Tuesday, 27 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मुस्तफा डोसाला फाशी देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं न्यायालयात केली आहे. न्यायालयात आरोपींना काय शिक्षा द्यायची यावरुन विशेष टाडा न्यायालयात आज युक्तिवाद सुरु असताना सीबीआयनं मुस्तफा डोसाला आणि फिरोज खानलाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या स्फोटाचा मुख्य सुत्रधार याकूब मेमनइतकीच फिरोज खानचीही भूमिका महत्त्वाची होती असा दावा सीबीआयनं केला आहे.

****

हिजबुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सैयद सलाउद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे संघटनेच्या कारवाया आणि आर्थिक स्त्रोतांवर अंकुश ठेवण्यात मदत होईल, असं केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अमेरिका कटीबद्ध असल्याचं यावरुन दिसून येत असल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातून काहीच हाती आलं नसून, हा दौरा निरूपयोगी ठरला असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेत भारतीयांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या एच वन बी व्हीसा वर चर्चा झाली नाही. त्यामुळे दौऱ्यातून काहीच हाती आलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

****

जाती व्यवस्था आणि जातीच्या आधारावर राजकारणाची पद्धत बंद झाली पाहिजे, असं संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती पदाची ही निवडणूक दलित विरुद्ध दलित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं त्या आज वार्ताहरांशी बोलत होत्या.

****

लोढा समितीच्या शिफारशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सी आयच्या प्रशासनात सहजतेनं कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयनं एका समितीची स्थापना केली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सात सदस्यांचा समावेश आहे. अन्य सहाजणांमध्ये बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्यासह सौरव गांगुली, टी. सी. मॅथ्यू, नबा भट्टाचारजी, जय शाह यांचाही समावेश आहे. लोढा समितीच्या शिफारशींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या १४ जुलैला होणार आहे.

****

मराठी नाटक आणि सिनेमांच्या २५० रुपयांच्या तिकीटांसाठी असलेली सवलतीची मर्यादा ५०० रुपयांपर्यंतच्या तिकीटांसाठी करण्याच्या मागणीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मुंबई इथं मराठी चित्रपट आणि नाट्य व्यावसायिकांच्या वस्तू आणि सेवा करासंबंधीच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. मराठी नाटकांच्या तिकीटांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला असून, यातील नऊ टक्के वाटा केंद्र सरकारला आणि नऊ टक्के वाटा राज्य सरकारला मिळणार आहे. राज्य सरकारच्या वाट्यातून सवलत देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबत विचार करण्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं आता सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसंच प्रत्येक प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवण्याचं नियोजन असून, तसा प्रस्ताव तुळजापूर पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. देशातल्या घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यामुळे यंत्रणा सजग करण्यात येत आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या बोगस वैद्यकीय व्यवसायीकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर पथक नियुक्त करण्याचे निर्देश बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिले आहेत. दर महिन्याला अशा व्यवसायीकांची तपासणी करावी, तसंच त्यांना औषधे आणि वैद्यकीय उपचाराच्या साहित्याचा पुरवठा होणार नाही यांची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते.

****

मराठवाडा आणि विदर्भातही आज पावसाचं पुनरागमन झालं असून, नागपूर, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर, बुलढाणा इथं आज पावसानं हजेरी लावली. नाशिक शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरण साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात आज दुपारपासून मध्यम स्वरुपाचा भिज पाऊस सुरु आहे. 

****

No comments: