Monday, 18 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीपूर्वी सतीशन यांनी २० सदस्यीय यूडीएफ मंत्रिमंडळाची घोषणा केली असून, त्यापैकी १४ मंत्री प्रथमच मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासह ११ मंत्रीपदं मिळाली आहेत, तर IUMLला ५ मंत्रीपदं देण्यात आली आहेत. केरळ काँग्रेस, आरएसपी, केरळ काँग्रेस जेकब आणि सीएमपी यांना प्रत्येकी एक मंत्रीपद मिळालं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज स्वीडनचा यशस्वी दौरा आटोपून नॉर्वेला रवाना झाले. हा पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच नॉर्वे दौरा असून, गेल्या ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नॉर्वेला भेट देत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच नॉर्वेचे राजे सम्राट हेराल्ड पंचम आणि महाराणी सोन्या यांचीही भेट घेणार आहेत. भारत-नॉर्डिक व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेलाही पंतप्रधान संबोधित करणार असून, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, नवोपक्रम, सागरी अर्थव्यवस्था, संरक्षण, अवकाश आणि आर्क्टिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, स्वीडन दौऱ्याबद्दल लिहिताना पंतप्रधान मोदी यांनी, स्वीडन दौऱ्यात भारत-स्वीडन संबंधांना नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. दोन्ही देशांमधल्या संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या नव्या उंचीवर नेण्यात आलं. तसंच जॉइंट इनोव्हेशन पार्टनरशिप 2.0’ आणि इंडिया-स्वीडन टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉरिडॉरची सुरुवात करण्यात आली. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्यही निश्चित करण्यात आलं. स्वीडनची जनता, स्वीडन सरकार आणि पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी केलेल्या उत्साहपूर्व स्वागत आणि मैत्रीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

****

निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी एक जून पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून, १८ जून रोजी प्रत्यक्ष निवडणूक आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं समृद्धी महामार्ग जवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सकाळी आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. 

****

नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आज नो व्हेईकल डेपाळण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी आज शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना चारचाकी न वापरता दुचाकी, सायकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन केलं होत. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी आज वाहन न वापरता दुचाकीने मुख्यालयात हजेरी लावली. यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना इंधन बचतीची सामुहीक शपथ देण्यात आली. यापुढे प्रत्येक सोमवारी नो व्हेईकल डेपाळण्यात येणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे देण्यात येणारे मधुमित्रआणि मधु-सखीपुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी ही माहिती दिली. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या २० तारखेला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

नाशिक शहरासह जिल्ह्यात २६ प्रकल्पांमध्ये आता केवळ ३२ टक्के पाणी साठा शिल्लक राहील्याने पाणीटंचाईची समस्याही तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज ११६ टँकर २४२ फेऱ्या करत तहानलेली गावं, वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहचवत आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ४४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

****

अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पिंपरखेड इथल्या ५० वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून, तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

****

नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज अंदमान-निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...