Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
स्टार्टअपमध्ये भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश
म्हणून उदयास आला आहे. देशात आजमितीस २.३ लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स
नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीला चालना देत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून
१९ व्या रोजगार मेळ्याला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.
भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यास जग उत्सुक
असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देश जगातील विविध देशांसोबत
भागीदारी करत असून, भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत असल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध सरकारी
विभागांमध्ये नियुक्त ५१ हजार युवकांना आज नियुक्ती-पत्र प्रदान करण्यात आले. हा १९
वा रोजगार मेळा देशभरातल्या ४७ ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त
उमेदवार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग
यांसारख्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या १८ रोजगार मेळाव्यांच्या
माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे १२ लाख युवकांना विविध सरकारी विभागांत नियुक्त करण्यात
आलं आहे.
दरम्यान, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम
मालिकेत येत्या ३१ मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम
मालिकेचा हा १३४ वा भाग आहे.
****
काँग्रेस पक्षाने देशभरात सुरू केलेल्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर
मोठे फेरबदल केले आहेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या जागी आता ग्रामीणमध्ये नवीन
दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पाचोरा येतील
विधिज्ञ अविनाश भालेराव तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे
पूत्र धनंजय चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव शहरासाठी जमील शेख यांची नियुक्ती
झाली आहे.
****
उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी येत्या ११ जून रोजी
लातूर इथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. यासाठी नव उद्योजकांनी लातूर जिल्हा
उद्योग केंद्र इथे आपल्या उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केलं आहे.
या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणं नवउद्योजकांना प्रोत्साहन देणं, गुंतवणूकदार-व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणं तसंच लातूर जिल्ह्याला
विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणं हा आहे. या
परिषदेमध्ये नव उद्योजकांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत.
****
आगामी काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दावोस इथे जागतिक आर्थिक परिषदेत
झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा सद्यःस्थितीविषयी काल मुख्यमंत्र्यांनी
आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. स्वित्झर्लंडच्या दावोस मध्ये
जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करता यावी या दृष्टीने
राज्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयडीसी, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील १० प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० प्रकल्प
वेळेत पूर्ण होईल, याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कंपन्यांच्या
पाठपुराव्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि विविध परवानग्या पुढील तीन महिन्यांत
पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र
सरकारला विक्रमी २ पूर्णांक ८६ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी हस्तांतरित करण्यास
मंजुरी दिली आहे. केंद्रीय बँकेने केलेल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी
हे एक आहे. काल मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय
संचालक मंडळाच्या ६२३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथे लखनौ सुपर जायंट्स
आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू
होईल.
****
No comments:
Post a Comment