Tuesday, 12 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मे २०२ सकाळी .०० वाजता

****

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आज साजरा होत आहे. जगातल्या पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म दिवस आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या परिचारिका, आपले भविष्य, सक्षम परिचारिका आयुष्य वाचवणाऱ्या देवदूत अशी यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. या दिनानिमित्त राज्यात विविध सरकारी तसंच खासगी रुग्णालयं, आरोग्य केंद्रं अशा ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

आसाममध्ये, हिमंता बिस्वा सरमा आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १०२ जागा जिंकल्या.

****

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित नऊ आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक, अशा दहा जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे दहा, तर पाच अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यता भासल्यास सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं उघड झाल्याने गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे २९ एप्रिलला पाठवलेल्या या यादीत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि सेक्रेटरी म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत कारकुनी चूक झाली असून, लवकरच ती दुरुस्त करण्यात येणार असल्याचं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं आहे.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआयने पंजाबच्या मोहाली इथल्या व्हिजिलन्स ब्युरोच्या मुख्यालयावर छापा टाकला. काल रात्री झालेल्या या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसंच तपास यंत्रणेकडून व्हिजिलन्स ब्युरोची अधिकृत कागदपत्रे आणि नोंदींची तपासणी करण्यात आली. ही कारवाई एका मालमत्ता व्यवहाराशी संबंधित कथित लाचखोरीच्या प्रकरणाशी जोडलेली असल्याचं सांगण्यात येत आहे.

****

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आय आय टी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साइड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्त्वावरच्या प्रकल्पाचं, आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साइडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

****

राज्यात एसटी महामंडळाच्या सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं मोठं उद्दिष्ट शासनाने निश्चित केलं आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात किमान २०० चार्जिंग स्टेशन सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सुमारे २० हजार ई-बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एसटीच्या उपलब्ध जागांवर आधुनिक चार्जिंग स्टेशन उभारले जातील, जिथे ई-बसेस चार्ज केल्या जातील. ही योजना राज्यातल्या सार्वजनिक वाहतुकीला पर्यावरणपूरक आणि आधुनिक दिशेने नेणारी ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

राज्यात शासकीय प्रकल्पांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी किमान एक वर्ष जमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंदी असते, मात्र काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचे नियोजन लीक केल्यामुळे व्यापाऱ्यांनी वर्षभर आधीच जमिनींची खरेदी-विक्री केल्याचे प्रकार सरकारच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं. अशा संशयित व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

****

नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं.

दरम्यान, टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही, असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...