Sunday, 30 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.03.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या आपल्या मन की बातच्या एकशे विसाव्या भागाद्वारे देशवासियांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. त्यांनी हिंदू नववर्षाच्या विविध भाषांमधून शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात असल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. आजचा  सण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगळ्या पद्धतीनं साजरा होत असला तरी  भारताच्या विविधतेत एकता कशी विणली गेली आहे, हे यातून दिसत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. आपल्याला एकतेची भावना सतत बळकट करायची आहे, असं आवाहनही पंतप्रधानांनी यानिमित्त केलं. भारतातील कित्येक स्टार्ट अप उद्योगांनी वस्त्र पुनर्नविकरण सुविधा संदर्भात काम सुरु केलं असल्याचं त्यांनी या आव्हानावर प्रकाश टाकताना सांगितलं. हे उद्योग कपडे आणि चपला-बुटांना नवं रूप देऊन ते गरजवंतांपर्यंत पोहोचवत आहेत. टाकाऊ वस्त्रापासून पासून सजावटीच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरीच्या वस्तू आणि खेळण्यांसारख्या अनेक वस्तू बनवल्या जात असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. टाकाऊ वस्त्रांच्या समस्येकडे लक्ष वेधताना त्यांनी आपल्या समोर उभं असलेलं हे आव्हान खूप मोठं असल्याचं नमुद केलं. ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असा कचरा निर्माण होत आहे, अशा देशांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारतीय दिव्यांग खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १८ राष्ट्रीय विक्रम केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यापैकी १२ महिला खेळाडू असून त्यांच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा मुष्टियोद्धा जॉबी मॅथ्यूचं पत्र पंतप्रधानांनी वाचून दाखवलं. येत्या २१ जून ला होणाऱ्या जागतिक योग दिनाची देशवासियांना आठवण करुन देत ज्यांनी आपल्या जीवनात अद्याप योगाचा समावेश केलेला नसेल तर आता नक्की करा, असं ते म्हणाले. यंदाच्या योगदिनाची संकल्पनाएक वसुंधरा, एक आरोग्य यासाठी योगअशी असल्याचं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुट्यात मुलाणी सक्रिय राहावं असं सांगत जर कोणतीही संस्था, शाळा, सामाजिक संस्था किंवा विज्ञान केंद्र अशा उन्हाळी उपक्रमांचं आयोजन करत असेल तर ते `माय हॉलीडे` यावर पाठवावेत. यामुळं देशभरातली मुलं आणि त्यांच्या पालकांना याबद्दलची माहिती सहजपणे मिळू शकेल असं पंतप्रधानांनी सांगितलं. या उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या `माय-भारत` दिनदर्शिकेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. मुलं आणि त्यांच्या पालकांनी आपल्या सुट्टीचे अनुभव `हॉलीडे मेमरी` ला पाठवावेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी राज्याच्या दौऱ्यावर नागपूर इथं आगमन झालं. त्यांनी या दौऱ्यामध्ये विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन केलं. पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या केंद्रीय स्मारकाला आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी यावेळी पंतप्रधानांचं स्वागत केलं. दीक्षाभूमीला भेट देताना पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर प्रार्थना केली आणि अभ्यागत पुस्तिकेत अभिप्राय नोंदवला.

****

पंतप्रधानांनी नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार आणि गोलवलकर गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

मध्ययुगीन भारतामध्ये भक्ती आंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील तसंच देशातील संतांनी राष्ट्र चेतनेला जागृत ठेवलं त्याच प्रमाणं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक  डॉ. केशव हेडगेवार आणि माधव गोळवलकर यांनी राष्ट्रीय चेतनेला एक नवी ऊर्जा दिली, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. शंभर वर्ष अगोदर जे विचार बीज या मातीत रोवलं गेलं त्याचा एक वटवृक्ष झालेला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठला साधारण वटवृक्ष नाही तर भारताच्या संस्कृतींचा एक आधुनिक अक्षयवट आहे, असं मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते 'तमसो मा ज्योतीर्गमय' या पुस्तकाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. माधव नेत्रालय हे केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण मध्य भारताकरता नेत्र रोगावरील संस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

****

राज्यात आज विविध ठिकाणी मराठी नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर, अकोला इथंही मिरवणूक काढण्यात आली. गोंदिया शहरात विविध महिला संघटनानी एकत्र येत सामूहिकरित्या गुढी उभारत मराठी नवं वर्ष साजरं केलं.

****

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. या संकट काळात भारत खंबीरपणे म्यानमारसेाबत उभा आहे, भारतानं याआधीच, मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. एकूण पाच विमानांमधुन मदत पाठवली जात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी दिली.

****

No comments: