Wednesday, 30 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 April 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०

**** 

केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय-ऊसाला प्रति क्विंटल ३५५ रुपये रास्त आणि किफायतशीर दर निर्धारित

वेव्हज परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद- आयएससीईचा दहावी तसंच बारावीचा निकाल जाहीर

आणि

जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अभिनव उपक्रम 

****

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली, ते म्हणाले... 

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

मंत्रिमंडळाने यंदाचा ऊस गाळप हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर प्रति क्विंटल ३५५ रुपये निर्धारित केला आहे. देशभरातले पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने, तसंच साखर उद्योगाशी निगडित कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं. 

****

दरम्यान, जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करेल, असं पवार यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्हज परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान करतील. चार मे पर्यंत चालणाऱ्या या परिषदेत जगभरातून शंभर पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून, विविध विषयांवर चर्चासत्रं, आणि अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन’ तसंच वेव्हज प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून, काही महत्त्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.

****

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.

****

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने आयएससीई इयत्ता १० वी आणि आयएससी इयत्ता १२ वी चे निकाल आज जाहीर केले. दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर ९९ हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दहावीत ९९ पुर्णांक ३७ टक्के गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं तर एकुण ९८ पूर्णांक ८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, बारावीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून ९९ पुर्णांक ४५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे ९८ पुर्णांक ६४ टक्के इतकं राहीलं. विद्यार्थांना cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी मैदानात उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 

लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र दिनी उद्या मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातल्या उत्कृष्ट पाच मंत्रालयीन विभागांचे सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

****

साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धि आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 

****

यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातील गोपालनगर आणि दिग्रस तालुक्यातील डोळंबा इथं अक्षय तृतीयेनिमित्त होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला आज यश आलं. यावेळी प्रशासनाच्या चमुने पोलिसांच्या मदतीने मुला मुलीचे आई वडील यांची समजूत घातली, बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा, तालुका आणि गावस्तरीय अधिकाऱ्यांना अशा कोणत्याही घटनांविरुद्ध सतर्क राहण्याचे आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती दल सक्रिय करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह सर्व उपस्थितांनी प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा महोत्सव समितीतर्फे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने आज सकाळी टीव्ही सेंटर, बळीराम पाटील हायस्कूल, कॅनॉट गार्डन ते आकाशवाणी चौक पर्यत फेरी काढण्यात आली.

****

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज धुळे इथं वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आलं. विविध कार्यक्रमासह शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी आपल्याकडे वापरात नसलेले, सुस्थितीतले कपडे यासाठी देण्याचं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे. उद्यापासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला यासाठीची विशेष घंटागाडी प्रत्येक प्रभागातून फिरणार असल्याचं, आयुक्तांनी सांगितलं. ते म्हणाले... 

बाईट - मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत

****

बालरंगभूमी परिषदेतर्फे कोल्हापूर इथल्या कणेरी मठात आयोजित निवासी कला-संस्कार शिबिरासाठी बीड जिल्ह्यातले २८ शिबीरार्थी सहभागी होणार आहेत. या शिबिरात शिबीरार्थीना सहभोजन, स्वावलंबनाचे धडे गिरवत कला आणि संस्कारांचा आनंद घेता येणार असल्याचं,  याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूर इथून तीन सोन्याच्या दुकानांतून चोरलेल्या दागिन्यांसह एका टोळीला आज भंडारा पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी १४ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाच जणांना अटक केली आहे.

****

नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. हे दोन नागरिक जोपुळ रोड परिसरातील सोहन सिटीमध्ये अवैधरीत्या राहत होते. येत्या १ मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

****

परभणी जिल्ह्यात नांदखेडा इथं शस्त्र बाळगल्याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांकडून चार चाकी वाहनासह १० लाख ३७ हजार २००रुपयांचा मुद्देमाल, गावठी पिस्टल, तलवार आणि इतर शस्त्रं जप्त केली आहेत.   

****

इंडियन प्रीमियर लिग- आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. विशाखापट्टणम इथं होणार हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. 

****

हवामान

राज्यात आज सर्वाधिक ४४ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४१ पूर्णांक सहा अंश, बीड इथं ४२, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक सहा, तर परभणी इथं ४३ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 17 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...