Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पुणे महापालिकेचा देशातला पहिला
बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ आज मुंबई शेअर बाजारमध्ये करण्यात आला.
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित
होते. ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेनं
प्रत्यक्षात आणली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. देशातल्या सर्व स्थानिक स्वराज्य
संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं. शहरे ही
विकासाचा पाया आहेत, त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी अशा प्रकारचे
महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत, असं ते म्हणाले.
****
इस्त्राईलच्या शेती प्रयोगांना
राज्यात राबवण्याचा विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. इस्त्राईलच्या मोशाव पद्धतीच्या शेतीचा राज्यातल्या
शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल, या दृष्टीने प्रयत्न करतानाच शेतीसह शेतीपूरक उद्योग,
पशुसंवर्धन आणि इतर विभागांनाही याचा काय फायदा होईल हे तपासलं जाईल, असं ते म्हणाले.
****
मुंबई इथं आज शिक्षण खात्याच्या
उत्तर मुंबई निरीक्षक कार्यालयावर महिला आणि पुरुष शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला.
भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या मुंबै बॅंकेत शिक्षकांचे पगार न टाकता युनियन
बॅंकेत टाकण्याची मागणी यावेळी शिक्षकांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा
इशारा जनता दल युनायटेडचे आमदार कपिल पाटील यांनी दिला आहे. सरकार राष्ट्रीयकृत बँका
सोडून सहकारी बँकेत शिक्षकांची खाती का उघडायला सांगतात, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
****
उत्पादन शुल्क, सेवा कर आणि वॅट
भरणाऱ्या व्यवसायिकांना येत्या २५ जून पासून जीएसटी अंतर्गत पुन्हा नोंदणी करता येणार
आहे. व्यवसायिक जीएसटीएन या संकेतस्थळावर ही नोंदणी करु शकतील, असं महसूल सचिव हसमुख
अधिया यांनी सांगितलं. या नोंदणीचे दोन टप्पे या आधीच झाले असल्याचं ते म्हणाले.
****
देशाच्या कार्टोसॅट दोन या उपग्रहासह
अन्य ३० उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी उलट गणना सुरु झाली आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा
इथून उद्या सकाळी नऊ वाजून २९ मिनिटांनी पीएसएलव्ही सी ३८ या यानातून या उपग्रहांचं
प्रक्षेपण होणार आहे. पीएसएलव्हीचं हे चाळीसाव प्रक्षेपण आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून
भूमी आणि भौगोलिक मापन प्रणाली विकसित केली जाणार आहे.
****
ठाणे जिल्ह्यात कल्याणमधल्या
नेवाळी इथली परिस्थिती नियंत्रणात असून, पोलीस तसंच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी
उपस्थित असल्याचं उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी सांगितलं आहे. विमानतळ जमीन
संपादनाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आज याठिकाणी आंदोलन केलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या
काळात नेवाळी इथली एक हजार ६०० एकर जागा ताब्यात घेण्यात आली होती. या जागेवर संरक्षण
विभागातर्फे संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरु करण्यावरून स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप
घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी २९ जुन रोजी दिल्ली इथं बैठक होणार असल्याचं संरक्षण
राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुर्यभान मुंडे यांची, तर
उपसभापतीपदी काँग्रेसचे विजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या
बाजार समितीच्या निवडणूकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा
मुंडे शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला.
****
बीड इथं वीज वितरण कपंनीतल्या
वीज तंत्रज्ञ कर्मचाऱ्यानेच वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक्षक अभियंता
यांनी धाड टाकून ही कारवाई केली असून, कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज
चुकीचा ठरल्यामुळे गोंदिया- भंडारा जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं
संकट ओढावल्यानं बळीराजा शेतकरी संघटनेनं पोलिसात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
हवामान विभागानं आपली फसवणूक केल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे. हवामान विभागाच्या
सांगण्यावरुन शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पाऊस पडला नसल्याचं दुबार पेरणीचं संकट
आलं आहे, त्यामुळे हवामान विभागाविरुद्ध तक्रार नोंदवणार असल्याचं शेतकरी संघटनेनं
सांगितलं आहे.
****
धुळे शहरासह तालुक्यात दिवसांच्या
विश्रांतीनंतर आज पावसानं हजेरी लावली. धुळे तालुक्यासह शिरपूर भागातही पाऊस पडल्यानं
शेतकर्यांसह सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.
****
No comments:
Post a Comment