Monday, 26 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.06.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 June 2017

Time – 06.50 AM to 07.00 AM

Language - Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.

****

·      देशाचं वैविध्य हे देशाचं वैशिष्ट्य आणि ताकद - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक असला तरी समाधानकारक नाही - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

·      मुस्लिम बांधवांमध्ये आज ईद उल फित्र - अर्थात रमजान ईदचा उत्साह

·      काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय 

आणि

·      ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदंबी श्रीकांतला अजिंक्यपद; वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

****

देशाचं वैविध्य हे देशाचं वैशिष्ट्य आणि ताकद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा ३३वा भाग काल प्रसारित झाला. सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि हरियाणा ही पाच राज्यं उघड्यावर शौचापासून पूर्णपणे मुक्त झाल्याचं सांगत, पंतप्रधानांनी या राज्यांचे आभार मानले. गेल्या बुधवारी २१ जून रोजी जागतिक योग दिनाचं औचित्य साधून संपूर्ण जग योगमय झालं होतं, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक कार्यक्रमात पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक किंवा खादीचा रुमाल दिला तर वाचनाचा आणि खादीचा प्रचार होईल, असं ते म्हणाले.

केंद्र सरकारनं गर्व्हमेंट इ मार्केटप्लेस - इ जीईएम ही यंत्रणा सुरु केली असून, या माध्यमातून नागरिकांना कोणत्याही वस्तू सरकारला विकता येतील, असं त्यांनी सांगितलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं एकावेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचं अभिनंदन केलं. तसंच १९ जूनला भारताच्या मंगळ मोहिमेला एक हजार दिवस पूर्ण झाल्याचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

१९७५ साली आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती, त्यावरही पंतप्रधानांनी भाष्य केलं.  

****

भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात देश अघोषित आणीबाणीचा अनुभव घेत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी नवी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलताना, आणिबाणी ही चूकच होती, हे मान्य करत आम्ही त्यातून धडा घेतला, मात्र सध्या अघोषित आणिबाणी अनुभवत असल्याचं, वडक्कन म्हणाले.

****

शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास शिवसेना सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांबरोबर राहील अशी ग्वाही, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथल्या शेतकरी मेळाव्यात दिली. सरकारनं घेतलेला कर्जमाफीचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं यश आहे असं सांगत, आपण कर्जमाफीचं श्रेय घ्यायला आलो नसल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथंही ठाकरे यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक असला तरी तो समाधानकारक नसल्याचं सांगत ठाकरे यांनी २०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी दिली पाहिजे अशी मागणी यावेळी केली. सरकारनं दीड लाख रुपयांपर्यंत दिलेल्या कर्ज माफीचा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांना लाभ होणार असला तरी सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, असं ते म्हणाले. शेतमालाला हमी भाव द्यावा आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी आता लढा देणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, आज ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून समृद्धी महामार्गच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.  

****

दीड लाख रुपये कर्जमाफीचा सरकारचा वायदा फसवा असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. ते काल मुंबईत सुकाणू समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयाचा लाभ फक्त मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसने कर्जमाफी देताना जमिनीची अट लावली होती तर भाजपने आकड्याची अट लावली असल्यानं, काँग्रेस आणि भाजप हे एकाच्या नाण्याची दोन बाजू असल्याचं पाटील म्हणाले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना २५ हजार रुपये मदत ही घोषणा तोंडाला पान पुसणारी असल्याचंही पाटील यांनी नमूद केलं.

सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी, पीक कर्जासह शेतीचे सर्व कर्जमाफ करण्यात यावे ही आमची मागणी आहे, त्यामुळे. सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं आवाहन करत, येत्या नऊ जुलै रोजी नाशिक इथं सुकाणू समितीच्या बैठकीनंतर राज्य भर संघर्ष यात्रा काढणार असल्याचा इशारा, अजित पाटील यांनी दिला.

****

पवित्र रमजान महिन्यातल्या उपवासानंतर मुस्लिम बांधव आज ईद उल फित्र - अर्थात रमजान ईद साजरी करत आहेत. ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान ईदचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो तसंच त्यातून परस्पर बंधुभाव वृद्धिंगत होवो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. काल मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे तसंच धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातल्या गेल्या वर्षी पुनर्वसन केलेल्या माळीण गावात पहिल्याच पावसात रस्ते खचले असून, घरांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे गावकरी स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. या सर्व गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पाठवली असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. 

मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब आणि वाशी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा तर लातूर जिल्ह्यात मात्र विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. जालना जिल्ह्यात जालना, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर आणि मंठा तालुक्याच्या काही भागात पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यासह औरंगाबाद शहर परिसरातही सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नांदेड जिल्ह्यात मात्र आठवडाभरापासून पावसानं उघडीप दिल्यानं, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

****

ावागावातल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी गावाचं अर्थकारण मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं.

लातूर इथं काल अर्बन बँकेच्या इमारतीचं उदघाटन करतांना ते काल बोलत होते. या संस्थांनी शेतकऱ्यांना सभासद करून घेऊन त्यांना आर्थिक मदत केल्यास गावाचा विकास होण्यास मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले.

मुरुड इथं जनरल इशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि स्वराज्य प्रतिष्ठाण यांच्या वतीनं सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते अपंगांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी बोलतांना देशमुख यांनी समाजानं अपंगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना स्वाभिमानानं जगण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं.

****

मुंबईतलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं क्रांती चौक ते भडकल गेट असा मोर्चा काढण्यात आला. यात विविध दलित संघटना, डाव्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई न करता राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

****

भारताचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतनं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल सिडनी इथं झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं चीनच्या चेन लांग याचा २२-२०, २१-१६ असा पराभव केला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेपाठोपाठ श्रीकांतचं हे सलग दुसरं विजेतेपद आहे.

****

पोट ऑफ स्पेन इथं झालेल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं १०५ धावांनी विजय मिळवला आहे. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या ४३ षटकाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं अजिंक्य राहणे याच्या १०५, शिखर धवनच्या ६३ आणि कर्णधार विराट कोहलीच्या ८७ धावाच्या जोरावर ३१० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ केवळ २०५ धावाचं करू शकला. या विजयामुळे पाच सामन्याच्या मालिकेत भारतानं १- ० नं आघाडी घेतली आहे.

****

जागतिकीकरणाचा खरा चेहरा मराठी साहित्यातून समोर यावा, असं मत प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं आहे. जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य या प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर यांच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन काल औरंगाबाद इथं पठारे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत आणि नागनाथ कोत्तापल्ले यांनी या ग्रंथाचं संपादन केलं आहे.

****

औरंगाबाद इथं २८ गावांच्या झालर क्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देण्याच्या मागणीसाठी काल विविध संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केलं. जालना रस्त्यावर सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे जालना, बीड मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

****

No comments: