

****

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे पारंपरिक पद्धतीनं उघडण्यात आले असून, आजपासून चार धाम यात्रेला सुरुवात झाली. केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडतील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी उघडतील.

****

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. १४ मे रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.

****

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन आणि सुवर्ण महोत्सवी वर्षातल्या पदार्पणाचा कार्यक्रम महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वृक्षारोपण करुन उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, महाबीज विक्रेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी महाबीज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांनी कामांचं योग्य नियोजन करून वेळेच्या आत कामं पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात बुलढाणा इथं झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. येत्या पावसाळ्यामध्ये वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी संयुक्तरीत्या वृक्ष लागवड योजना राबवून प्रामुख्यानं आयुर्वेदासंदर्भातल्या झाडांची लागवड करावी, अशी सूचनाही जाधव यांनी संबंधित अधिका-यांना त्यांनी यावेळी केली.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत काल बीड शहरातल्या तीन परीक्षा केंद्राना अचानक भेट दिली. या ठिकाणी ३६ कॉपीबहादर आढळले असून, त्यांचा ’संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ करण्याचे आदेश कुलगुरू फुलारी यांनी दिले. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा कालपासून सुरु झाल्या.

****

मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक अधिका-यांनी नाविण्यपूर्ण, लोकाभिमूख, गतीमान अभियान राबवून स्वच्छता ठेवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नागरीकांशी संवेदनशीलपणे व्यवहार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल बीड जिल्ह्यात गेवराईत बंद पाळण्यात आला. शहरातली बाजारपेठ पूर्ण बंद ठेऊन पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला.

****

हिंगोली शहरात आझम कॉलनी भागात आग लागून चार दुकानांतलं साहित्य जळून खाक झालं. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल जवानांच्या सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

थायलंडहून भारतात हवाई मार्गानं हायड्रो गांजा मागवून देशात विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. या टोळीतल्या दहा जणांमध्ये परदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधिक्षक, हवाला व्यवहार करणारे दोन जण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

****

परभणी पोलिसांनी काल गावठी पिस्टल, तलवार आणि घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यासंदर्भातली गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...