Saturday, 26 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. उत्तर प्रदेश राज्यातही पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी प्रत्येक जिल्ह्यातून पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करून त्यांना परत पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत, आज सकाळपर्यंत ८० टक्के पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आलं आहे. उर्वरित पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिल या शेवटच्या तारखेपर्यंत परत पाठवले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

पाकिस्तानने तीन दशकांपासून दहशतवादी गटांना पाठिंबा दिला असल्याची कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी दिली आहे. एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पहलगाम थे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या कबुलीने पाकिस्तानचा या कारवायांमागील हात असल्याचं पुन्हा एकदा उघड झाला आहे.

****

बांगलादेशी घुसखोरांवर पायबंद घालण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. अहमदाबादमधून यासंदर्भात ५५० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

युवकांना स्टार्टटप, स्कील इंडिया सारख्या विविध योजनांमधून मोठ्या संधी मिळाल्या आहेत. त्यांच्यातील क्षमता सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते निश्चितच त्यात ते खरे उतरतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित पंधराव्या रोजगार मेळाव्यात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते या मेळाव्यात ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. मुंबईत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी २५ तरुणांना नियुक्तीपत्रं प्रदान केली. 

****

पहेलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या हिंगोली जिल्हा बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरासह, आखाडा बाळापू, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या भागातही बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

जम्मू काश्मीर मधल्या श्री माता वैष्णवदेवी मंदिराच्या सुरक्षेसाठी जम्मूमधल्या कटरा इथं असलेले नियंत्रण केंद्र पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सक्रीय करण्यात येणार आहे. यासंदर्भात काल श्री माता वैष्णवदेवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. भारतीय लष्कर तसंच सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कटरा इथल्या या नियंत्रण कक्षात कृत्रिम बुद्धीमत्ता आर्टीफिशियल इंटिलिजन्सचा आधार घेत ७०० सी सी टी व्ही कॅमेरे तसंच आधुनिक उपकरणं बसवण्यात येणार आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून मंदिर मार्ग आणि यात्रा मार्गावर देखरेख ठेवण्यात येईल.

****

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा पाटीजवळ आयशर टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावरील धानोरा पाटीजवळ ७० जणांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे काल रात्री हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील हे सर्व रहिवासी असून धानोरा गावात एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आले होते. जखमींवर अंबाजोगाई, अहमदपूर, किनगाव इथे उपचार सुरू आहेत.

****

अंबाजोगाई इथल्या वीज वितरण उपकेंद्राच्या वतीने पॉवर ट्रान्स्मिशनच्या यांत्रिक भागांचं देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज अंबाजोगाईमध्ये अनेक ठिकाणी दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणने केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय-घाटीत नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारणीसाठी ७१० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला. आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं होतं.

****

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ज चा ५ गडी राखून पराभव केला. चेन्नईत झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज ने दिलेलं १५५ धावांचं लक्ष्य सनरायजर्स हैदराबादने ५ गडी गमावत १८ षटकं आणि ४ चेंडूंमध्ये गाठलं. आज या स्पर्धेत कोलकाता इथे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये सामना होणार आहे.

****

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण  करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक हा उपक्रम येत्या ५ ते ९ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

****

No comments: