Wednesday, 28 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.06.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भारतात परतले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं स्वागत केलं. परदेशातला प्रत्येक भारतीय हा राष्ट्रदूत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज श्रीनगरला भेट देणार आहेत. तर, राष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार आज आपलं नामांकनपत्र दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि बहुजन समाज पक्षासहित इतर विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

****

जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. काल इंग्लंड ,रशिया, फ्रान्स,आणि स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांचं कामकाज विस्कळीत केलं. मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कामकाजावर या व्हायरसमुळे परिणाम झाला असल्यानं तिथलं कामकाज थांबवण्यात आल्याचं वृत्त आहे

****

देशभरातल्या वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयातल्या अखिल भारतीय कोट्यांतर्गत राखीव असलेल्या पंधरा टक्के जागांसाठीची प्रवेशप्रक्रिया येत्या तीन जुलैपासून सुरू होत आहे. तीन ते अकरा जुलैदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार असून, पहिल्या फेरीची प्रवेश यादी पंधरा जुलैला जाहीर होणार आहे.

****

इयत्ता अकरावीसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. विद्याथ्यांना आता उद्या म्हणजे एकोणतीस जून च्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे अर्ज करता येतील.

****

रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सावित्री, काळ, गांधारी, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या नद्यांना पूर आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या जिल्ह्यात येत्या चोवीस तासात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.

****

No comments: