Sunday, 27 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.

****

पहलगामच्या हल्ल्यातील दोषींना आणि कट रचणाऱ्यांना अतिशय कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळेल असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या १२१ व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या हल्ल्यामुळं आपलं मन अतिशय व्यथित असून देशातील प्रत्येक नागरिकाला, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्या शोकाकुल कुटुंबांचं दुःख जाणवत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती,  शाळा आणि महाविद्यालयांत चैतन्य होतं, पायाभूत सुविधांच्या निर्मितीस गती मिळाली, लोकशाही बळकटीकरण, पर्यटक संख्येत विक्रमी वाढ, स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ, युवकांसाठी नव्या संधी निर्माण होत होत्या, असं त्यांनी सांगितलं. देशाच्या शत्रूंना हे पसंत नसल्यानं, दहशतवाद्यांसह त्यांच्या आश्रयदात्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटल्यानच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादविरोधी युद्धात १४० कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आणि निर्णायक लढाईचा आधार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपले संकल्प अधिक बळकट करुन एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत असून भारतीयांप्रमाणेच याबाबत तसाच आक्रोश आज संपूर्ण जगात आहे. जगभरातून शोक संदेश येत असून जागतिक नेत्यांसह सर्वांनीच या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून संपूर्ण जग भारतीयांसोबत खंबीरपणे उभं आहे असं मोदींनी स्पष्ट केलं. 

आपल्या संवादात यानंतर मोदी यांनी देशाचे महान वैज्ञानिक डॉक्टर के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाचा उल्लेख करत विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं. म्यानमारमधील भीषण भूकंपात तसंच अफगाणिस्तानसह नेपाळच्या जनतेसाठी भारतानं केलेल्या मदत कार्यांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. 'एक पेड माँ के नाम' अभियानाबाबत बोलतांना मोदी यांनी आपल्या आईच्या नावानं झाडं लावून अभियानात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी केलं. 

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पोप फ्रान्सिस यांच्या अंतिम संस्कारात सहभागी झाल्यानंतर नवी दिल्लीत परतल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मूंनी काल व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स बॅसिलिका इथं पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या सोबत संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभा उपाध्यक्ष जोशुआ डी सूजा देखील उपस्थित होते. 

****

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज काही वेळेपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कर्करोग रुग्णालयातील तसंच हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यायातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित असणार आहेत. एमआयटी महाविद्यालयात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सी.एम.आय.ए. उद्योग पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 

****

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल रात्री धुळे शहरातून जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागींनी हातात मशाल घेऊन हल्लेखोर दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त केला.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात बांदा हे गाव आता “घुबडांचं गाव” अशा ओळखीनं नावारुपास आलं आहे. त्यामुळं पर्यटनदृष्ट्याही बांदा गावाचं महत्व वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. निसर्गसंपन्नतेबरोबरच जैवविविधता लाभलेल बांदा हे गोव्याच्या सीमेलगत असलेल गाव आहे. तब्बल सात ते आठ दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजातींना शोधण्याच काम या ठिकाणी झालं आहे.  गेल्या वर्षभरात या  परिसरात पावणे दोनशेहून जास्त पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यात आल्यानं बांदा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****

बीड जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथ तालुक्यात गाढे पिंपळगाव इथं दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री पापदंडेश्वराचा पालखी सोहळा काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला.

****

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज मुंबईत दुपारी साडे तीन वाजता मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे, तर आज संध्याकाळी  साडेसात वाजता दिल्लीतील सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होईल. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी ९ सामन्यांतून १० गुण मिळवले असून ते गुणतक्त्यात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ८ सामन्यांतून १२ गुण मिळवून दुसरं स्थान मिळवलं आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं ९ सामन्यांतून ११ गुण मिळवले आहेत. 

****

भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही इथं सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे तपासणी करत तीस गोणी सुगंधित तंबाखूसह दोन जणांना ताब्यात घेतलं. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला.

****


No comments: