Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्र सरकार शेतकऱ्यांचं कर्ज
माफ करण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली आहे. सरकार अशी कोणतीही
योजना तयार करत नसल्याचं ते म्हणाले. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याच्या पार्श्वभूमीवर
जेटली यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. केंद्र सरकारनं २००८ साली शेतकऱ्यांचं
७४ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं.
****
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद
यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे राजीनामा दिला असून, राष्ट्रपतींनी तो स्वीकारला
आहे. कोविंद हे भारतीय जनता पक्ष प्रणित
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. ते येत्या २३ तारखेला
उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे
बिहारच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
****
तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन
उद्या साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखनऊ इथं मुख्य
कार्यक्रम होणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधी
केंद्र सरकारनं एक मोबाईल ॲप सुरू केलं आहे. `सेलिब्रेटिंग योग’ नावाचं हे ॲप असून,
योग कार्यक्रमात सहभागी झाल्यावर आलेले अनुभव या ॲपवर अपलोड करता येणार आहेत.
तसंच मराठवाड्यातही विविध ठिकाणी
योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात शाळा, महाविद्यालये, शासकीय
कार्यालये आदी ठिकाणी योग शिबिरांच्या माध्यमातून योगाचा प्रचार प्रसार करण्यात येणार
आहे.
****
आदिवासींच्या कल्याणकारी योजनांबाबत
मुंबई उच्च न्यायालयानं आतापर्यंत दिलेल्या सर्व आदेशांची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यात
करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंबाबत
याचिकांच्या एकत्रित सुनावणीवेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. आदिवासी भागात कुपोषणानं
होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण गंभीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. यापुढे कुपोषणानं
बालमृत्यू झाले, तर जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्य सचिवांना जबाबदार धरलं जाईल,
असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
राज्यात अकरावीची ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया २२ जून पासून सुरळीत सुरु होणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
सांगितलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. कला आणि क्रिडा गुणांसह
टक्केवारी गृहीत धरली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ऑनलाईन प्रवेशाबाबत ज्या
तांत्रिक त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दूर करणार असल्याचं तावडे यावेळी म्हणाले.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात काही अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी हे
स्पष्टीकरण दिलं.
****
राज्यात प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये
विद्युत वितरण संनियंत्रण समिती गठीत करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. महापालिका क्षेत्रातले वीज ग्राहक आणि वितरण कंपनी यांच्यात
सुसंवाद आणि समन्वय व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनानं जारी केलेल्या
पत्रकात म्हटलं आहे. महानगर पालिका आयुक्तांनी
महिनाभरात या समितीचं गठन करावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात २६६ अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक असल्याचं उघड झालं आहे. बोगस
वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आयोजित आढावा
बैठकीत ही माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यावेळी उपस्थित होते. आतापर्यंत
फक्त दोन बोगस व्यवसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा व्यवसायिकांना शोधून
त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी दिले.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग येत्या २६ जून रोजी रमजान ईद निमित्त
शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहील, तर २५ जून रोजी रविवारी बाह्य रुग्ण विभाग सुरु
राहणार असल्याचं घाटीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात १२ लाख ८२ हजार वृक्षांच्या
लागवडीचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं असून, हे उद्दीष्ट पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी
योग्य ते नियोजन करावं असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी दिले आहेत.
ते आज वृक्ष लागवड आढावा बैठकीत बोलत होते.
****
लंडन इथं सुरु असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेत उपान्त्य
फेरीच्या ब गटात आज भारताचा सामना नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी
साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारतीय संघानं
स्पर्धेच्या ‘ब’ गटात आतापर्यंत झालेल्या आपल्या तिन्ही सामन्यांत बाजी मारत अव्वल
स्थान पटकावलं आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सनं आपले दोन्ही सामने जिंकताना दुसरं स्थान
मिळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment