Friday, 30 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 30.06.2017 - 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१ दुपारी .००वा.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीची सुरुवात आज रात्री बारा वाजता होणार असून, या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहीष्कार टाकला आहे. विरोधकांनी आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ही कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीनं घेतला असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षांचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जीएसटी लागू झाल्यानंतर कमी झालेल्या करांचा लाभ पारदर्शक पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन जेटली यांनी केलं आहे. नवी दिल्ली झालेल्या उद्योग महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. 
****
आधार क्रमांक किंवा त्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी ओळख क्रमांकाशिवाय करदात्यांना एक जुलैपासून प्राप्तीकर विवरणपत्र भरता येणार नाही, असं आयकर विभागानं सांगितलं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत पॅन रद्द केलं जाणार नाही, असं विभागानं नमू्द केलं आहे. जे नागरिक एल जुलैपर्यंत आधार पॅनशी जोडू शकणार नाहीत, त्यांना ई प्राप्तीकर विवरणपत्र भरताना भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं दिलेल्या क्रमांकाचा उल्लेख करण्याचा पर्याय असेल आणि ते या दोन्ही विशिष्ठ क्रमांकांना जोडण्याचं वैध माध्यम मानलं जाईल, असं प्राप्तीकर विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. तसंच जे पॅन आधारशी संलग्न नाही, ते रद्द केलं जाणार नाही. पॅन साठी अर्ज करताना एक जुलैपासून आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. 
****
युरोपियन नेत्यांनी पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जी - ट्वेंटी शिखर परिषदेत ऐतिहासिक पॅरिस हवामान कराराचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टन बरोबरच्या प्रदीर्घ संबंधांचा आदर आहे, मात्र जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर तोडगा काढण्यापासून मागे हटणार नसल्याचं, जर्मनी, फ्रांस, इटली आणि युरोपियन संघाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. येत्या सात आणि आठ जुलैला जर्मनी इथं होणाऱ्या या परिषदेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे.      
****
मादक पदार्थ सेवन प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. डोपिंगची कारणं शोधून काढण्याला आपलं मंत्रालय प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले.   
****
जम्मू काश्मीरमध्ये हवामानाच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे पहलगाम आणि बालटाल मार्गे जाणारी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे यात्रा काही तासांसाठी थांबवण्यात आली होती. 
****
दक्षिण मध्य रेल्वे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आदिलाबाद, नगरसोल आणि अकोला इथून विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. आदिलाबाद - पंढरपूर ही गाडी तीन जुलैला सकाळी नऊ वाजता आदिलाबाद इथून सुटून दुपारी एक वाजता नांदेड इथं आणि परभणी, परळी, मार्गे चार तारखेला पहाटेच्या सुमारास पंढरपूरला पोहोचेल.
नगरसोल - पंढरपूर ही गाडी नगरसोलहून संध्याकाळी साडेपाचला सुटून औरंगाबाद, परभणी, परळी, लातूर मार्गे पंढरपूरला सकाळी १० वाजता पोहोचेल.
अकोला - पंढरपूर ही गाडी अकोल्याहून तीन जुलैला रात्री आठ वाजता सुटेल. या गाडीचे डबे परभणी इथं नगरसोल - पंढरपूर गाडीला जोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं अतिरिक्त रेल्वे सोडण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
****
आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज माळशिरसहून बेळापूरकडे मार्गस्थ झाली. पालखीचं दुसरं गोल रिंगण खूडुसफाटा इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजचा मुक्काम आटोपून बोरगावकडे मार्गस्थ झाली. माळीनगर इथं पालखीचा उभा रिंगण सोहळा पार पडला. तर पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी कुर्डूहून अरणकडे मार्गस्थ झाली.
****
जुलै ऑगस्ट २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परिक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत शिक्षण मंडळानं वाढवली आहे. उद्यापासून अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केलं आहे. 
****
तुर्की इथं सुरु असलेल्या अंताल्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसचं पुरुष दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपान्त्य फेरीत पेस आणि कॅनडाचा शमसुदीन या जोडीचा माराच आणि पॅविक जोडीनं सहा - चार, सहा - चार असा पराभव केला.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...