Wednesday, 30 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय-कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरीची घोषणा

·      मुंबईत आयोजित वेव्हज परिषद मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

·      राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा विभागीय पुरस्कार जाहीर

·      अक्षय्य तृतीयेनिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना 

आणि

·      मराठवाड्यात धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगरचं तापमान साडे ४२ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस उष्णतेचा यलो ॲलर्ट

****

काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातल्या सहा व्यक्तींच्या कुटुंबियांना, प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवण्याचा, तसंच कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला.

पी एम यशस्वी या एकछत्री योजनेअंतर्गत ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना, मॅट्रीकपूर्व तसंच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनानं २०२१ ते २०२६ या वर्षांकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.

राज्यात जहाजबांधणी, जहाजदुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणाला मान्यता, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरून पंधरा लाख रुपये करणं, तसंच ॲप आधारित वाहनांसाठी समुच्चयक धोरणालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियमातल्या तरतुदीत सुधारणा करत भिक्षागृहातल्या व्यक्तींना दररोज पाच ऐवजी चाळीस रुपये देण्याचा निर्णय काल घेण्यात आला.

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५, मंत्रिमंडळानं काल मंजूर केलं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली..

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

हरित ऊर्जा निर्मितीसह उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं लक्ष केंद्रित केलं असून, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेनं राज्य अग्रेसर असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. काल मंत्रालयात जलसंपदा विभागासोबत, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेड, या तीन कंपन्यांचे सामंजस्य करार झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सामंजस्य करारांमुळे राज्यात एकूण नऊ उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. आठ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेच्या या उदंचन प्रकल्पांमधून नऊ हजार २०० रोजगार निर्माण होणार आहेत.

****

थॅलेसेमिया आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे' हे अभियान येत्या आठ मे पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या सर्व थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सूचना, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहेत.

****

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी मैदानात उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

****

मुंबईत उद्यापासून ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ वेव्ह्ज संमेलनाला प्रारंभ होत आहे. वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. चार मे पर्यंत चालणाऱ्या या परिषदेतल्या विविध आयोजनांबाबतचा हा संक्षिप्त वृत्तांत...

वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून. विविध विषयांवर चर्चासत्रंआणि अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन’ तसंच वेव्हज प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार  करण्यात येणार आहेत.  क्रिएटोस्पिअरचं उद्घाटन तसंच ‘वेव्हज बझार’, आणि वेव्हज एक्सलेटरलाही पहिल्या दिवशी प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, तसंच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होईल, तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.

आकाशवाणी बातम्यांसाठी, हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर

दरम्यान, जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी वेव्ह्ज परिषद ‘दावोस’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या परिषदेच्या तयारीची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. वेव्ह्ज परिषद मुंबईत आयोजित होणं हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

****

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयांना वर्ष २०२४-२५ साठी पारितोषिकं जाहीर झाली आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल ही पारितोषिकं जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना या श्रेणीत, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला ऑनलाईन पोर्टल मार्फत कर्मचारी बदल्या तर कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना तसंच व्यवस्थापन या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत.

****

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं काल दक्षिण अफ्रिकेचा १५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने सहा बाद २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण अफ्रिकेचा संघ ५० षटकांत २६१ धावांवर सर्वबाद झाला. पाच बळी टिपणारी स्नेह राणा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.

****

साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी  करणं  शुभ मानलं जातं.

दरम्यान, अक्षय्य तृतीयेनिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी अनेक जिल्हा प्रशासनांनी उपाययोजना केल्या आहेत. बालविवाहाच्या संदर्भात कुठलीही माहिती किंवा संशयास्पद घटना आढळल्यास १०९८ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केलं आहे.

****

देशासह राज्यभरात परशुराम जयंती काल साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरातल्या क्रांती चौकापासून औरंगपुऱ्यातल्या परशुराम स्तंभापर्यंत फेरी काढण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं काल शोभायात्राही काढण्यात आली, तसंच एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं.

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा शहराचं ग्रामदैवत भामेश्वर मंदिर इथं भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

धाराशिव इथल्या अनंतदास महाराज मंदिर इथं ब्राह्मण महासंघाच्या वतीनं भगवान परशुराम यांच्या प्रतिमेवर पुष्प गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

****

धाराशिव जिल्ह्यात लोहारा इथं भानुदासराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयातला पदवीदान समारंभ काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य देविदास पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध कौशल्य युक्त शिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचं आवाहन, त्यांनी यावेळी केलं.

****

राज्यात सामाजिक सौहार्द आणि महाराष्ट्र धर्म वाढीस लागावा या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सद्भावना यात्रांचं आयोजन केलं आहे. त्यानुसार उद्या बीड जिल्ह्यात परळीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीने सद्भावना संकल्प करण्यात येणार आहे.

****

लातूर इथं उभारण्यात येत असलेल्या 'सारथी' संस्थेचं विभागीय कार्यालय, मुला-मुलींची वसतीगृहं आणि इतर उपक्रमाच्या इमारत बांधकांमाची आमदार अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. वसतीगृहाच्या नियोजित १२ पैकी ७ व्या मजल्याचं काम सध्या सुरू आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४२ अंश तर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर इथं साडे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवस उष्णतेचा येलो ॲलर्ट जारी केला आहे. तर एक आणि दोन मे रोजी विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

****

No comments: