Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.
****
शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात
देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी, भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतासाठी शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हे
संमेलन होत आहे. या तिनही क्षेत्रात सरकार करत असलेल्या कामांची, आणि भविष्यातल्या योजनांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.
देशातल्या शिक्षण क्षेत्राला २१व्या शतकानुसार आधुनिक बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं
ते म्हणाले. युग्म हा मंच भारताच्या नवोन्मेष यात्रेत महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युग्म अर्थात - Youth,
University, Government, and Market, हा एक प्रकारचा
पहिलाच धोरणात्मक मंच असून, यात सरकार, शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रातलं नेतृत्व एकत्र
येत आहे. आत्मनिर्भर आणि नवोन्मेषप्रणित भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरुन या परिषदेदरम्यान
नवोन्मेषाशी संबंधित प्रमुख उपक्रम सुरु करण्यात आले. युग्म या उपक्रमाच्या माध्यमातून, वाधवानी फाऊंडेशन आणि सरकारी संस्थांच्या, एक हजार चारशे कोटी रुपयांच्या एका संयुक्त प्रकल्पातून भारताच्या
नवोन्मेषी धोरणासाठी योगदान देण्यात येणार आहे. याशिवाय, देशात अत्याधुनिक वैज्ञानिक शिक्षण शाखा निर्माण करून संशोधनाला
गती देण्यात येणार आहे.
****
भारतानं संयुक्त राष्ट्रामध्ये
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला असून, पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि पैसा पुरवत असल्याबाबत
पाकिस्तानच्या मंत्रांनी नुकत्याच दिलेल्या कबुलीबाबतही भाष्य केलं आहे. पाक मंत्र्यांची
ही कबुली पूर्ण जगानं ऐकली असल्याचं संयुक्त राष्ट्रांतल्या भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी
योजना पटेल यांनी म्हटलं आहे. भारतावर आधारहीन आरोप करण्यासाठी जागतिक मंचाचा वापर
केल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानची निंदा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातल्या
नेत्यांनी भारताला दिलेल्या समर्थनाबद्दल पटेल यांनी आभार मानले.
****
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र
बोलावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
लिहिलं आहे. दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना
न्याय देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष सत्र बोलावण्याची मागणी या दोन्ही
नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, या मागणीबाबत भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी
या हल्ल्याबाबत आपल्या पक्षाचं काय म्हणणं आहे ते आधी सांगावं, असं भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटलं आहे.
****
परशुराम जयंती आज साजरी होत
आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शस्त्रास्त्रांसह पवित्र ग्रंथांच्या
प्रगल्भ ज्ञानासाठी ओळखले जाणारे भगवान परशुराम यांचे आशीर्वाद प्रत्येकाचं जीवन धैर्य
आणि शक्तीने भरतील अशी आशा, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त
केली.
****
पवित्र चार धाम यात्रा आजपासून
सुरू झाली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल या यात्रेच्या व्यवस्थेचा
आढावा घेतला. येत्या दोन मे पासून भाविकांना केदारनाथ धाममध्ये दर्शन घेता येणार आहे.
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र स्थळांवर हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या
गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी उत्तराखंड सरकारनं चोख व्यवस्था केली असून, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सुरक्षा व्यवस्था कडक
करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या गरीब
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांकरता मदत करण्यासाठी मिशन झेड सुरू करण्यात
आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेमधून
सुरु झालेल्या मिशन झेड अंतर्गत आवश्यक पूरक शैक्षणिक सुविधा आणि मार्गदर्शन मोफत उपलब्ध
करून देण्यात येणार असून, यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून विशिष्ट रक्कम
बाजूला ठेवण्यात येईल.
****
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बुलढाणा
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्यात बालविवाह होत
असल्याचं निदर्शनास आलं तर संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान
केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी आजपासून चार दिवस उष्णतेचा येलो ॲलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment