Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 May 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना- मुख्यमंत्र्यांची
घोषणा
·
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमधल्या एका दाम्पत्याची
चौकशी
·
राज्यभरात ११ लाख १४ हजारावर कुटुंबांकडून स्व गणना प्रक्रिया
पूर्ण
·
लातूर इथं पाणी साठवण खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू
·
ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांच्या पार्थिव देहावर
पुण्यात अंत्यसंस्कार
आणि
·
सोलापूरचा महेंद्र गायकवाड हिंदकेसरी; पोर्तुगाल
एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बांठियाला दुहेरीचं विजेतेपद
****
शेतकऱ्यांसाठी
कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ३० जूनपूर्वी
यासाठीची योजना जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून,
बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली
जाईल, असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
**
दरम्यान, पुण्यात महानगरपालिका
आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग
केंद्राच्या लोकार्पण काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग
ग्रीड’ तयार करण्यात येत असून, या माध्यमातून रुग्णांना अधिक
सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्यावतीने
संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी
महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यावेळी उपस्थित होत्या. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं, संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज
उद्यानातल्या या शिल्पाशेजारच्या दगडी भिंतीवर बुधभूषण ग्रंथातले
नऊ निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी तसंच इंग्रजी भाषांतर कोरलं आहे.
****
राज्यात
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. अवैध वाळू
उत्खननाविरुद्ध जालना इथं करण्यात आलेल्या कारवाईचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले:
बाईट – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
नीट पेपरफुटी
प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआयने नांदेडमधल्या एका दाम्पत्याला चौकशीसाठी
बोलावलं आहे. या दाम्पत्यानं, आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपये देऊन पेपर
खरेदी केल्याचा आरोप असल्यावरून, नांदेड शहरातल्या विद्युतनगर
इथं सीबीआयच्या पथकानं याबाबत चौकशी केली. त्यांना अधिक चौकशीसाठी उद्या मंगळवारी पुण्यात
बोलावण्यात आलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार आहे. याआधी याप्रकरणी
अटक केलेले लातूरचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह मनिषा मांढरे
यांना न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणी
सीबीआयच्या वतीने काल पुन्हा एकदा लातूर शहरातल्या एका खासगी कोचिंग क्लास चालकाची
चौकशी केली. दोन दिवसांपूर्वी याच खासगी क्लास चालकाच्या घरी आठ ते नऊ तास चौकशी केली
होती. तपास यंत्रणा कथित मॉक प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष नीट प्रश्नपत्रिकेमधलं साम्य
तपासत आहे.
****
जनगणना
२०२७ अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून, राज्यभरात ११ लाख १४ हजार २७७ कुटुंबांनी
स्व गणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. एक मे ते १५ मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली
गेली. ज्या कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला ‘H’ या अक्षराने
सुरू होणारा ११ अंकी स्व-गणना ओळखक्रमांक द्यावा, यामुळे माहिती
संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल, असं आवाहन
प्रशासनानं केलं आहे.
****
चांदीच्या
आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या
आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं.
याआधी सरकारने १३ एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क ६ टक्क्यावरून १५ टक्क्यापर्यंत
वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिका आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज – इंटॅक
यांच्या वतीने काल शहरातल्या बेगमपुरा परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. यावेळी ऐतिहासिक
थत्ते हौद, बेगमपुऱ्यातले जुने वाडे, मंदिरं,
हनुमान व्यायामशाळा आणि कुंभार गल्ली याबाबत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी
आणि आदित्य वाघमारे यांनी माहिती दिली. नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
****
लातूर शहरात
बोधे नगर भागात पाणी साठवण्यासाठी केलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला.
टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशाने सुमारे १५ ते २० फुटांचा हा खड्डा करण्यात आला
होता. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, या खड्ड्याबाबत
वारंवार महापालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातल्या
नागरिकांनी केला आहे.
****
ज्येष्ठ
टाळवादक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९९ वर्षांचे
होते. कलाकारांच्या अनेक पिढ्यांना सातत्याने लयबद्ध टाळसाथ करणारे टाकळकर यांनी,
माधवबुवा सुकाळे यांच्याकडे टाळवादनाचं शिक्षण घेतलं. बालगंधर्व यांच्यापासून
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या तीन पिढ्यांना, टाकळकर यांनी
टाळसाथ केली. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
बीड जिल्ह्याच्या
माजलगाव तालुक्यातल्या काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी, संस्था तसंच
काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा
प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं
कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक जारी करून सांगितलं आहे.
****
नांदेड
ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत बंदी असलेला, ३० लाख ६३
हजार ६५० रुपयांचा गुटखा आणि सुगंधित पान मसाला काल जप्त केला. पोलिसांनी सापळा रचून
कांदा मार्केट इथं ही कारवाई केली. याप्रकरणी रईस मोहम्मद अमीर मोहम्मद याच्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
सोलापूरचा
महेंद्र गायकवाड नवा हिंदकेसरी ठरला आहे. काल सातारा इथं झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी
कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र यांच्यात सुरू असतांना, पृथ्वीराजने
दुखापतीमुळे माघार घेतली, त्यानंतर महेंद्रला विजयी घोषित करण्यात
आलं. महिलांच्या गटात हरियाणाची काजल धोजक महिला हिंदकेसरीची मानकरी ठरली. तिने अंतिम
फेरीत दिल्लीच्या खुशी दलालचा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
****
थायलंड
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला
उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल
मार्टिन या जोडीनं त्यांचा अंतिम सामन्यात २१ - १२, २५- २३ असा पराभव
केला.
****
टेनिसमध्ये
पोर्तुगाल एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बांठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर
डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्तुगालचा टियागो परेरा आणि स्पेनचा
डेविड वेगा हर्नाडेझ या जोडीला त्यांनी ६-३, ६-२ असं सरळ सेटमधे हरवलं. सिद्धांत बांठियाचं
एटीपी चॅलेंजरमधलं हे तिसरं विजेतेपद आहे.
****
इंडियन
प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पाच
गडी राखून, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्जचा २३ धावांनी पराभव
केला.
आज या स्पर्धेत
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्या सामना होणार आहे. चेन्नईत संध्याकाळी
साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
राज्यात
काल सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमान अमरावती आणि वर्धा इथं नोंदवलं गेलं. अकोला इथं
४५ पूर्णांक चार, परभणी इथं ४४, तर छत्रपती संभाजीनगर,
धाराशिव आणि बीड इथं सरासरी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
येत्या
दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment