Friday, 8 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील ९२ पूर्णांक ०९ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

·      शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार; उद्या शपथविधी

·      पशुसंवर्धन विभागातील ३ हजार १०३ पदांच्या भरतीसाठी ११ जून रोजी चाळणी परीक्षा

आणि

·      आयपीएल’मध्ये आज सायंकाळी दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाताशी

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, राज्याचा एकूण निकाल ९२ पूर्णांक ०९ शतांश टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही ९४ पूर्णांक ९६ शतांश टक्के निकालासह मुलींनी बाजी मारली आहे, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९ पूर्णांक ५६ शतांश टक्के आहे.

विभागीय निकालात यंदाही ९७ पूर्णांक ६२ शतांश टक्के गुणांसह कोकण विभाग अव्वल तर ८८ पूर्णांक ४१ शतांश टक्के निकालासह छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८९ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांसह बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

नांदेड जिल्ह्याचा ८३ पूर्णांक ६२ शतांटक्के, जालना जिल्ह्याचा ८५ पूर्णांक ९० शतांश टक्के निकाल लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ४२ शतांश टक्के लागला आहे.

या परीक्षेसाठी राज्यातील १५ लाख ५५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले असून, यात लातूर विभागातील सर्वाधिक १०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी उद्यापासून २३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

****

दरम्यान, या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला आहे.

****

यावर्षी, अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामं युद्धपातळीवर पूर्ण करुन भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी आज मृद आणि जलसंधारण विभागाचा आढावा घेतला त्यात ते बोलत होते. यावेळी मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे १५ मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत. तसंच जिल्ह्यांना सुधारित आराखडे देऊन कामांना गती द्यावी. जलयुक्त शिवारची कामं हाती घेतलेल्या गावांबाहेरील १० टक्के कामंही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत अश्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकित दिल्या.

****

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची आज पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. कोलकाता इथं झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. सुवेंदू अधिकारी उद्या, कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे.

****

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. पशुधन विकास अधिकारी आणि सहायक आयुक्त संवर्गातील एकूण ३ हजार १०३ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ११ जून २०२६ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या केंद्रांवर संगणक प्रणालीद्वारे पार पडेल. या परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून पुढील निवड प्रक्रिया राबवली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

****

आधार ॲप सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांतच या ॲपने २ पूर्णांक १ कोटी डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे. या ॲपच्या माध्यमातून २८ लाखांहून अधिक नागरिकांनी आपले मोबाईल क्रमांक अद्ययावत केले असून, जवळपास ६ लाख नागरिकांनी पत्त्यात बदल केला आहे. हे आधार ॲप नागरिकांना ओळख संबंधित सेवा कुठेही आणि कधीही सहज उपलब्ध करून देत आहे.

****

आकाशवाणीच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅराथॉनमध्ये सहभागी झाले होते. दिल्ली इथं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांची उपस्थिती होती. आकाशवाणीला ९० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं गौरव द्विवेदी म्हणाले.

बाईट - गौरव द्विवेदी

****

मातोश्री ग्राम समृद्धीयोजनेंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनानं २०२५ मधील विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा पारित केला असला, तरी हा कायदा अद्याप अंमलात आलेला नाही; त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहील, असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले. मंजूर कामांचं अंदाजपत्रक तातडीनं तयार करून, तांत्रिक मंजुरी मिळवून कामांचे कार्यारंभ आदेश आणि हजेरीपत्रके त्वरित जारी करण्याचे निर्देश त्यांनी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सनी खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी कृत्रिमरित्या तयार केलेल्या चीजचा वापर केल्यास, त्याची माहिती पदार्थांच्या सूचीत स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. पनीर दुधापासून बनवलं जातं, पण कृत्रिम चीज हे खाद्यतेल आणि स्टार्चपासून तयार होतं. या दोन्ही घटकांमधील पोषणमूल्य वेगवेगळं असल्यानं ग्राहकांना याची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

****

सामाजिक न्याय विभागाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत असून आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी चांगलं काम करावं,” असं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते आज लोणावळ्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. सामाजिक न्यायही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

नाशिकच्या ‘टीसीएस’ कंपनीतीतील सक्तीनं धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आज नाशिकच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निदा खानला काल नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातून अटक केली होती.

****

केंद्र सरकारच्या ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या राष्ट्रीय अभियानात महाराष्ट्र  देशात अग्रस्थानी असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त छत्रपती संभाजीनग इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. थॅलेसेमिया मुक्तीसाठी आरोग्य विभागाने निर्धार केला असून, या आजाराच्या निर्मूलनासाठी प्रभावी पावले उचलली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणीसह राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. पोर्टल बंद केल्यानं हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडली होती. याबाबत पाथ्रीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरु करण्याबाबत विनंती केली होती.

****

१९९९ मध्ये ‘रिन्हो’ मोहिमेत वीरमरण प्राप्त झालेले धुळे जिल्ह्यातील हुतात्मा सैनिक पंढरीनाथ गबाजी सूर्यवंशी यांच्या वीरमाता इंदुबाई गबाजी सूर्यवंशी यांना आज दोन हेक्टर जमिनीचे दस्तऐवज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हा कार्यक्रम झाला.

****

क्रिकेट –

आयपीएल’मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाताशी होईल. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.

****

हवामान – येत्या दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...