Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
· शासनाच्या विविध अभियानातून युवकांसाठी नवनवीन संधी निर्माण होत असल्याचं पंतप्रधानांचं
प्रतिपादन-१५ व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती
पत्रं प्रदान
· दहशतवाद विरोधी अभियान तसंच सुरक्षा दलांच्या कारवायांपासून अंतर राखण्याचा केंद्र
सरकारचा प्रसारमाध्यमांना सल्ला
· पाळीव प्राण्यांवर अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा
निर्णय
· सामाजिक विकासाच्या कामांना सरकारचं कायमच प्राधान्य-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची
ग्वाही
आणि
· बीड इथं चंदन तस्करी प्रकरणी आठ आरोपींना सापळा रचून अटक
****
स्कील इंडिया, स्टार्टअप
इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या अभियानातून युवकांसाठी नवनवीन संधी निर्माण होत असल्याचं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १५ व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात
विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या
माध्यमातून नियुक्ती पत्रं प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. युवकांचा राष्ट्र उभारणीत असणारा सहभाग, विकासाचा वेग वाढवतो
तसंच जगभरात वेगळी ओळख निर्माण करून देत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.
ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं यंदाच्या
अर्थसंकल्पात उत्पादन अभियानाची घोषणा केली असून, देशातल्या
तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी त्यातून मिळेल, यामुळे
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच, लघु उद्योजकांना चालना मिळेल तसंच देशभरात
रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील, असं पंतप्रधान म्हणाले. तरुणांनी
आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केल्यास विकसित भारताच्या वाटचालीवर त्याचा सकारात्मक
परिणाम दिसून येतो,
असं पंतप्रधानांनी नमूद केलं, ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय
महत्त्वाचं असल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी केला. मुंबईत येत्या १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वेव्ह्ज २०२५ परिषदेचाही पंतप्रधानांनी
उल्लेख केला. या परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल, असं
पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
१५वा रोजगार मेळावा आज देशभरात ४७ ठिकाणी
भरवण्यात आला होता. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
पीयूष गोयल यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप झालं.
आयकर विभागानं मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात
नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम घेतला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी यावेळी २५ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रं वितरित केली.
पुण्यात यशदा इथं केंद्रीय आरोग्य मंत्री
जे पी नड्डा तसंच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या
खासदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचं वाटप करण्यात आलं.
दरम्यान, आरोग्य मंत्री जे पी
नड्डा उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय,
कर्करोग रुग्णालय तसंच हेडगेवार रुग्णालयात विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
स्वदेशी बनावटीच्या पहिल्या कृत्रीम बुद्धिमत्ता
सॉफ्टवेअरचं फाउंडेशनल मॉडल तयार करण्यासाठी सर्वम AI या
स्टार्टअपची निवड झाली आहे. एकूण ६७ प्रस्तावांमधून सर्वम AI ची निवड झाल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
जगातल्या इतर AI
सॉफ्टवेअरच्या तोडीस तोड सॉफ्टवेअर देशात तयार होईल, असा
विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
प्रसारमाध्यमांनी दहशतवाद विरोधी अभियान
तसंच सुरक्षा दलांच्या कारवायांपासून अंतर राखण्याचा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्रालयानं दिले आहेत. सुरक्षेबाबतची संवेदनशील माहिती देशविरोधी कारवायांसाठी सहायक
ठरू शकते, याकडे मंत्रालयानं सर्व माध्यमांचं लक्ष वेधलं आहे. कंदहार विमान अपहरण, कारगील
युद्ध, आणि २६/११ चा मुंबई हल्ला या घटनांच्या वेळी अशाच अनियंत्रित वार्तांकनाचा देशहितावर
प्रतिकूल परिणाम झाल्याचं निरीक्षण मंत्रालयानं नोंदवलं आहे.
****
दरम्यान, सरकारने विमान कंपन्यांना
प्रवाशांची सुरक्षा आणि नियम पालनासंदर्भात अनुकूल उपाययोजना करण्याचे निर्देश दिले
आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही हवाई मार्ग बंद झाल्याने, प्रवासाचा
वेळ तसंच तांत्रिक थांब्यांची शक्यता वाढली आहे. या अनुषंगाने प्रवाशांना मार्गातला
बदल, वाढलेला प्रवासवेळ तसंच इतर बदलांबाबत माहिती देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
प्रवासादरम्यान विमानात पुरेसं जेवण, पिण्याचं पाणी, वैद्यकीय
सुविधा तसंच संभाव्य तांत्रिक थांब्यांच्या दरम्यान विमानतळांवर आपत्कालीन सेवा उपलब्ध
असतील, याची खातरजमा करण्याच्या सूचनाही विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात मृत पाळीव प्राण्यांवर अंत्यविधीसाठी
सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागानं स्थानिक
स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे
निर्देश सरकारने दिले आहेत. या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळामध्ये
प्रश्न विचारून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळं सरकारनं हा निर्णय
घेतल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या
‘मन-की-बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा
हा १२१ वा भाग असेल.
****
पोप फ्रान्सिस यांच्यावर आज रोम इथल्या
‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. जगभरातून विविध देशांचे
प्रतिनिधी,
तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी
उपस्थित होते. भारताकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोप यांना पुष्पांजली अर्पण
केली. पोप यांच्या निधनाबद्दल देशात आज दुखवटा पाळला जात आहे. पोप फ्रान्सिस यांचं
२१ एप्रिल रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झालं.
****
नाशिक इथल्या सार्वजनिक वाचनालयाचे माजी
अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर झेंडे यांचं आज निधन झालं. ते ८८ वर्षाचे होते.
‘नाशिकच्या चौकांचा इतिहास’ हा त्यांनी लिहिलेला संदर्भकोश प्रसिद्ध आहे. आज दुपारी
नाशिक इथं झेंडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
सामाजिक विकासाच्या कामांना सरकारचं कायमच
प्राधान्य असेल,
अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज परभणी
जिल्ह्यात पोखर्णी इथं श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते. परभणी
जिल्ह्यातली विविध विकास कामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पवार यांच्या उपस्थितीत
आज जिल्हास्तरीय बैठक होत आहे, दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रवेशद्वाराकडे पवारांच्या वाहनांचा ताफा जात असताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष
अमोल जाधव,
किसान सभेचे पदाधिकारी शिवाजी कदम, आदींसह
काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी
ताब्यात घेतलं. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
****
बीड पोलिसांनी आज चंदन तस्करी प्रकरणी आठ
आरोपींना अटक केली. तस्करीची माहिती समजल्यानंतर सौताडा शिवारातील जामखेड रोड, वंजारा
फाटा इथं सापळा रचून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आरोपींकडून चंदनासह इतर
साहित्य असा एकूण ४ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४५ पूर्णांक पाच अंश
सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४२
पूर्णांक चार अंश,
धाराशिव ४२ पूर्णांक दोन, बीड ४३ तर परभणी इथं
४४ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment