Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 April 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दहशतवादाविरोधातल्या लढ्यात १४० कोटी भारतीयांची एकजूट
हीच सर्वात मोठी शक्ती: पंतप्रधानांचं `मन की बात` मध्ये
प्रतिपादन
·
कर्करोग निदान आणि उपचाराला सरकारचं प्राधान्य - केंद्रीय
आरोग्यमंत्र्यांची माहिती, छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय कर्करोग रुग्णालयात `ट्रू बीम युनिट` प्रणालीचं लोकार्पण
·
छत्रपती संभाजीनगर इथं कन्व्हेन्शन सेंटर आणि इलेक्ट्रीक
वाहन क्लस्टरसाठी पुरेशी जागा मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
राज्य सरकारच्या वतीनं आज सेवा हक्क दिनाचं आयोजन, सर्व पातळीवर
विविध विभागांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा
आणि
·
नांदेड जिल्ह्याचं तापमान ४३ अंशाच्या वर, परभणी आणि
हिंगोली जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट
****
दहशतवादाविरोधातल्या
लढ्यात देशवासियांची एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते.
या मालिकेचा १२१वा भाग काल प्रसारित झाला. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातून दहशतवादाला
खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते,
त्यांचा भेकडपणा दिसून येतो, असं पंतप्रधान म्हणाले,
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
इसरोचे
माजी अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत पंतप्रधानांनी, विज्ञान,
शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी
दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहील, असं नमूद केलं. याच महिन्यात
आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी,
आज भारत अंतराळ क्षेत्रात जागतिक स्तरावर सामर्थ्यवान देश बनला असल्याचं
नमूद केलं.
म्यानमार
मधला भूकंप, त्यानंतर राबवण्यात आलेलं ऑपरेशन ब्रह्मा, भारताकडून इतर देशांमध्ये केली जाणारी वैद्यकीय मदत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेलं सचेत ॲप, एक पेड मॉं के नाम, आदी विषयांवर पंतप्रधानांनी मन की
बात मधून भाष्य केलं.
****
देशात मोठ्या
प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून, चालू वर्षात
कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केलं असल्याचं, केंद्रीय आरोग्य
मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये, शासकीय कर्करोग रुग्णालयात `ट्रू बीम युनिट` या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचं आणि कर्करोग
संस्थेच्या विस्तारीत भागाचं लोकार्पण, काल नड्डा आणि मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
`ट्रू-बिम लिनियर
अॅक्सलरेटर` ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली असून,
ती अचूक, नावीन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार
प्रदान करते. याद्वारे प्रामुख्यानं मराठवाडा, विदर्भ,
खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास १४ जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना
उपचारासाठी मदत होणार आहे. केंद्र सरकार कर्करोगाप्रती गंभीर असून सर्वसामान्यांच्या
सुलभतेसाठी अनेक निर्णय घेत असल्याचं नड्डा यांनी सांगितलं, ते
म्हणाले...
बाईट
– केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा
सार्वजनिक
आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय
यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी
म्हणाले. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून
तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इतर
मागास कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड तसंच अन्य मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या एमआयटी महाविद्यालयात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सी एम आय ए उद्योग
पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये
सुसज्ज आणि पुरेशी जागा असलेलं औद्योगिक प्रदर्शन आणि सुविधा केंद्र उभारण्यात येईल,
शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करुन,
इलेक्ट्रिक वाहन क्लस्टरसाठी पाच एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं
समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
शासन राबवणार आहे, या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त
होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, पुण्यात काल
वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्रात राहणाऱ्या
पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून, या सर्व नागरिकांना
देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार
राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये पाच हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना
लवकरच देशातून बाहेर काढलं जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इसरोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर काल
बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. के. कस्तुरीरंगन यांचं २५ एप्रिल
रोजी निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.
****
राज्य शासनाच्या
वतीनं आज ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये
जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून समारंभपूर्वक मागील
वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतील.
महाराष्ट्र
लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम
सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सोहळा आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
होणार आहे.
****
शालेय शिक्षणात
पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने स्थगित केला
असला, तरी मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा निर्णय पूर्णत:
रद्द झाला पाहिजे, त्यात कोणतीही राजकीय चालाखी नको, अशी मागणी, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने
केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी मसपाच्या
कार्यकारी मंडळाची तातडीची विशेष बैठक काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली. परिषदेचे
राज्य शासनाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा
असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
धाराशिव
तहसील कार्यालयाच्या क्यु आर कोड, इ - लायब्ररीचं आणि वेबसाईटचं उपजिल्हाधिकारी
शोभा जाधव यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं. ई गव्हर्नन्सच्या दृष्टीनं मुख्यमंत्री
शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत टाकलेलं हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचं जाधव
यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
बाईट
- उपजिल्हाधिकारी शोभा जाधव
****
धाराशिव
जिल्ह्यात "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत २०२४-२५
या वर्षात २६९ जलसाठ्यांमधून तब्बल एक कोटी १० लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढण्याचं
काम अशासकीय संस्थांनी केलं असून, सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी
स्वखर्चाने गाळ वाहून नेऊन ११ हजार हेक्टर क्षेत्रावर पसरवला आहे. या उपक्रमामुळे मुरमाड
आणि खडकाळ जमीन सुपीक झाली असून, आठ हजार ८०० घनमीटर पाणीसाठा
पुनर्संचित करण्यात यश आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या
परळी इथं गायींना गुंगीचं औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या
सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात घडल्यानंतर, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक
करावी अशा सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातल्या स्नेहनगर भागात परवा
रात्री हा प्रकार उघडकीस आला होता.
****
बीड जिल्ह्यातल्या
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरजू लाभार्थीना सेल्फ किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत
सर्वेक्षण पूर्ण करून घेण्याचं आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ३० एप्रिल
पर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहणार आहे.
****
नांदेड
जिल्ह्याचं तापमान ४३ अंशाच्या वर गेलं असून, पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
****
दरम्यान, राज्यात काल
सर्वाधिक ४४ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड इथं
सरासरी ४३, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला उष्णतेचा यलो
अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment