Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27
May 2026
Time
11.00 to 11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता
****
नीट युजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग –
सीबीआयनं आज आणखी दोन जणांना अटक केली. लातूर इथले डॉ. मनोज शिरुरे याला आज
चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी
यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप
आहे. पुण्यातल्या डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक
तेजस शहा याला देखील सीबीआयने आज अटक केली. त्याने आरोपी मनिषा हवालदार हिच्याकडून
प्रश्नपत्रिका मिळवली होती. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.
****
२१ जून रोजी साजरा होणार्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य
कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी
आज खजुराहो इथं ही माहिती दिली. “आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग” ही यंदाच्या योग
दिनाची संकल्पना असल्याचं सांगत त्यांनी, निरोगी आणि आजारमुक्त
वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन केलं. यावेळी योग पार्क
उपक्रम, ‘योग संगम’ पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी-शर्ट डिझाइनचंही अनावरण
करण्यात आलं.
****
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या
पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना
आदरांजली वाहिली.
****
कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी
प्रयत्न करत असून,
कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार
नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल मुंबईत
वार्ताहरांशी बोलत होते. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी
चर्चा करणार आहे;
यावर विरोधकांनी राजकारण करू नये, असं
ते म्हणाले.
****
दरम्यान, कांद्याला २४ रुपये प्रति किलो किमान
भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथं, महाविकास
आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष
शशिकांत शिंदे,
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१ वा वर्धापन दिन आणि
पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात पार पडला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे
यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर डॉ. श्रीकृष्ण काकडे
यांचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव करण्यात आला. विशेष
ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकंही मान्यवरांच्या हस्ते प्रदान
करण्यात आले.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ – एस. टी. च्या
वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती ही
व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक यांनी. मंत्रालयात काल झालेल्या, महामंडळाच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते
आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते, असंही त्यांनी
यावेळी नमूद केलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती
करून असलेली जवळपास ५०० वटवाघळं मृत्यूमुखी पडली. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात
४५ अंशांच्या पुढे तापमान होतं; त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा
मृत्यू झाला असावा,
असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन
पेदापल्ली यांनी व्यक्त केला. विषाणूजन्य आजार पसरु नये म्हणून मृत वटवाघळांना
तेथेच खड्डा करुन पुरण्यात आल्याचं, वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर
सुरपाम यांनी सांगितलं.
****
नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या
चौघांचा काल धरणात बुडून मृत्यू झाला तर एका बालकाला वाचवण्यात आलं. काल
संध्याकाळी ही घटना घडली. दोन वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून एक
महिलेने पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी चारही मृतदेह पाण्याबाहेर
काढले.
****
राज्य लोकसेवा आयोगातर्फे येत्या रविवारी नागरी सेवा
राजपत्रित गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूर
शहरातल्या नऊ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी हे आदेश जारी केले.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.
सिंधू तसंच सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसऱ्या फेरीत
प्रवेश केला. महिला एकेरीत सिंधुने इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानी हिचा
२१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात, सात्विक
– चिराग जोडीने अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा २६-२८, २१-१५, २१-१३
असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.
****
No comments:
Post a Comment