Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी
सी. जोसेफ विजय विराजमान; शपथविधीनंतर स्वीकारला पदभार
· आसाममध्ये भाजपप्रणित
आघाडीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्वा सरमा यांची निवड, तर पुद्दुचेरीच्या
मुख्यमंत्रीपदी एन. रंगास्वामी नियुक्त
· बंगळुरूमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या नव्या ध्यान मंदिराचे उद्घघाटन
आणि
· छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेडमधील
राष्ट्रीय लोकअदालतला उत्स्फूर्त प्रतिसाद
****
तमिळनाडूमध्ये, ‘तमिळगा वेत्री कळघम’
म्हणजेच ‘टीव्हीके’ पक्षाचे संस्थापक सी. जोसेफ विजय यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची
शपथ घेतली. हा शपथविधी समारंभ नेहरू इनडोअर स्टेडियमवर पार पडला. तमिळनाडूचे राज्यपाल
राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आणखी
नऊ मंत्र्यांनीही शपथ ग्रहण केली. या समारंभाला राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील
अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. २३४ सदस्यांच्या विधानसभेत विजय यांनी १२० नवनिर्वाचित
आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. १९६७ नंतर, तमिळनाडूतील डीएमके आणि एआयए-डीएमके
या दोन प्रमुख पक्षाशी संबंधित नसलेले पहिले मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी इतिहास
घडवला आहे. मुख्यमंत्री विजय यांना येत्या बुधवारी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
****
दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री
म्हणून सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईतल्या राज्य सचिवालयात पदभार स्वीकारत विविध विभागांची
पाहणी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल विजय यांचं अभिनंदन केलं. जनतेचं जीवनमान
उंचावण्यासाठी केंद्र सरकार तमिळनाडू सरकारसोबत भागीदारीनं काम करणं सुरूच ठेवेल, असंही पंतप्रधानांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
आसाम विधानसभेत भाजपप्रणित
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्वा सरमा यांची निवड करण्यात
आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. येत्या मंगळवारी १२
मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीच्या
मुख्यमंत्रीपदी एन. रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. येत्या
बुधवारी १३ मे रोजी रंगास्वामी यांचा शपथविधी होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते कर्नाटकातील बंगळूरू इथं अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ
लिव्हिंग’ न्यासाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातील ध्यान मंदिराचं उद्घघाटन झालं.
“स्पष्ट संकल्प आणि सेवाभावानं
केलेल्या कार्यातून प्रत्येक प्रयत्नाचे सार्थक परिणाम प्राप्त होतात, तसंच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’
हे समाजासाठी शक्तीचं प्रेरणास्थान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या
देशव्यापी सेवा उपक्रमांचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.
****
लोकशाही बळकट करण्यामध्ये
प्रत्येक मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
यांनी म्हटले आहे. तिरुपती इथं आज ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू
इथं झालेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञानेशकुमार, सध्या तिरुपतीच्या
दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात
दर्शन घेतलं.
****
लैंगिक अत्याचार प्रकरणातील
संशयित आरोपी अशोक खरातशी संबंधित तपासाअंतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा
रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये विशेष तपास पथक एसआयटीने चौकशी केली. ‘एसआयटी’च्या प्रमुख तेजस्वी
सातपुते आणि वरिष्ठ अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी चाकणकर यांची सुमारे ५० मिनिटे
चौकशी केली. या चौकशीत चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खाजगी पतसंस्थांमधील
खाते,
खरात
याच्या धार्मिक संस्थेमध्ये चाकणकर यांचं सदस्यत्व, आदीबाबत चाकणकर यांना काही
प्रश्न विचारले गेले. आपण एसआयटीला सहकार्य केल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.
****
विदर्भातील शेतकरी आत्महत्या
आणि पाणीटंचाई आदी समस्यांवर मात करण्यासाठी नागपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार
आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ‘पूर्ती
सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे आयोजन करण्यात
आलं आहे. येत्या १७ मे रोजी ‘नागपूर जलसंवाद’ आणि १८ मे रोजी ‘जलक्रांती परिषद’ होणार
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व
अशी एकूण १ हजार ५२४ प्रकरणं तडजोडीने निकाली निघाली. या प्रलंबित प्रकरणांत एकूण २३
कोटी ३२ लाख ७२ हजार ४०५ रुपये एवढ्या रकमेचा समावेश असलेली प्रकरणं निकाली निघाल्याचं
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी सांगितलं. जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांच्या
अध्यक्षतेखाली ही लोकअदालत पार पडली.
****
बीड जिल्ह्यात काल पार पडलेल्या
लोकअदालतीमध्ये एकूण १ हजार २०९ वादग्रस्त आणि प्रलंबित प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यात
आली. या लोकअदालतीचे उद्घघाटन बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख
जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं.
****
नांदेड इथं काल महापालिकेत
पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल ७५३ मालमत्ताधारकांनी सहभाग नोंदवत जवळपास
दीड कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला.
****
विज्ञान प्रचार आणि प्रसार, खगोलशास्त्राविषयी
जनजागृती,
अंधश्रद्धा
निर्मूलन तसंच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर
इथं आज बैठक पार पडली. ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत जिंतूर
तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबविण्यासाठी, विविध समित्यांचं गठण आणि प्रमुखांच्या
नियुक्त्या करण्यात आल्या. भविष्यातील खगोल निरीक्षण शिबिरं, विज्ञान प्रदर्शन
आणि वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी
सांगण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिष्ठातांच्या चार पदांसाठी २४ जणांनी
मुलाखती दिल्या,
याबाबत
विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी माहिती दिली. कुलसचिव पदासाठी येत्या
२२ मे रोजी मुलाखत होईल. या पदासाठी एकूण आठ उमेदवार पात्र ठरले आहेत. संवैधानिक अधिकारी
प्रवर्गातील नऊ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, या पदांसाठीच्या मुलाखती
सुरू झाल्या आहेत. ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक आणि कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची
अंतिम यादी घोषित करण्यात आली असून १२ आणि २२ मे रोजी या मुलाखत होतील.
****
अखिल भारतीय साहित्य परिषद
पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव जिगे यांची
तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काळे आणि प्रांत महामंत्रीपदी धाराशिवचे जेष्ठ
साहित्यिक युवराज नळे यांची निवड करण्यात आली. देवगिरी प्रांत कार्यकर्त्यांची काल
आभासी बैठक झाली. यात ही निवड करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
सिल्लोड तालुक्यात, धानोरा इथं काल रात्री विहिरीच्या कामादरम्यान अचानक मातीचा ढिगारा
खचल्यानं दोन तरुण मुलांसह वडिलांचा दबून जागीच मृत्यू झाला. बाजीराव काकडे असं पित्याचं
तर आजिनाथ आणि शाम अशी मृत मुलांची नावं आहेत.
****
पालघर-मनोर मार्गावर झालेल्या
भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असुन, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अज्ञात वाहन दुचाकीला धडकल्यानं हा अपघात घडला.
****
जालना जिल्ह्यातील डोमेगाव
परिसरात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना
या पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
****
हवामान
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात
आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जना आणि सोसाट्याचा
वारा वाहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला.
****
क्रिकेट
आयपीएलमध्ये, चेन्नई इथं लखनऊ
सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघादरम्यान सामना सुरु आहे. चैन्नई संघानं
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. लखनऊ संघानं फलंदाजी करत चैन्नईसमोर
२०४ धावांचं लक्ष्य दिलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई संघाच्या चार षटकांत एक गडी बाद ४७ धावा झाल्या होत्या.
आज दुसरा सामना,
रायपूर
इथ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान सायंकाळी साडेसात वाजता
सुरू होईल.
****
ताश्कंद इथं सुरू असलेल्या
आशियाई १५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम
फेरीत नऊ भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. १५ वर्षांखालील गटात, ३० ते ३३ किलो वजनी गटात
भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर ३७, ४०, ४३, ४६ आणि ५८, ६१ आणि ६४ किलो वजनी
गटात भारतीय महिला मुष्टीयोध्यांनी विजय संपादन केला.
****
शांघाय इथं पार पडलेल्या
धनुर्विद्या विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यातील थरारक अंतिम सामन्यात, भारतीय महिला रिकर्व्ह
संघानं यजमान चीनचा ५-४ ने पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment