Tuesday, 27 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.06.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२७ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

केंद्रीय दक्षता आयोग आता खासगी क्षेत्रातल्या बॅंका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करु शकणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि वित्तीय सेवा विभागानं नुकतीच यासंबंधीच्या नियमांना मंजुरी दिल्याचं दक्षता आयोगाचे आयुक्त टी एम भसीन यांनी सांगितलं. भ्रष्टाचार निर्मुलन कायदा १९८८ मध्ये खासगी क्षेत्रातल्या बँकांचे अध्यक्ष, अधिकारी लोकसेवकांच्या श्रेणीत येत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. 

****

नाशिक जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा बुडुन मृत्यू झालां. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा घोटी - सिन्नर रस्त्यावर पहिने गावाजवळ तलावात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत पिंपळगाव बसवंत जवळील मुखेड इथं शेतात खेळत असताना शेततळ्यात पडलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

****

वन विभागाच्या वतीनं चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत ‘वृक्ष आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आला. नगर, पाथर्डी, राहुरी, पारनेर या चार तालुक्यात सहा ठिकाणी रोपं अल्प दारात नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्ह्यात १४ लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे.

****

कर्जमाफीसंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं एक अभ्यास गट स्थापन करावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबे इथल्या शेतकरी गटानं काल मुंबईत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेबद्दल या गटानं नाराजी व्यक्त केली आहे.

****

No comments: