Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
****
· शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपयांची कर्जमाफी राज्य सरकारकडून
जाहीर; लोकप्रतिनिधी, सरकारी नोकरांसह कर भरणाऱ्यांना कर्जमाफीतून वगळलं
· येत्या १७ जुलैपासून संसदेचं
पावसाळी अधिवेशन
· हुतात्मा जवान संदीप जाधव
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
· महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारताचा इंग्लंडवर विजय; ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत
के. श्रीकांत पुरुष
एकेरीच्या अंतिम फेरीत
****
राज्यातल्या अडचणीत असलेल्या
शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमार्फत सरसकट दीड लाख रुपये कर्ज
माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय, काल राज्य शासनानं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या कर्जमाफीमुळे ९० टक्के शेतकरी
कर्जमुक्त होतील, असं ते म्हणाले. एकूण ३४ हजार २२ कोटी रूपयांची ही कर्जमाफीची योजना
असून याचा फायदा राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. एक एप्रिल २०१२ ते ३० जून
२०१६ या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. या कर्जमाफीमुळे
४० लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल तसंच दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या
सहा लाख शेतकऱ्यांसाठी ‘एक वेळ समझौता योजना’ राबवण्यात येईल. त्यामध्ये पात्र थकबाकी
रकमेच्या २५ टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, त्या रकमेचा लाभ
शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार
रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असून, जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज भरतील,
त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा होईल असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
एकूण ४० लाख शेतकऱ्यांचा
७-१२ कोरा होणार आहे. आणि त्यासोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत, त्या शेतकऱ्यांना
२५ टक्के पर २५ हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत.
त्यामुळे आपण जर विचार केलात तर एकूण राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी
रुपयांची मदत या माध्यातनं होतेय. अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे.
पीक कर्जासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या
कर्जाचं पुनर्गठन झालेलं आहे, त्या मध्यम मुदतीचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा
लाभ मिळणार आहे. या योजनेतून आजी-माजी लोकप्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी,
निमशासकीय संस्था आणि अनुदानीत संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, यांना वगळण्यात
आलं आहे. कर्जमाफीसाठी निधी उभा करण्यासाठी सर्व मंत्री-आमदार एका महिन्याचं वेतन जमा
करणार आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राज्य सरकार याहून अधिक आर्थिक
बोजा सहन करण्यास असमर्थ आहे, मात्र उर्वरित बाबींवर भविष्यात विचार करता येईल, शेतकरी
पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी शेतीत गुंतवणूक वाढवणार असल्याचं ते म्हणाले.
त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य हमी भाव मिळण्याच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकार
प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असून,
सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचं
सांगत, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, दीड लाख रुपयांच्या
कर्जमाफीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला विरोध जाहीर केला आहे. संघटनेचे प्रवक्ते
महेश खराडे यांनी सांगलीमध्ये पत्रकारांना सांगितलं की, सरकारनं सरसकट शेतकऱ्यांची
कर्जमाफी करायला हवी होती. याबाबतच्या सरकारच्या आश्वासनाला या निर्णयानं बगल दिली
गेली आहे असं ते म्हणाले. या निर्णयामुळे एक कोटी शेतकरी कर्ज माफीविना वंचित राहणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारचं अभिनदंन केलं आहे. भाजपानं
दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवसेना नेते परिवहनमंत्री
दिवाकर रावते यांनी, सर्वसाधारण शेतकरी या कर्जमाफीच्या घोषणेनं आनंदून जाईल असं म्हटलं
आहे.
सरकारनं सात बारा कोरा करण्याचा
शब्द पाळला नाही अशी टीका, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी
केली. सरकारनं सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी मर्यादा न घालता सरसकट कर्जमाफीची मागणी कायम असून, सरकारनं घेतलेला
आजचा निर्णय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षयात्रेचा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
सुकाणू समितीची आज मुंबई इथं बैठक होणार आहे.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या
१७ जुलैपासून सुरु होणार आहे. अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय मंत्री
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय व्यवहार समितीची परवा बैठक झाली. त्यात हा
निर्णय झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे संबंधित तारखांची शिफारस करण्यात
आली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा तेहतिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता
हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय
आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
हुतात्मा
जवान संदीप जाधव यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातल्या
केळगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू - काश्मीरमध्ये
पाकिस्तानच्या हल्ल्यात २२ जूनला संदीप जाधव यांना वीरमरण आलं. बंदुकीच्या हवेत फैरी
झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, जिल्हाधिकारी
नवल किशोर राम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते. जाधव यांना
श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कोल्हापूर
जिल्ह्यातले जवान सावन मानेही या हल्ल्यात शहीद झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातल्या
गोगवे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
अकराव्या
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात काल भारतानं इग्लंडवर ३५ धावांनी
विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करतांना भारतानं ५० षटकात ३ बाद २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल
इग्लंड केवळ २४६ धावांच करू शकला.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान
सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज
पोर्ट ऑफ स्पेन इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
****
ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू
के श्रीकांत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात
श्रीकांतनं चीनच्या युकी शी चा २१-१०, २१-१४ असा पराभव केला.
****
जागतिक हॉकी लिग सेमी फायनल
स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानवर ६ - १ असा विजय मिळवला. या स्पर्धेतला भारताचा पाकवर
हा सलग दुसरा विजय आहे.
******
भारताचा
टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा कॅनेडियन साथीदार आदिल शमास्दीन यांनी लंडन इथं झालेल्या
इल्कले एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
औरंगाबाद इथं आज ‘जागतिकीकरणानंतरचे
मराठी साहित्य’ या प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर
गौरव ग्रंथाचं प्रकाशन लेखक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता शहरातील
तापडिया नाट्य मंदीरात होणार आहे. लेखक -समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले आणि नाटककार-समीक्षक
दत्ता भगत यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे.
****
राजर्षी
शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उद्या साजरा होत आहे. या निमित्तानं
जालना इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सकाळी दहा वाजता विशेष कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमापूर्वी मस्तगड परिसरातल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या
पुतळ्यापासून समता दिंडी काढण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत,
ही समता दिंडी सामाजिक न्याय भवनात विसर्जित होईल.
****
जालना जिल्ह्यातल्या आष्टी
पोलिस ठाण्यात कार्यरत असताना आरोपीविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून पाच
हजार रूपयांची लाच मागणारे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं गुन्हा दाखल केला आहे.
****
राज्यातल्या
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं आठशे रुपये प्रती क्विंटल दरानं
कांदा खरेदी करावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त
होळकर यांनी केली आहे. कांदा आणि सोयाबीनचं प्रलंबित अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात जमा करावं, कांदा बाजार भावात सुधारणा होण्यासाठी कांदा निर्यात प्रोत्साहन
योजनेस दीर्घकाळ मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही होळकर यांनी केली आहे.
****
No comments:
Post a Comment