Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
****
·
शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा
राज्य शासनाचा निर्धार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·
सरसकट कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तोपर्यंत
लढा सुरूच ठेवण्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांचा इशारा
·
आधार पत्र अनिवार्य करणाऱ्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती
द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात काल चांगला पाऊस
****
शेती क्षेत्रातली गुंतवणूक
वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे
सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा आणि परिसरातल्या ४० गावातल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं
काल मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन, शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त
केले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेकविध
उपाययोजना करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन दुष्काळांचा सामना करू शकेल,
एवढं मुबलक पाणी उलपब्ध झालं असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी
फसवी असून जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही आणि शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तोपर्यंत
काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी काल
मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना दिला. कर्जमाफीमध्ये राज्य सरकारनं केवळ आकड्यांचा खेळ
केला असल्याचं सांगितलं. कर्जमाफीसाठी लादण्यात आलेल्या दीड लाख रूपयांपर्यंतच्या मर्यादेलाही
त्यांनी कडाडून विरोध केला आहे.
****
पिकाला हमीभाव दिल्याशिवाय
तसंच दलालीवर नियंत्रण आणल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या संपणार नाहीत, असं खासदार
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. सद्यस्थितीत
गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. मराठा आरक्षणाचा
प्रश्नही तातडीनं सोडवणं आवश्यक असून, मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची
भेट घेऊन चर्चा करावी, असं ते म्हणाले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंतीच्या अनुषंगानं काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संभाजीराजे यांचं
व्याख्यान झालं, पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार किती आत्मसात
केले, असा सवाल त्यांनी यावेळी केला. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सहभागी करून
स्वराज्य स्थापन केलं, तर शाहू महाराजांनी बहुजनांना मुख्य प्रवाहात आणलं, रयत आणि
बहुजनांच्या प्रगतीसाठी त्यांचं हे कार्य महत्वाचं असल्याचं संभाजीराजे म्हणाले. शाहू
घराण्याचा वारसदार म्हणून आपण फक्त मराठ्यांचं नव्हे, तर सर्व बहुजनांचे नेतृत्व करत
असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नियमित
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज माफ होईपर्यंत कर्ज परतफेड न करण्याची सामुदायिक
शपथ घेतली आहे. अर्धापूर इथं काल झालेल्या बैठकीत या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरील
संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या कर्जमाफी
योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोपही
या शेतकऱ्यांना केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी
आधार पत्र अनिवार्य करणाऱ्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं
नकार दिला आहे. न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या सुट्टीकालीन
पीठानं काल हा आदेश दिला. आधारच्या संवैधानिकतेविषयी प्रकरण न्यायप्रविष्ठ असून केवळ
सरकारी योजनांचा लाभ आधाराअभावी हिरावून घेतला जाईल या भीतीपोटी या अधिसूचनेला तात्पुरती
स्थगिती देता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आधार सादर करण्याची मुदत केंद्र
सरकारनं तीस जून पासून तीस सप्टेंबरपर्यंत वाढवली असल्याचं सरकारी वकील तुषार मेहता
यांनी सांगितलं. यासंदर्भात पुढील सुनावणी सात जुलैला होणार आहे.
****
वस्तू आणि सेवा कर जीएसटीत,
मराठी नाटक आणि सिनेमांच्या २५० रुपयांच्या तिकीटांसाठी असलेली सवलतीची मर्यादा ५००
रुपयांपर्यंत वाढवण्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन अर्थमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मुंबई इथं मराठी चित्रपट आणि नाट्य व्यावसायिकांच्या वस्तू
आणि सेवा करासंबंधीच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. मराठी नाटकांच्या
तिकीटांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला असून, यातील नऊ टक्के वाटा केंद्र सरकारला
आणि नऊ टक्के वाटा राज्य सरकारला मिळणार आहे. राज्य सरकारच्या या वाट्यातून सवलत देण्याची
मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबत विचार करण्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी
दिलं.
****
अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ
झाला. आज पहाटे जम्मू इथून चार हजार भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला. बालटाल, पहलगाम
मार्गे यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
राज्याच्या मुंबई, कोकण, नाशिक,
खानदेश, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काल जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह जिल्ह्यातही
अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरण साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ
झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे
जनजीवन विस्कळीत झालं. काल दिवसभरात नागपूर शहरात १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यात कालही नांदेड,
लातूर, भागात पावसानं हजेरी लावली. लातूर शहर परिसरात दुपारच्या सुमारास पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या, नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. रात्री उशीरापर्यंत
झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात उर्वरीत ४० टक्के पेरणीच्या कामाला वेग येणार असून,
भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. औरंगाबाद शहरातही काल पावसानं तुरळक हजेरी लावली.
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड सोयगाव तालुक्यात काल दमदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातल्या
वाघूर, केळणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तासभर झालेल्या या पावसामुळे आठवडी
बाजारात व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.
****
विद्यापीठांनी व्यावसायिक
शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे, असं मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी
व्यक्त केलं आहे. ते काल परभणी जिल्ह्यात सेलु इथं एका शिक्षणसंस्थेच्या कार्यक्रमात
बोलत होते. चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे रोजगाराची क्षमता नसलेले पदवीधर निर्माण होत
असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या केळगाव
इथले शहीद संदीप जाधव यांच्या पत्नीला बीडच्या वैद्यनाथ सहकारी बँकेत १ जुलैपासून सामावून
घेण्याचं तसंच त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं
प्रत्येकी एक लाख रुपयांची बँकेत ठेव ठेवणार असल्याचं आश्वासन राज्याच्या ग्रामविकास
आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. जम्मू - काश्मिरच्या पूँछ सेक्टरमध्ये
पाक सैनिकांच्या हल्ल्यात जाधव यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांची काल
मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर हे आश्वासन दिलं. यावेळी केळगांवच्या ग्रामस्थांनी
व्यायामशाळा उभारण्याची केलेली मागणी मान्य करत २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही
त्यांनी केली.
पालकमंत्री रामदास कदम आणि
शिवसेना नेत्यांनीही जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. शिवसेनेकडून
यावेळी जाधव कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची मदत देण्यात आली.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं
आता सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. शहरातल्या प्रत्येक
मार्गावर तसंच प्रत्येक प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं नियोजन असून, तुळजापूर
पोलिसांनी यासंदर्भातला प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. देशातल्या तीर्थक्षेत्र
सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या बोगस वैद्यकीय
व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तालुका स्तरावर पथकं नियुक्त करण्याचे निर्देश
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात
आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. दर महिन्याला अशा व्यावसायिकांची तपासणी करावी, तसंच
त्यांना औषधं आणि वैद्यकीय उपचार साहित्याचा पुरवठा होणार नाही यांची संबंधित विभागांनी
दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
****
जालना इथल्या आनंदीस्वामी
यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. या यात्रेत विविध धार्मिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, चार जुलैला पाखली मिरवणूक निघणार आहे. नऊ जुलैला
काल्याच्या कीर्तनानं यात्रेची सांगता होईल.
****
आषाढी वारीसाठी निघालेली संत
तुकाराम महाराज यांची पालखी आज सकाळी इंदापूरहून मार्गस्थ होईल, तर संत ज्ञानेश्वर
महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात नातेपुतेकडे मार्गस्थ होणार
आहे. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंड्याहून पुढे
मार्गस्थ होईल. काल सकाळी पालखी परंड्यात मुक्कामी दाखल झाली. भाविकांनी नाथपादुकांचं
दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
****
No comments:
Post a Comment