Thursday, 29 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2017

Time – 06.50 AM to 07.00 AM

Language - Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.

****

·      केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या सुधारीत भत्त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी; १ जुलै २०१७ पासून अंमलबजावणी

·      राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चा अध्यादेश जारी

·      कांदा निर्यातीला तीन महिन्यांसाठी परवानगी देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

आणि

·      औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर

****

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या भत्त्यांमध्ये काही सुधारणा करत, केंद्रीय मंत्रीमंडळांनं काल या शिफारशींना मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली, मात्र भत्त्यांबाबत कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचा आढावा घेण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनंतर काल सरकारनं या भत्त्यांना मंजुरी दिली. सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा एकूण ५० लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. १ जुलै २०१७ पासून या भत्त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानं ५३ भत्ते रद्द करण्याची शिफारस केली होती, त्यापैकी १२ भत्ते वगळता अन्य भत्ते रद्द करण्यास सरकारनं मंजुरी दिली. एक्स श्रेणीतल्या शहरांसाठी २४ टक्के, वाय श्रेणीतल्या शहरांसाठी १६ टक्के आणि झेड श्रेणीतल्या शहरांसाठी ८ टक्के घरभाडे देण्याची शिफारस आयोगानं केली होती, ती कायम ठेवली मात्र महागाई भत्ता २५ टक्के झाल्यानंतर त्यात अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के अशी, तर महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचल्यानंतर त्यात, ३०, २० आणि १० टक्के अशी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली. याचबरोबर सुरक्षा दलाच्या विविध भत्त्यातही सरकारनं सुधारणा केली आहे.

****

सरकारी अधिपत्याखालील एअर इंडिया या विमान कंपनीतले आपले समभाग विकण्याच्या निर्णयासही केंदीय मंत्रीमंडळानं तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत एअर इंडियावर सुमारे ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. एकूण कर्जांपैकी ३० हजार कोटी रुपयांचं कर्ज वसूल न होणारं कर्ज म्हणून घोषित करण्याची शिफारस नीती आयोगानं केंद्र सरकारला केली होती.

****

काँग्रेससह विरोधी पक्षांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी काल आपलं नामांकनपत्र दाखल केलं. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. आतापर्यंत या पदासाठी ९५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपल्या नामांकन पत्राची चौथी प्रत दाखल केली. राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या सतरा जुलैला होणार आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी, अर्थात पीडीपी, या काश्मीरच्या सत्तेतल्या भाजपाच्या भागीदार पक्षानं कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याचं, काल जाहीर केलं. आतापर्यंत अट्ठावीस पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला अध्यादेश काल जारी करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७’ च्या माध्यमातून ३४ हजार २२ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार काल त्यासंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

या अध्यादेशानुसार, राज्यातल्या शेतकऱ्यांचं, ३० जून २०१६ पर्यंतचं दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. तसंच, कर्जमाफीसाठी शेतजमिनीच्या मर्यादेचा निकष लावला जाणार नाही, असंही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मात्र कर्जमाफीचा लाभ हा केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा सहकारी बँकांमधून घेतलेल्या कर्जावर लागू असेल तसंच, ज्या शेतकऱ्यांनी २०१६-१७ या वर्षात कर्ज घेतलेल्या, आणि ३० जून २०१७ पर्यंत या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देण्यात येईल, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. मूल्यवर्धित कर आणि सेवा करांतर्गंत नोंदणी झालेल्या आणि १० लाख रूपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेले शेतकरीही कर्जमाफीसाठी अपात्र असणार आहेत.

****

महाराष्ट्रात कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तीन महिन्यांसाठी निर्यातीला परवानगी देण्याची मागणी राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे केली आहे. मुनगंटीवार यांनी काल जेटली यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. या मागणीबद्दल जेटली यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचं, मुनगंटीवार यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात २५ टक्यांनी कांदा उत्पादन वाढलं आहे. तसंच अन्य राज्यातही कांद्याचं विक्रमी उत्पादन झालेलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात येत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी, पक्षानं चार सदस्यीय समिती नियुक्त केली असल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजु शेट्टी यांनी सांगितलं. पुण्यात काल पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक झाली, या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. खोत यांना समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सरकारमध्ये सहभागी असलेले खोत मांडत असलेल्या भूमिका विसंगत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, या मुद्द्यावरून आपल्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. त्यामुळेच ही समिती नेमण्याचा निर्णय संघटनेनं घेतल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरातल्या रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. शहरातल्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २५ कोटी रूपये दिले असून त्यातून काही रस्ते तयार झाले, त्यानंतर उर्वरित रस्त्यांसाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली होती असं दानवे यांनी सांगितलं.

****

राज्य शासनानं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि संवाद मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणातला आरोपी, मोहम्मद डोसा याचा काल मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याचं त्यानं सांगितल्यानंतर, त्याला कारागृह प्रशासनानं काल सकाळी दवाखान्यात दाखल केलं होतं. हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी दिली आहे.

****

कोरडवाहू शेतीसाठी कर्जमाफीची पाच एकराची अट शिथील करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला, भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असल्यानं, यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या १४ जिल्ह्यांमध्ये, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याची सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अन्न, नागरी पुरवठा, आणि  ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकाही आधार क्रमांकाशी जोडण्यात याव्यात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

येत्या १ ते ७ जुलै या सप्ताहा दरम्यान वृक्ष लागवडीमध्ये जालना जिल्ह्याच्या सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

****

No comments: