Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.
****
जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि
मनोरंजन क्षेत्रातली वेव्ह्ज २०२५ परिषद येत्या एक ते चार मे या कालावधीत मुंबईत, बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं होत आहे. या परिषदेचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या प्रमुख
उपस्थितीत होणार आहे. या परिषदेत जगभरातून १०० पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत.
ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया या सर्वच क्षेत्रात देश
प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचं आयोजन होत आहे.
****
लष्करप्रमुख उपेन्द्र द्विवेदी
आज सकाळी श्रीनगरला पोहोचले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी ते भेट देण्याची शक्यता
आहे. काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा तसंच भारत - पाकिस्तान
सीमेवरील पाकिस्तानी कारवाया रोखण्यासाठीच्या सुरक्षा व्यवस्थांचा लष्क़रप्रमुखांनी
यावेळी आढावा घेतला.
दरम्यान, उत्तर काश्मिरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या
सैन्याकडून गोळीबार होत असल्याचं वृत्त आहे.
****
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर
महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. २३२ पर्यटकांना
घेऊन इंडिगोचं तिसरं विशेष विमान आज दुपारी श्रीनगर इथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत
पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी १८४ पर्यटक मुंबईत पोहोचले, तर सुमारे ५०० पर्यटक आतापर्यंत परतले आहेत.
दरम्यान, या पर्यटकांना मुंबईन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी
पाठवण्याचं नियोजन राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी ने केलं आहे. पर्यटकांना धीर
देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे
अध्यक्ष प्रताप सरनाईक काल विमानतळावर उपस्थित होते.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय
बंद पाळण्यात येत आहे.
****
आज जागतिक मलेरिया दिवस आहे.
मलेरियाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराचं नियंत्रण, प्रतिबंध आणि उच्चाटन करण्यासाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी
जागतिक आरोग्य संघटनेनं आयोजित केलेला हा एक जागतिक उपक्रम आहे. मलेरियाचा अंत: पुनर्निवेश, पुनर्कल्पना आणि पुनर्जागृति ही या वर्षीच्या मलेरिया दिनाची
संकल्पना आहे.
****
देशात हरित ऊर्जा परिसंस्था
विकसित करण्यास आणखी वेग येण्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
आणि भारतीय हरित ऊर्जा महासंघ यांच्यात काल एक महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला.
देशात ऊसावर आधारित जैवऊर्जा आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं
हा करार करण्यात आला आहे. या करारावर सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक
प्रकाश नाईकनवरे आणि हरित ऊर्जा महासंघाचे अध्यक्ष अतुल मुळे यांनी स्वाक्षरी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रम मालिकेचा हा १२१ वा भाग असेल. नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आपले विचार
आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर पाठवण्याची मुदत आज संपत आहे.
****
राज्यातल्या ओला इलेक्ट्रॉनिक्स
मोबीलिटी लिमिटेडच्या दुकानांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय - आरटीओनं कारवाई केली आहे.
व्यवसाय प्रमाणपत्रशिवाय किंवा एकाच ट्रेंड प्रमाणपत्राच्या आधारे अनेक दुकानं थाटल्या
प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारावाईदरम्यान, राज्यभरातली ट्रेड प्रमाणपत्रांशिवाय सुरू असलेली ओलाची १२१ दुकानं तत्काळ बंद
करण्याच्या सूचना आर टी ओने केल्या आहेत. यासाठी आतापर्यंत ओला कंपनीला १०९ कारणे दाखवा
नोटीस बजावण्यात आल्या असल्याचं आरटीओ कार्यालयानं म्हटलं आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक एकर शेतजमिनीमागे एक जलतारा तयार करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. धाराशिव तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये ग्रामपंचायत विभाग तसंच कृषी विभागाच्या
माध्यमातून ही कामं हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या योजनेचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन धाराशिवचे तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी
केलं आहे.
****
जालना शहरातून छत्रपती संभाजीनगरकडे
एका कारमधून अवैधरित्या वाहतूक केला जाणारा ८५ किलो गांजा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाने पकडला. या कारवाईत पोलिसांनी गांजासह एक कार आणि चार मोबाईल, असा एकूण २८ लाख ९३
हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी
तीन संशयितांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment