Friday, 22 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०२ सकाळी.०० वाजता

****

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होत आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्त करण्यात येत आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा, ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि उलटवण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती करण्याचं आवाहन या संकल्पनेद्वारे करण्यात येत आहे. समृद्ध जैवविविधता ही शाश्वत विकासासमोरील अनेक आव्हानांवर प्रभावी उत्तर ठरू शकते, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

भारताच्या चांद्रयान-तीन मोहिमेला, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रोनॉटिक्सतर्फे, २०२६ च्या गॉडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी एआयएए असेन्ड २०२६ परिषदेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इसरोच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्हयात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातलं महत्त्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आल आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल.

****

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. अलीकडे रेल्वे गाड्यांना लागलेल्या आगीच्या काही घटनांमध्ये समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या बैठकीत माहिती प्रणालीच्या माध्यमातून गुप्त माहिती गोळा करण्याच्या प्रक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. तसंच, सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं, संपूर्ण रेल्वे नेटवर्कमध्ये सीसीटीव्हीचा विस्तार आणि सायबर सुरक्षेसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा कार्यान्वित करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

दरम्यान, रेल्वे परिसरामध्ये कोणतीही संशयास्पद कृती किंवा व्यक्ती आढळल्यास प्रवाशांनी तात्काळ १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी आणि प्रवासादरम्यान अधिक सतर्क राहावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

****

पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुजफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० सैनिकांचा मृत्यू झाला होता.

****

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं, पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या ‘मिशन मौसम’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम, आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी पक्षाचे सर्व सदस्य राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षातले सर्व समज-गैरसमज दूर झाल्याचं सांगितलं. तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच सुधारित पत्र दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विलीनीकरणाचा विषय आता पूर्णपणे संपलेला असल्याचं स्पष्ट करत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचं तटकरे यांनी नमूद केलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमधे सात महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता, उपचारासरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

****

हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमधे काल नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं यावेळी दिलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...