Monday, 28 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 April 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भारताचा फ्रान्ससोबत संरक्षण करार-दोन युद्धनौकांवर २६ राफेल विमानं तैनात होणार

·      राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या परतीच्या प्रवासावर पूर्ण लक्ष-मुख्यमंत्र्यांची माहिती

·      खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध-पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकता कायम राखण्याचं आवाहन

·      मुंबईत येत्या एक मे रोजी वेव्ज् संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

आणि

·      अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश

****

राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात भारताने आज फ्रान्ससोबत संरक्षण करार केला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि फ्रान्सचे त्यांचे समपदस्थ सेबेस्टियन लेकॉर्नू यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या २६ विमानांपैकी २२ विमानं एकआसनी तर चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल. ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जाणार आहेत.

****

राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांशी प्रशासनाचा संपर्क झालेला असून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सर्वांना परत पाठवण्यात येत आहे. या सर्वांच्या परतीच्या प्रवासावर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असून, याबाबतची आकडेवारी लवकरच सांगण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, मुंबईत तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी परत पाठवलं. ठाणे पोलीस आयुक्तालयानेही उल्हासनगर भागात तात्पुरत्या व्हिजावर राहात असलेल्या १७ पाकिस्तानी नागरिकांवर नजर ठेवायचे निर्देश दिले आहेत. त्यांना परत जाण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी २०० पाकिस्तानी नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली असून तात्पुरत्या व्हिजावर आलेल्या तिघांना परत पाठवलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नवी मुंबईत २२९ पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिजावर राहात आहेत किंवा व्हिजा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

****

यवतमाळ जिल्ह्यात १४ पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिजावरील असून त्यापैकी १० हिंदू आहेत तर ४ मुस्लिम आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज आढावा घेतला त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या सर्वांना भारतात राहण्याबाबत तूर्तास अडचण नसल्याचं उईके यांनी स्पष्ट केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ५७ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, हे सर्वजण दीर्घकालीन व्हिजावर आहेत. या सर्वांशी नियमित संपर्क असल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत, या मुद्यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले

बाईट - खासदार असदुद्दीन ओवैसी

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या चॅनल्सचे एकूण सहा कोटीहून अधिक सबस्क्रायबर आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बीबीसीच्या वृत्तांकनावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या बातम्यांमधे पहलगामच्या हल्लेखोरांचा उल्लेख मिलिटन्ट्स म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक असा करण्यात आला होता. तो बदलून त्यांना टेररिस्ट म्हणजे दहशतवादी असं संबोधलं जावं, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारने बीबीसीच्या प्रमुखांना पाठवलं आहे.

****

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वुर हुसैन राणा याला आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. राणाची १८ दिवस कोठडीची मुदत आज संपली, त्यावर एनआयएने आणखी १२ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.

****

पर्यटन क्षेत्राला चालना तसंच पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ही माहिती दिली. येत्या १ ते ४ मे, दरम्यान महाबळेश्वर इथं होणाऱ्या महोत्सवात हे दल प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, त्यात सात पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज पहिल्या टप्प्यात ७१ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे.

****

मुंबईत येत्या १ ते ४ मे दरम्यान जागतिक दृकश्राव्य मनोरंजन संमेलन-वेव्ज् चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जियो वर्ल्ड सेंटर इथं आयोजित या संमेलनात ३३ देशांतील मंत्री, १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

मत्स्योत्पादनात मूल्यवर्धन आणि पायाभूत सुविधा बळकट करण्याची गरज केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत कोस्टल स्टेट्स मीट २०२५ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. किनारपट्टीवरची राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी मत्स्योत्पादनात मूल्यवर्धनासाठी काम केल्यास, फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेतच नाही, तर मासेमारांच्या जीवनातही भरीव योगदान ते देऊ शकतात, असं राजीव रंजनसिंह यांनी नमूद केलं, ते म्हणाले

बाईट - केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह

****

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसंच भविष्यातील नियोजनाकरता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आज मुंबईत एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते. एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बांधकाम, वाहतूक, कामगार, आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येकी एक अशा प्रकारे पाच तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

राज्यात हजारपेक्षा जास्त सेवा लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्यांतर्गत अधिसूचित केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यातल्या बहुतेक सेवा या ऑनलाईन तत्वावरही राबवल्या जाणार आहेत. या संदर्भात मेटाशी संपर्क साधून गव्हर्नन्स व्हॉटसॲपवर उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका मुख्यालयात आज सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेवेची बांधिलकी मानणारी सामुहिक शपथ घेण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने विविध ८१ सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहेत. यासंदर्भात जनजागृतीसाठी यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ विषयी माहिती फलक मनपा मुख्यालयात लावण्यात आला.

****

परवा ३० तारखेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे संभाव्य बालविवाह होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका आणि गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाने बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार केला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

काल २७ एप्रिलला घेण्यात आलेल्या राज्य सामाईक परीक्षा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्तराचे चुकीचे पर्याय दिलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या मागणीचं पत्र सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असं सपकाळ यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यामध्ये कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाला येत्या १ मे पासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे. हे अभियान १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

****

राज्यात आज सर्वाधिक ४२ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान लोहगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड इथं सुमारे ४२ अंश तर परभणी इथं ४२ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: