आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० जून २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
उद्या
साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद इथं योग संवर्धन संस्थेतर्फे
योगदिंडी काढण्यात आली. विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते क्रांतिचौक
इथं मशाल पेटवून दिंडीचं उद्घाटन करण्यात आलं. पैठण गेट, औरंगपुरा मार्गे दिंडी सरस्वती
भुवन शाळेच्या मैदानावर आली. त्याठिकाणी स भु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर,
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिंडीचं स्वागत केलं. योग दिनानिमित्त उद्या
सकाळपासून शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हवामान अनुकूल कृषी प्रकल्प असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी
प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प
सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली
सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं.
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळामुळे बाधित झालेल्या चार हजार गावांमध्ये तर विदर्भातल्या
पुर्णा नदीच्या खोऱ्यात खारपाण पट्ट्यातल्या ९०० गावांमध्ये हा प्रकल्प जागतिक बँकेच्या
अर्थसहाय्यानं राबवला जाणार आहे.
****
ओला कचरा, आणि सुका कचरा यांच्या वर्गीकरणाबाबत
लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश, लातूर जिल्ह्याच्या पालक सचिव मनिषा
म्हैसकर-पाटणकर यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्याच्या नागरी भागात राबवण्यात येत असलेल्या,
‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’, आणि ‘अमृत योजने’चा काल त्यांनी लातूर इथं आढावा घेतला,
त्यावेळी त्या बोलत होत्या. हरित पट्टे विकसित करण्याची मंजूर कामं तत्काळ चालू करावीत,
कामांचे नवे प्रस्ताव येत्या १५ दिवसात सादर करावेत, अशा सूचना म्हैसकर यांनी यावेळी
दिल्या.
****
मतांचं राजकारण देशाला रसातळाला नेतं,
असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त
काल मुंबईत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रपती पदासाठी आपण देशाचं, शेतकऱ्यांचं
भलं करणाऱ्यांची नावं सुचवली होती, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी
शेतकरी सुकाणू समिती आणि राज्य सरकारच्या मंत्री उच्चाधिकार समिती यांच्यात बैठकीची
पहिली फेरी काल झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी या कर्जमाफीसाठी जमीन धारणेची मर्यादा नाही, पात्र शेतकऱ्यांचं एक लाख
रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा सरकारचा प्रस्ताव असून, याबाबतचा निर्णय सर्वसहमतीनं
होणार असल्याचं सांगितलं.
//********//
No comments:
Post a Comment