Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची
विभागनिहाय यादी जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
ते आज औरंगाबाद इथं शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.
कर्जमाफीसंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एक अभ्यास गट स्थापन
करावा, असं ते म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे
घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिवसैनिकांनी गावागावात शेतकऱ्यांच्या
मदतीला उतरावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, ठाकरे यांनी माळीवाडा आणि पळशी इथल्या समृद्धी महामार्ग
बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
भारतात सध्या सुरु असलेला विकास हा भारत आणि अमेरिका या दोन्ही
राष्ट्रांसाठी सारखाच लाभदायक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेची
राजधानी वॉशिंग्टन इथं अमेरिकेतल्या उद्योग जगतातल्या श्रेष्ठींशी संवाद साधताना ते
बोलत होते. अमेरिकेतल्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी
केलं. यावेळी २१ प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज देशभरात उत्साहात साजरी होत
आहे. ईदच्या माध्यमातून समता, एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात येत आहे. मराठवाड्यातही
ठिकठिकाणी ईदची नमाज अदा करुन मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं स्थापन
केलेल्या आठ सदस्यीय समितीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन्
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रशासकीय अधिकारी के. जे. अल्फोन्ज, कृषी तज्ज्ञ
राम शंकर कुरील, गणितज्ञ मंजुल भार्गव हे या समितीचे सदस्य असल्याचं मनुष्यबळ विकास
मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर इथं नियंत्रण
रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं कालच्या दिवसात दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.
काल संध्याकाळच्या सुमारास सुरक्षा दलाची ठिकाणं आणि नागरी वस्त्यांवर त्यांनी गोळीबार
केला. भारतीय लष्करानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी लष्करानं पाकिस्तानी
चौकी उध्वस्त केली.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची
पालखी सुरवडीहून निघून फलटणकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराजांची पालखी सणसरचा
मुक्काम आटोपून निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाली. पालखीचं गोल रिंगण बेलवडी इथं पार पडलं.
पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी दांडेगावहून अनाळेकडे
मार्गस्थ झाली. पालखीचं तिसरं रिंगण आज नागरडोह इथं होत आहे.
दरम्यान, पंढरपूर इथं एकादशीपर्यंत मंदीर २४ तास दर्शनासाठी
खुलं राहणार आहे.
****
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त ठिकठिकाणी
विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात
आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं.
****
राजर्षी शाहू महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन
विरोधी दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं समता दिंडी आणि व्यसनमुक्ती रॅलीचं आयोजन करण्यात
आलं होतं. समाज कल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेतर्फे आयोजित या दिंडीचं
उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सी. व्ही. बच्छाव यांच्या हस्ते
झालं. मिल कॉर्नर, खडकेश्वर मार्गे ही दिंडी औरंगपुरा इथल्या महात्मा फुले पुतळ्याजवळ
विसर्जित झाली.
****
हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला कॅनडाकडून
पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेत भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावं
लागलं. कॅनडानं भारतावर ३-२ असा विजय मिळवला. याआधी त्यांना उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडूनही
पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, या पराभवामुळे भारतीय संघाला या वर्षाअखेर होणाऱ्या
हॉकी विश्व लीग फायनलमध्ये आणि विश्वचषक स्पर्धेत पात्रता मिळवण्यासाठी कोणतीही अडचण
येणार नाही.
****
जर्मनी इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद
नेमबाजी स्पर्धेत भारताच्या यशस्विनी सिंह देसवाल हिनं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात
सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या दहा मीटर पिस्टल सांघिक प्रकारात भारताच्या संघानं
कांस्य पदक पटकावलं. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य
पदकासह भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment