Friday, 28 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी मेवाडचे राजा राणा सांगा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज आज बाधित झालं. आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर सत्ताधारी पक्ष सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत रामजी लाल सुमन यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

कोणत्याही राष्ट्रीय नायकाचा अपमान होऊ नये आणि अशा व्यक्तिमत्त्वांवर टिप्पणी करताना सदस्यांनी अत्यंत संवेदनशील असलं पाहिजे, असं मत सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. यावरुन सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं आपल्या अंतराळ डॉकिंग प्रयोग - स्पेडेक्स मिशन अंतर्गत रोलिंग प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला आहे. डॉकिंग, म्हणजे उपग्रहांची अंतराळातच दुरुस्ती किंवा अंतराळ स्थानकावरील ऑपरेशन सुलभ करणारं अत्यंत गुंतागुंतीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक टप्पा या प्रयोगाने साधला आहे, असं इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितलं. सध्या सुरु असलेल्या मिशनसाठी त्याचा उपयोग केला जाईल, असं ते म्हणाले. रोलिंग किंवा रोटेटिंग प्रयोगात कोणत्याही एका उपग्रहाची परिक्रमा अभ्यासून त्याच्या गतीवर नियंत्रण आणलं जातं. चांद्रयान - चार सारख्या आगामी महत्वाच्या मिशनसाठी या प्रयोगामुळे महत्वाची माहिती मिळू शकते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी परवा रविवारी ३० मार्च रोजी नागपुरात येत आहेत. त्यावेळी त्यांचं भव्यदिव्य स्वागत करण्याची सूचना, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल शहरातल्या महाल भागात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२०वा भाग असेल.

****

राज्यात यंदा २०० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत १०२ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. गेल्या वर्षाच्या अति पावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी आहे. राज्यात आतापर्यंत आठ कोटी १४ लाख ९२ हजार टन उसाचं गाळप झालं असून, त्यातून ७६ लाख ४३ हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे. राज्यात आतापर्यंत नऊ पूर्णांक ३८ टक्के साखर उतारा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे ८६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात २४ लाख टनांची घट अपेक्षित आहे. या महिना अखेरपर्यंत राज्यातला गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

****

कवी नारायण सुर्वे यांच्या ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे करण्यात येणार आहे. तसंच याअंतर्गत राज्यभरात कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी काल मुंबईत केली.

****

बीड जिल्ह्यातल्या बांग्लादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. बीड इथं काल जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी एकूण १० हजार ८४५ अर्ज आले होते. त्यापैकी २७५९ अर्ज हे बेकायदेशीर होते ते रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणात येत्या काळात लवकरच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतील असं सांगून, बहुतांश अर्ज करणारे बांगलादेशी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

****

पालघर जिल्हा परिषदेचा ७६ कोटी ५४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. यावेळी २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प आणि २०२४-२५ चा सुधारित अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सहा पूर्णांक ५० टक्के वाढलेला आहे. या अर्थसंकल्पात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.

****

वाशिम जिल्ह्यातल्या दोन मध्यम प्रकल्पाचे जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात सुमारे २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा हा जलसाठा नऊ टक्क्यांनी कमी आहे. तर सोनल प्रकल्पामध्ये २५ पूर्णांक ७१ टक्के जलसाठा आहे.

****

वरिष्ठ आशियाई कुस्ती विश्वचषक स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा हीनं रौप्य पदक पटकावलं आहे. जॉर्डनच्या अम्मान इथं झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ७६ किलो वजनी गटात कर्गिस्तानची कुस्तीपटू आयपेरी मेडेट किझी हिनं रितिकाचा अतिशय चुरशीच्या सामन्यात सात - सहा असा पराभव केला. या स्पर्धेत एकही गुण न गमावता रितिकानं अंतिम फेरी गाठली होती.

****

No comments: