Thursday, 14 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक व्यवस्थेला आकार देत असून, ती सुशासन आणि समावेशक विकासासाठी उपयोगात आणता येऊ शकते, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली, त्यावेळी जयशंकर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

शांती आणि सुरक्षा हे जागतिक व्यवस्थेचे केंद्रबिंदू असून, अलीकडील संघर्षांमुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्त्व अधोरेखित होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज असून, अध्यक्ष म्हणून आपण खुल्या आणि रचनात्मक चर्चेस प्रोत्साहन देऊन, सर्व शिष्टमंडळांनी याच भावनेत आपले विचार मांडावेत, असं जयशंकर यांनी सांगितलं. उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांकडून ब्रिक्सने एक सकारात्मक आणि स्थिरता आणणारी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेतल्या चर्चा जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारमंथन करण्याची तसेच सहकार्य अधिक मजबूत करण्याचे व्यावहारिक मार्ग शोधण्याची संधी असल्याचं जयशंकर म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते उद्या अबू धाबी इथं पोहोचतील. यावेळी ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत ऊर्जा सहकार्यासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी दिली. गेल्या पाच महिन्यांतील या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट आहे. या चर्चेत ऊर्जा सुरक्षा आणि संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या ४० लाखांहून अधिक भारतीयांच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात महत्त्वपूर्ण ऊर्जा भागीदारी असून, भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास ११ टक्के पुरवठा संयुक्त अरब अमिरातीतून केला जातो.

****

केरलमचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस पक्षाचे व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तिरुवनंतपुरम इथं आज झालेल्या पक्षाच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत सतीशन यांचं नाव जाहीर करण्यात आलं.

****

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करुन इंधन बचत कशी करता येईल, याकडे लक्ष देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. या सदस्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

****

येत्या ३० जूनपर्यंत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक – एच एस आर पी बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्यात यासंदर्भातल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी हे क्रमांक बसवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असं आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त संभाजी महाराजांना पोवाडे गायन आणि इतर आयोजनातून अभिवादन करण्यात येणार आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. धरमशाला इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला. उदगीर तालुक्यासह परिसरात तसंच लातूर शहरातही पावसाच्या हकल्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांमधले तयार आंबे वाऱ्यामुळे झाडावरून खाली पडल्याने नुकसान झाल्याची माहिती आमच्या वार्ताहराने दिली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...