Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून मुंबई इथं प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर,आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी सहा वाजता मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार संयुक्त पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.याबाब्त मंत्रालयातर्फे जाहिर प्रसिध्दी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. आजच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान वंतारा या प्राणी बचाव-संवर्धन आणि पुनर्वसन केंद्राच्या भेटीवर आहेत.त्यापाठोपाठ त्यांचं सोमनाथ मंदिराचं दर्शनही नियोजित करण्यात आलं आहे.
****
देशाचं वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी. संकलन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ पूर्णांक एक शतांश टक्क्यांनी वाढून एक लाख, ८४ हजार कोटी रुपये झालं आहे. जीएसटी संकलन एक लाख, ७० हजार कोटी रुपयांहून अधिक जमा होण्याचा हा सलग बारावा महिना आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं एका सारख्याच क्रमांकाच्या दोन भिन्न मतदान कार्डांबाबत खुलासा करतांना ईपीआईसी चुक किंवा अवैध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.प्रसिध्दी माध्यमांवर याबाबत दोन भिन्न राज्यातील मतदारांचा एकच मतदान - ईपीआईसी क्रमांक असल्याबाबत बातम्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या.मात्र,विधानसभा मतदार संघ,जनसांखिकी आणि मतदान केंद्र यात फरक असल्यानं ईपीआईसी क्रमांक एक असला तरी संबंधीत मतदार त्यांच्या निर्धारीत ठिकाणीच मतदान करु शकतील असं नमूद केलं आहे.यापार्श्वभूमीवर अशा बाबतीत विशिष्ट ईपीआईसी क्रमांक जारी केला जाईल असही सांगण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं एका कुक्कुटपालन केंद्रात बर्ड फ्ल्यूची या पक्षांना होणा-या विषाणुजन्य संसर्गाची बाधा झाल्याचं आढळलं आहे. इथल्या मृत कोंबड्यांच्या तपासणीतून आजाराची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेनेनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बर्ड फ्ल्यू विषयी जनजागरण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दवंडी देऊन माहिती नागरिकांना दिली असून सतर्कता बाळगण्याचे उपायही याद्वारे सांगितले जात आहेत.
****
धाराशिव इथल्या शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आता वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठीचं केंद्र - जेरियाट्रिक ओपीडीची सुरुवात करण्यात आल्याचं वृत्त आहे. भारतात आयुर्मान वाढत असल्याने वृद्धापकाळातील आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संधिवात,मधुमेह,उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता,अशक्तपणा यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरू कतात.जेरियाट्रिक ओपीडीद्वारे वृद्धांना नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि जीवनशैलीबाबत तज्ञांद्वारे सल्ला दिला जाईल. हे केंद्र कार्यान्वयित झाल्यापासून २३६ हून अधिक वृद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे
****
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे. तर,रमजान महिन्याच्या अखेरीस ईद-उल-फित्र साजरी केली जाईल.रमजान महिना तीन धार्मिक सत्रांमध्ये विभागलेला असून दहा दिवसांचे एक सत्र-अश्रा म्हणून ओळखलं जातं.गरीब आणि गरजूंना या महिन्यात विशेष मदत केली जाते.दरम्यान, दाऊदी बोहरा समाजाचा रमजान महिना शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान निमित्त नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत.सामाजिक माध्यमांवर प्रसारीत संदेशात मोदी यांनी रमजानमुळे समाजात शांतता आणि सद्भावनेला प्रोत्साहन मिळेल.तसंच श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिक असलेल्या रमजानच्या महिन्याद्वारे करुणा,दया आणि सेवा या मुल्यांना उजाळा मिळतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
रमजानच्या काळात गाझामध्ये तात्पुरती शस्त्रसंधी करण्याचा प्रस्तावावर इस्राईलने सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या शस्त्रसंधी वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने आज सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.यापूर्वी झालेल्या शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
भारताचा टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलिपल्ली आणि त्याचा जोडीदार कोलंबियाच्या निकोलस बैरिएंटोस यांच्या जोडीनं चिली खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकाराचा किताब जिंकला आहे.
या जोडीनं चिलीच्या सॅनटीआगो इथं झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्जेंटीनाच्या मैक्सिमो गोंजालेज आणि एंड्रेस मोल्टेनी या अव्वल मानांकीत जोडीचा ६-३, ६-२ अशा फरकानं पराभव केला.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत, आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. थोड्याच वेळात दुपारी अडीच वाजता दुबई इथं या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत. भारतानं आजचा सामना जिंकल्यास, उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment