Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
· पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ परत पाठवण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना
निर्देश-महाराष्ट्र सरकारकडून ४८ तासांची अंतिम मुदत-त्यानंतर कारवाईचा इशारा
· इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभुषण डॉक्टर के कस्तुरीरंगन यांचं निधन
· सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करु नये-सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना
ताकीद
· मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक तर कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण
आणि
· राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला आजपासून प्रारंभ
****
सर्व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या
पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तत्काळ परत पाठवण्याची व्यवस्था करण्याचे
निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ते आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या
बैठकीत बोलत होते. सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ त्यांच्या
देशात परत पाठवण्याच्या सूचना शहा यांनी दिल्या.
दरम्यान, महाराष्ट्रात राहणाऱ्या
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत आपल्या देशात परत जावं, असे
स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जे लोक या मुदतीनंतरही
परत जाणार नाहीत,
त्यांच्यावर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला, ते
म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
दरम्यान, पहलगाम
दहशतवादी हल्ल्यात हात असलेले आसिफ शेख आणि आदिल गुरी या दोन स्थानिक दहशतवाद्यांची
घरं आज जमीनदोस्त करण्यात आली. या दोघांसह इतर दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून कसून
शोध घेतला जात आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी
अध्यक्ष तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीत प्रमुख भूमिका पार पाडलेले पद्मविभुषण
डॉक्टर के कस्तुरीरंगन यांचं आज सकाळी बेंगळुरु इथे निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.
इस्रोच्या पोलार सॅटेलाईट वेहिकल पी एस एल व्ही च्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा
होता. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु, कर्नाटक माहिती आयोगाचे अध्यक्ष
तसंच बेंगळुरु इथल्या नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ॲडवान्स्ड स्टडीज चे संचालक म्हणूनही त्यांनी
जबाबदारी सांभाळली. २००३ ते २००९ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. कस्तुरीरंगन
यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
उपचार आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात भारत
आता पर्यटकांचा सर्वाधिक ओघ असलेला देश असल्याचं, केंद्रीय आयुष तथा आरोग्य
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल्स
परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. भारताकडे किफायतशीर आणि विश्वासू उपचार
केंद्र म्हणून पाहिलं जात असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल
अवमानकारक वक्तव्य करु नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेतले विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांना दिली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात
झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असं
वक्तव्य केलं तर स्वतःहून कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे. यापुढे अशी वक्तव्य
करणार नाही,
असं आश्वासन राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी
न्यायालयाला दिलं. त्यानंतर न्यायालयानं गांधी यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली.
****
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे
नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मानहानी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या
निजामुद्दीन भागातून अटक केली. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यामुळे ही
कारवाई करण्यात आली. पाटकर यांना दिल्लीतल्या साकेत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
पाटकर यांनी हमीपत्र दाखल करून नुकसानभरपाईची रक्कम जमा केल्यावर त्यांची सुटका करावी, असे
आदेश साकेत न्यायालयानं दिले.
****
मुंबई उच्च न्यायालयाने हास्य कलाकार कुणाल
कामरा याला अटकेपासून संरक्षण दिलं आहे. कामरा याच्याविरोधात दाखल प्राथमिक माहिती
अहवालांतर्गत त्याला अटक करू नये, असे निर्देश न्यायालयानं मुंबई पोलिसांना
दिले आहेत. कामरा याचा जबाब नोंदवायचा असेल, तर तपास यंत्रणेनं चेन्नईला
जाऊन, तिथल्या स्थानिक पोलिसांचं सहकार्य घेण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला आहे.
****
पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिव देहावर उद्या
अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात दुखवटा पाळण्यात येणार
आहे. उद्या दिवसभर कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करू नये, असं
सर्व विभागांना निर्देशित करण्यात आलं आहे.
दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या
अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दोन दिवसांच्या व्हॅटिकन
सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या. जगभरातल्या मान्यवरांसह पोप यांच्या अंत्यसंस्कारात त्या
सहभागी होतील. पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिलला व्हॅटिकन सिटीत निधन झालं. ते ८८ वर्षांचे
होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव
रथयात्रेला आजपासून प्रारंभ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या
उपस्थितीत मुंबईतून ही रथयात्रा सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला येत्या १
मे रोजी ६५ वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवासाठी राज्यभरातून
हुतात्मा स्मारक तसंच तीर्थस्थळांची माती, नद्यांचं जल आणि गडकिल्ल्यांची
माती आणली जाणार आहे.
मराठवाड्यातील ही यात्रा २८ एप्रिल रोजी
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथून सुरु होऊन ३० एप्रिलला छत्रपती संभाजीनगर इथं
पोहोचणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवण्यात येत
असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानांतर्गत आज छत्रपती संभाजीनगर
इथं ‘प्रबुद्ध नागरिक संमेलन’ घेण्यात आलं. या विशेष संमेलनात भाजपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, खासदार
डॉ भागवत कराड आणि ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा
देश टिकवून समृद्ध करायचा असेल, तर बाबासाहेबांच्या विचारांशिवाय पर्याय
नसल्याचं प्रतिपादन डॉ कांबळे यांनी केलं, ते म्हणाले –
बाईट - ज्येष्ठ
साहित्यिक ऋषिकेश कांबळे
****
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं आंतरराष्टीय क्रिकेट समितीकडे भारत आणि पाकिस्तानला
कोणत्याही स्पर्धेत एकाच गटात ठेवू नये, अशी मागणी केली आहे. मात्र दोन्ही
संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचले तर ती वेगळी बाब असेल, असं
बीसीसीआयने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
****
पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना
भारताच्या शेअर बाजारानं प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण १ कोटी रुपये देण्याचा निर्णय
घेतला आहे. स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चंदन यांनी ही माहिती
दिली.
****
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये
आज बंद पाळण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनंही
करण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरभर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात
आला होता.
****
बीड इथे मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर
घेण्यात येत आहे. तीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात विविध खेळांसह योगासन
तसंच कराटे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
****
भगवान परशुराम जयंती येत्या २९ तारखेला साजरी
होत आहे. या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथे आजपासून पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे,
यामध्ये धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबीर, तीन
दिवसीय क्रिकेट स्पर्धा,
आरोग्य शिबिर, तसंच शोभायात्रेचा समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आरोग्य
विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक हिवताप दिन आज पाळण्यात आला. आज शहरातून जनजागृती फेरी, हिवताप
प्रदर्शन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम घेण्यात आले. यासोबतच
हिवताप निर्मुलनाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
****
बीड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस
निरीक्षक सुनिल नागरगोजे यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बडतर्फ केलं आहे.
नागरगोजे हे परभणी इथं नियुक्त असतांना त्यांनी बीडच्या तत्कालीन पोलीस अधिक्षकांना
शिवीगाळ केली होती. तसंच सातत्याने बराच काळ ते कर्तव्यावर येत नव्हते, या
सर्व प्रकरणाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
****
धाराशिव तालुक्यातील वाघोली इथे आज शेतकरी, गावकरी
तसंच शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ कार्यक्रम
साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव पाटबंधारे मंडळचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी
पाणीवापर संस्थेच्या सर्व सभासदांसह उपस्थितांना जलसंवर्धनाचं महत्व पटवून दिलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालय-घाटीत नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारणीसाठी ७१० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात
आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला. आमदार सतीश
चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं होतं.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४५ पूर्णांक नऊ अंश
सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४१
पूर्णांक चार अंश,
धाराशिव ४२, बीड ४३ तर परभणी इथं ४३ पूर्णांक
चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात, उद्या
उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment