Monday, 28 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहिर झाले असून, त्यात सात पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज पहिल्या टप्प्यात ७१ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या नामवंतांमध्ये प्रख्यात व्हायोलिन वादक आणि संगीतकार डॉक्टर एल सुब्रमण्यम, पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांचा समावेश आहे. तर पद्मभूषण विजेत्यांमध्ये ख्यातनाम संपादक आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश, चित्रपट अभिनेते अनंत नाग, नंदमुरी बालकृष्ण आणि एस. अजित कुमार यांचा समावेश आहे.

****

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जवळपास ४० मिनिटं ही बैठक झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात काल सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांची देखील भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद देण्याच्या अनुषंगानं सैन्य दलांच्या तयारीचा आढावा घेण्यासह अन्य महत्त्वाच्या मुवर या बैठकीत चर्चा झाली.

****

या दहशतवादी हल्ल्याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन आज होत आहे. हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती अब्दुल रहीम राथेर यांनी देशाच्या विविध भागांतील निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा निषेध केला. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी सरकारच्या वतीने पर्यटकांवरील क्रूर आणि अमानुष हल्ल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करणारा ठराव मांडला.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. समा टीव्ही, डॉन न्यूज, एरी न्यूज, आणि जिओ न्यूज या वाहिन्यांचा समावेश आहे. भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रक्षोभक, खोटे आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या चॅनल्सचे एकूण सहा कोटीहून अधिक सबस्क्रायबर आहेत.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बीबीसीच्या वृत्तांकनावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. या दहशतवाद्यांना मिलिटन्ट्स ऐवजी दहशतवादी असं संबोधलं जावं, अशा आशयाचं पत्र भारत सरकारने बीबीसीच्या प्रमुखांना पाठवलं आहे.  

****

दरम्यान, मुंबई शहरात राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली आहे. पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर भारत सोडून जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या काल संध्याकाळपर्यंत ५३६ इतकी झाली होती.

****

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या भागात काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. कुपवाडा आणि पूंछ भागात झालेल्या या गोळीबाराला भारतीय लष्करानं तत्परतेनं आणि चोख प्रत्यूत्तर दिलं.

****

२६ राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्यासंदर्भातल्या फ्रान्स सोबतच्या करारावर भारत आज स्वाक्षरी करणार आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि भारतातले फ्रान्सचे राजदूत यावेळी उपस्थित असतील. या २६ विमानांपैकी २२ सिंगल सीटर आणि चार डबल सीटर विमानं असतील, त्यांना भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात येणार आहे. या सागरी विमानांमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. ही लढाऊ विमानं आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य सारख्या विमानवाहू जहाजांमध्ये तैनात केली जाणार असून, या विमानांमध्ये प्रगत शस्त्रास्त्र प्रणाली आणि क्षेपणास्त्रे असतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईत आझाद मैदान इथं २० मे रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. लातूर इथं काल डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मातंग समाजाचं अनुसूचित जातीमधलं वर्गीकरण अ, , , , ची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी लातूरमध्ये डॉ. ण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि सकल मातंग समाज लातूरच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

****

राष्ट्रवादी काँग्रेसची गडकिल्ले, माती आणि नद्यांचे जलकुंभ रथयात्रा परवा बुधवारी बीड जिल्ह्यात येणार आहे. या रथयात्रेत सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन, पक्षाचे नेते शेख निजाम यांनी केलं आहे.

****

भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातल्या वलमाझरी ग्रामपंचायतीने संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना विमानवारीसह विविध बक्षिसं देण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ मे पर्यंत सर्व प्रकारच्या घर करासह पाणीपट्टी आणि त्यापूर्वीचे सर्व कर जे भरतील अशा लाभार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येईल. धान्य वाटप, अभयारण्य सफारी अशा बक्षिसांचा यात समावेश आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: