Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 May 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
११ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आज साजरा
होत आहे. १९९८ मधल्या पोखरण अणुचाचण्यांच्या
यशाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोखरण अणुचाचण्यांच्या यशामागील आपल्या
शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि वैज्ञानिक कौशल्याचं आपण आज अभिमानाने स्मरण करत असल्याचं
त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत तंत्रज्ञान
हा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे, नवोन्मेषाला चालना देत, संधींचा विस्तार करत आणि विविध क्षेत्रांत
देशाच्या प्रगतीला गती देत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रतिभेला प्रोत्साहन, संशोधनाला बळ आणि जनतेच्या आकांक्षा
पूर्ण करणारे उपाय निर्माण करण्यावर आपला कायम भर राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त देशातले तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञान-कुशल तरुणांना शुभेच्छा
दिल्या. नवोन्मेष आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर मोदी सरकार विविध परिवर्तनकारी उपक्रमांद्वारे
भारताच्या प्रगतीला नवी गती देत आहे. हा दिवस नव्या संधींचा लाभ घेत भारताला अधिक महान
बनवण्याची प्रेरणा ठरो, असं शहा यांनी म्हटलं
आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या. पोखरणपासून अंतराळ, डिजिटल नवोन्मेष, संरक्षण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान
क्षेत्रातील प्रगतीपर्यंत भारताचा प्रवास, ज्ञान, आत्मनिर्भरता आणि नवसर्जनाची
ताकद दर्शवतो, असं त्यांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
****
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा ७५ वर्षे
पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र
मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत.
तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायू दलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर
केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
****
नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी
म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्स्यायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्स्यायन
सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून, ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या
कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार
नागरिकांनी इंधनाचा योग्य आणि संयमानं वापर करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी पश्चिम आशियातील
संघर्षामुळे जगभरात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाल्याचं सांगितलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी
नेतृत्वाखालील धोरणांमुळे भारताला आवश्यक तेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होत
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऊर्जा बचत, आत्मनिर्भरता आणि जबाबदार वापर ही काळाची गरज असल्याचंही
त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.
****
राज्यात येत्या जुलै महिन्यापासून
लँड टायटलिंग ॲक्टलागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य
असेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिली. पुण्यात काल भारती विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता
धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत, तसंच दीड लाख विद्यार्थ्यांना
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण
देण्यास सुरुवात केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी दुसरा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार, जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना
मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
**
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात करमाळा इथल्या
सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन काल बावनकुळे यांच्या हस्ते झालं. तहसीलदारांनी तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच
मार्गी लावावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार
काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप
निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरय्या
स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांकडे
कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध राज्यातले पदाधिकारी उपस्थित होते.
शंभरावं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल, यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात
आलं.
****
नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात
विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला
मृत्युदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर
परिसरातून हा निषेध मोर्चा काढला.
****
No comments:
Post a Comment