Thursday, 22 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.06.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्हय़ात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचे तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसले होते. भारतीय जवान गस्तीवर गेले असता त्यांनी दहशतवाद्यांच्या हलचाली दिसल्या. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. यादरम्यान भारतीय लष्कराचा एक जवान गंभीर झाला आहे.

****

भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना तामिळानाडूच्या अण्णा द्रमुक पक्षानं पाठींबा दिला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी एक पत्रक जारी करुन ही माहिती दिली. शिवसेना, तेलगु देसम पक्ष, जनता दल, बिजु जनता दल या पक्षांनाही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे.  

****

केंद्र सरकारनं चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस यासह उडीद, तूर, मूग या पिकांचा समावेश आहे. भाताच्या प्रति क्विंटल किमतीत ८० रुपये, डाळीसाठी ४०० रुपये, सोयाबीनसाठी पावणे तीनशे रुपये तर कापसाच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल एकशे साठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

****

अणु उर्जेमध्ये भारताची ऊर्जा भागवण्याची सर्वाधिक क्षमता असुन, उर्जा निर्मीतीच्या साधनांमध्ये अणुउर्जा सुरक्षीत साधन असल्याचं मत परमाणु उर्जा आयोगाचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे. नंदुरबारमध्ये इथं एका व्याख्यान मालेत  पर्यावरण पुरक विज्ञान आधारीत शाश्वत विकासाची दिशा, आव्हानं आणि संधी या विषयावर ते काल बोलत होते. भारताला पर्यावरण संतुलन विकास साधायचं असेल तर शिक्षण, संधोधन, विकास आणि तंत्रज्ञानाची सांगड आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी शिक्षण पद्धतीत आजीवन शिक्षणाची आवश्यकताही यावेळी व्यक्त केली.

****

No comments: