Saturday, 26 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता.

****

पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. या नागरिकांना परत पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून उत्तर प्रदेशातून आज ८ पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात रवाना करण्यात आलं.

****

जम्मू काश्मिरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याने काल रात्री केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारत पाकिस्तान सीमेवर अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानच्या सौम्य हल्ल्यांना भारतही सौम्य प्रत्युत्तर देत आहे. या हल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

****

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या सय्यद आदिल हुसैन शाह या स्थानिक युवकाचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

****

बांगलादेशी घुसखोरांवर पायबंद घालण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. अहमदाबादमधून यासंदर्भात ४५० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी तसंच हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी जिल्ह्यातली विविध विकासकामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात आज त्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक होणार आहे. या दौऱ्यासाठी त्यांचं सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झालं, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचं  स्वागत केलं. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींची उपस्थिती होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी जिल्ह्यातील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले. परभणीत महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार, हिंगोली जिल्ह्यातील गुंज या गावाला भेट देऊन विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या सात महिलांचा कुटुंबीयांनाही भेट देणार आहेत.

****

शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल ते बोलत होते.

महामंडळाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हजार एकर जागेवर विविध उपक्रम राबवून उत्पन्न वाढवण्याच्या सूचनाही महसूलमंत्र्यांनी या बैठकीत केल्या. त्याबरोबरच शेती महामंडळाच्या कोणत्याही जागा मोफत वापरासाठी न देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

****

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे "टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" हा उपक्रम येत्या ते मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणावरहित काम करावं, कामाप्रती असलेली बांधिलकी जपावी, तसंच लोकसेवेच्या व्यापक भावनेतून, प्रशासकीय कामकाजात अधिक गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या Integrated Government online Training (iGOT) या प्रणालीवर उपलब्ध असलेलं प्रशिक्षण राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावं, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना केल्या आहेत.

****

वाशिम जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील दुसऱ्या टप्प्यात १८९ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील २७ गावे, मंगरूळपीर ३३, कारंजा ३९, रिसोड २७, मालेगाव ३१ मानोरा ३२ गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ६३ गावांमध्ये सुरुवातीला पोखरा योजनेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यासाठी कृषी अधिकारी आरिफ शाह आणि प्रकल्प विशेषज्ञ प्रदीप गुट्टे यांच्या मार्गदर्शनामध्ये गावागावात मशाल रॅली काढण्यात येत आहे.

****

राज्यशासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' आयोजित करण्यात आला आहे. येत्या २ ते ४ मे या कालावधीत हा पर्यटन महोत्सव होणार आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा, पर्यटन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काल आढावा घेतला. या पर्यटन महोत्सवात हेलिकॉप्टर राईड, लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फूड फेस्ट आणि आनंदयात्रा, यासह सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहे.

****

No comments: