Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात केळगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात २२ जूनला संदीप जाधव यांना वीरमरण आलं.
यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष
हरीभाऊ बागडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार
उपस्थित होते. जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित
होते.
कोल्हापूर जिल्ह्यातले जवान सावन मानेही या हल्ल्यात शहीद झाले
असून, कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोगवे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले
आहेत. प्रथम ते पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये दाखल होतील. यावेळी उभय देशांदरम्यान
आर्थिक सहकार्य, विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश सहाकार्य वृद्धींगत करण्यावर भर देणार
असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत
दोन्ही देश चर्चा करणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी काल म्हटलं आहे. त्यानंतर ते
अमेरिकेची राजधानी वॉशिग्टंनकडे रवाना होणार आहेत. यावेळी ते अमेरिकेतल्या भारतीय समुहाशी
संवाद साधणार आहे. दौऱ्याच्या शेवटी ते नेदरलँडमध्ये दाखल होणार असून दोन्ही देशांदरम्यानचे
संबंध अधिक बळकट करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं लोकपाल योजनेमध्ये सुधारणा करत या योजनेच्या
कक्षा रुंदावल्या आहेत. या नव्या सुधारणांमुळे एखादी बँक रिझर्व्ह बँकेच्या मोबाईल
बँकींग आणि इलेक्ट्रॉनिक बँकींगबाबतच्या सुचनांचं पालन करत नसल्यास ग्राहक देखील संबंधित
बँकेविरोधात तक्रार करू शकतील. या सुधारणेमुळे बँक लोकपाल, संबंधित बँकेविरोधात सध्याच्या
दंडाच्या रकमेपेक्षा दुप्पट म्हणजे वीस लाखांपर्यंतचा दंड ठोठावू शकते. बँक लोकपाल
ही अर्धन्यायिक संस्था असून ती बँकींग लोकपाल योजना, २००६ च्या अंतर्गत कार्य करते.
बँकेविरोधातल्या ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात
आली आहे.
****
राज्यातल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं
आठशे रुपये प्रती क्विंटल दरानं कांदा खरेदी करावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातल्या
लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे. कांदा आणि सोयाबीनचं प्रलंबित
अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावं, कांदा बाजार भावात सुधारणा
होण्यासाठी कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस दीर्घकाळ मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही
होळकर यांनी केली आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन
परवा सोमवारी साजरा होत आहे. या निमित्तानं जालना इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवनात सकाळी दहा वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमापूर्वी
मस्तगड परिसरातल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून समता दिंडी काढण्यात येणार आहे.
शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही समता दिंडी सामाजिक न्याय भवनात विसर्जित
होईल.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची
पालखी आज वाल्हे इथून लोणंदच्या दिशेनं मार्गस्थ झाली. तर संत श्री तुकाराम महाराजांची
पालखी गवळ्याची उंडवडी इथला मुक्काम संपवून रोटी घाटातून बारामतीकडे मार्गस्थ झाली.
पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज दिघोळ
इथला मुक्काम आटोपून खर्ड्याकडे मार्गस्थ झाली.
शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं
आज उस्मानाबाद शहरात आगमन झालं. शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर रांगोळ्या काढून पालखीचं
स्वागत करण्यात आलं. उद्या सकाळी पालखी तुळजापुरकडे प्रस्थान करणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात रोजगार हमी योजनेत
पावणेदोन कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. वाशी तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत
रस्त्यांची कामं करण्यात आली होती, मात्र तालुक्यातल्या १४ ग्रामपंचायतींनी याबाबत
कोणतीही नोंद ठेवली नाही. ७८ रस्त्यांच्या कामाबाबत हा घोटाळा झाला असल्याचं निदर्शनास
आल्यानं या प्रकरणी पोलिस कारवाई होणार आहे.
****
इंग्लंडमध्ये आजपासून अकराव्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला
सुरुवात होत आहे. स्पर्धेतला पहिला सामना भारत आणि इंग्लंड संघादरम्यान खेळला जाणार
आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment