Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
****
·
कर्जमाफीसंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास
गट स्थापन करण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी
·
वैद्यकीय तसंच दंत महाविद्यालय प्रवेशासाठी १५ टक्के अखिल
भारतीय कोट्याअंतर्गत येत्या तीन जुलैपासून प्रवेश प्रक्रिया
·
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद देशभरात पारंपारिक पद्धतीनं
उत्साहात साजरी
आणि
·
राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक समता दिनी सर्वत्र
अभिवादन
****
कर्जमाफीसंदर्भात सविस्तर
अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं एक अभ्यास गट स्थापन करावा, असं शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आयोजित
वार्ताहर परिषदेत बोलत होते. आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित
मागे घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ
४० लाख शेतकऱ्यांना मिळाल्याची यादी सरकारनं जारी करावी, शिवसेनेचे आमदार, खासदार सभागृहात
सरकारला या यादीचा हिशेब मागतील, असं सांगतानाच, ठाकरे यांनी, कर्जमाफी योजनेच्या लाभाबाबत
पडताळणी करण्यासाठी येत्या २९ जूनपासून नांदेड ते औरंगाबाद दौरा करणार असल्याचं सांगितलं.
विकासाला शिवसेनेचा विरोध नाही, त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाबाबत बाधित
शेतकऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ठाकरे यांनी माळीवाडा आणि पळशी इथल्या समृद्धी
महामार्ग बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
सरसकट कर्जमाफीची मागणी करणाऱ्या
शिवसेनेनं दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीवर समाधान कसं मानलं, असा सवाल विधानसभेतले विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. काल अहमदनगर जिल्ह्यातल्या बाभळेश्वर
इथं कृषी विज्ञान केंद्रात अवकाळी पाऊस ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश वितरीत
केल्यानंतर ते बोलत होते.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
करण्याची शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षांच्या
आंदोलनात सहभागी व्हावं, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले.
३१ मार्च २०१७ पर्यंतच्या
सर्व थकीत कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या मागणीसाठी, विधीमंडळच्या पावसाळी
आधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करताना, विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना प्रगतशील आणि निर्यातदार बनवायचं असेल तर सामूहिक
शेतीसाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबे
इथल्या शेतकरी गटानं काल मुंबईत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेबद्दल या गटानं नाराजी व्यक्त केली आहे.
नियमितपणे कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा असं या गटाचं म्हणणं
आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना तुलनेनं अधिक लाभ मिळणं, हा नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या
शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचं या गटाचं म्हणणं
आहे.
****
सरकारनं सुकाणू समितीचा प्रस्ताव
नाकारुन कर्जमाफीचा निर्णय घेत राज्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप समितीचे
सदस्य सुभाष लोमटे यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
सरकारच्या या निर्णयाविरोधात सुकाणू समितीतर्फे येत्या नऊ जुलै ते २३ जुलै दरम्यान
नाशिक इथून राज्यभर जनजागरण दौरा सुरु करणार असल्याचं लोमटे यांनी सांगितलं.
****
देशभरात वैद्यकीय तसंच दंत
महाविद्यालयात अखिल भारतीय कोट्याअंतर्गत राखीव असलेल्या १५ टक्के जागांसाठीची प्रवेश
प्रक्रिया येत्या तीन जुलैपासून सुरू होणार आहे. तीन ते ११ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना
ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. पहिल्या फेरीची प्रवेश यादी १५ जुलैला जाहीर होणार असून,
दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टनंतर सुरू होणार आहे.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
अंमलबजावणीसाठी सरकारनं स्थापन केलेल्या आठ सदस्यीय समितीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ
अंतराळ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रशासकीय
अधिकारी के. जे. अल्फोन्ज, कृषी तज्ज्ञ राम शंकर कुरील, गणितज्ञ मंजुल भार्गव हे या
समितीचे सदस्य असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत
पहिल्या फेरीसाठी पर्याय अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
औरंगाबाद शहरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दिवसभर गर्दी केली होती. रमजान
ईदनिमित्त सुटी असली, तरी प्रवेश प्रक्रियेची सर्व यंत्रणा सुरू होती, विद्यार्थ्यांना
कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक
महेश शिवणकर यांनी दिली.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान
ईद काल देशभरात पारंपारिक पद्धतीनं उत्साहात साजरी झाली. औरंगाबाद इथं छावणी परिसरात
ईदगाह मैदानावर ईदची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. परभणी, बीडसह मराठवाड्यातही ठिकठिकाणी
ईदची नमाज अदा करुन मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेऊन रमजान ईदनिमित्त शुभेच्छा
दिल्या. त्यानंतर शीरखुर्माचा आस्वाद घेऊन, हा सण साजरा झाला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंतीनमित्त काल ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. काल सामाजिक न्याय दिनही सर्वत्र
पाळण्यात आला. विधान भवनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावडा इथं लक्ष्मीविलास पॅलेस इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जागतिक कीर्तीचं
संग्रहालय व्हावं, यासाठी निधी जाहीर केला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कोल्हापूर इथं ज्येष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
सामाजिक न्याय दिनानिमित्त
काल नाशिक, धुळे सह नांदेड, बीड, लातूर, आदी शहरांमधून समता दिंडी काढण्यात आली.
औरंगाबाद इथं समाज कल्याण
विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेतर्फे आयोजित समता दिंडीला मिलकॉर्नर इथं शाहू
महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाला. औरंगपुरा परिसरात महात्मा फुले पुतळ्याजवळ
ही दिंडी विसर्जित झाली.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी, तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी
गणेश निऱ्हाळी यांनी, शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
परभणी महापालिकेतही शाहू महाराजांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
जालना इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या मुख्य कार्यक्रमात राज्याचे पाणी
पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शाहू महाराजांना
अभिवादन केलं. गोरगरीब, दलित, पीडितांना न्याय मिळवून देण्याचं काम शाहू महाराजांनी
केलं, त्यांच्या या कार्याचा प्रत्येकाने आदर्श घेण्याची गरज लोणीकर यांनी व्यक्त केली.
लातूर इथं खासदार सुनील गायकवाड
यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शाहू महाराजांच्या
आचार विचारांचं अनुकरण प्रत्येकानं करावं, असं आवाहन खासदार गायकवाड यांनी केलं.
****
उस्मानाबाद इथं १८ जून रोजी
झालेल्या दरोडा प्रकरणी उस्मानाबाद पोलिसांनी हैदराबाद इथून दोघांना ताब्यात घेतलं
आहे. हैदराबाद इथल्या सराफा व्यापाऱ्यानं चार लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून
नेल्याची तक्रार केली होती, मात्र या आरोपींकडून ७२ लाख रुपये हस्तगत केले असल्याची
माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. आरोपींपैकी एक जण फिर्यादीचा वाहनचालक
असल्याचं उघड झालं आहे. लुटीची ही रक्कम तीन कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता पोलिसांनी
वर्तवली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
राज्यात कालही अनेक ठिकाणी
पावसानं हजेरी लावली. कोकणासह मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर सातारा परिसरात काल पाऊस
झाल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद तसंच नांदेड शहर
परिसरात काल सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर
पावसानं हजेरी लावली. सुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना
दिलासा मिळाला आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर, गंगाखेड तालुक्यातही काल सायंकाळी पाऊस
झाला.
नांदेड जिल्ह्यातही काल रात्री
सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाल्यानं, शेतकरी सुखावला आहे.
पुढचे ३६ तास मध्य महाराष्ट्र
आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment